आर्टिफिशियल इन्टेलिजन्स
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स AI कृत्रिम बुद्धिमत्ता समोर आपला निभाव लागेल का?Artificial intelligence
Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का? महत्व,आर्टिफिशियल इन्टेलिजन्स क्षमता आणि व्याप्ती
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स महत्व
सांप्रतकाळच्या तरुण पिढीला ए.आय. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रचंड आकर्षण आहे. आय.टी. क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांसाठी तर ए.आय. जणू जीव की प्राण झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि माहिती या माणसाच्या मूलभूत गरजांपैकी बहुतेक गरजा भागविण्याचं काम ए.आय. समर्थपणे करू शकेल इतका ए.आय. तंत्रज्ञानाचा विकास होऊ घातला आहे. ए.आय. तंत्रज्ञानाचा हा विकास मानवाचं जीवन सुखी करणार आहे, की तो माणसाला कायमसाठी दुःखाच्या खाईत ढकलून देणार आहे? हा आजच्या घडीला चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झाला आहे.
पूर्वीचा काळ आजचे आधुनिक युग
आरोग्यं धन संपदा
सुमारे शंभर वर्षांपूर्वी “आरोग्यं धन संपदा!” असं म्हटलं जात होतं. मधल्या काळात महात्मा ज्योतीराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या समाजभान जपणाऱ्या सुधारकांनी मानवी जीवनातले शिक्षणाचं महत्त्व ओळखलं. शिक्षण समाजाच्या तळागाळापर्यंत नेऊन पोहचविण्यासाठी त्यांनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं. त्यामुळं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ”शिक्षण हीच खरी ताकद आहे!” असं म्हटलं जाऊ लागलं.
माहिती व तंत्रज्ञान
नंतरच्या काळात कॉम्पुटरच्या आगमनामुळं माहिती व तंत्रज्ञान हा नवा विषय अभ्यासक्रमात आला. पारंपारिक विषयांपेक्षा या विषयानं विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेतलं. या विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकऱ्यांची अधिक संधी मिळत गेली. माहिती तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग पुढे वाढतच राहिला. माहिती तंत्रज्ञानाचं पाऊल रोज नव्या क्षेत्रांत पडू लागलं आणि तरुणांना मिळणाऱ्या नोकऱ्यांचं एकूण स्वरूपच बदलून गेले. मोठमोठ्या शहरांमध्ये आय.टी. पार्क निर्माण झाले. हळूहळू निमशहरी आणि आता ग्रामीण भागातही आय.टी. पार्कची निर्मिती होताना दिसते आहे.
हे माहिती व तंत्रज्ञानाचं युग
दूरदर्शन, दूरभाष व दूरसंचार क्षेत्रासोबत सिनेमा जगतातही आय.टी.चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. बँका व तत्सम वित्तीय संस्थांमध्ये आयटीने आपला चांगला जम बसवला. शिक्षण, संशोधन, आरोग्य, बांधकाम, समाजकल्याण, कायदा व सुव्यवस्था, जनसंपर्क, शासन-प्रशासन, समाजमाध्यमे, वृत्तपत्रे, शेती, उद्योग यासोबत साहित्य, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही आय.टी.चं दणक्यात पदार्पण झालं असुन आता या सर्व क्षेत्रांत आय.टी.ने आपले पाय घट्टपणे रोवले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात माहिती व तंत्रज्ञान हीच माणसाची खरी ताकद असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्श्वभूमीवर एकविसावं शतक हे खऱ्या अर्थाने माहिती व तंत्रज्ञानाचं युग ठरलं आहे.
बुद्धिमत्ता ही निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात मोठी आणि महत्वाची देणगी आहे. त्याच बुद्धिच्या जोरावर माणसाने सृष्टीतलं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं आहे. स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करता करता याच बुद्धिच्या आधाराने माणसाने आपल्या सोईचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न नेहमीच केला आहे. माणसाच्या याच प्रयत्नातून ए.आय. अर्थात आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा जन्म झाला आहे.
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स माणसाचं जगणं अधिक सुखकर करेल
अलिकडच्या काळात ए.आय. अर्थात आर्टिफिशियल इन्टेलिजन्स हा माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील परवलीचा शब्द झाला आहे. आर्टिफिशियल इन्टेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. खरं म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करुन माणसाला त्याचं जगणं अधिक सुखकर करता येईल असा उदात्त विचार करून माणसानेच माणसाला ही कृत्रिम बुद्धिमत्तेची देणगी दिलेली आहे. सांप्रतकाळी जीवनाच्या सर्व क्षेत्रात या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुरुवातीच्या काळात त्याचे अनुकूल परिणाम दिसून आले असले तरी आता कृत्रिम बुध्दमत्तेच्या वाढत्या आणि सर्वच क्षेत्रातल्या अनिर्बंध वापराचे प्रचंड प्रतिकूल परिणामही समोर येऊ लागले आहेत.
लोकांच्या निसर्गदत्त बुद्धिमत्तेचं काय होणार?
वानगीदाखल याची काही उदाहरणे द्यायची म्हटले तर ती सहजपणे देता येतील. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने आपला वेळ, पैसा आणि श्रम वाचतील यात कुणाचेही दुमत नाही; मात्र या उरलेल्या वेळाचे काय करायचं? हा प्रश्न पुढच्या पिढीला सतावल्याशिवाय राहणार नाही, असं भय मला आणि माझ्यासारख्या अनेकांना वाटू लागलं आहे. ही कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणाऱ्या लोकांच्या निसर्गदत्त बुद्धिमत्तेचं काय होणार? हा यक्षप्रश्न आपण कसा सोडवणार आहोत?
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स क्षमता आणि व्याप्ती
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सिनेमा तयार करणं आता खूप सोपं झालं आहे. वैद्यकीय क्षेत्रातही अनेक आजारांचं निदान आणि उपचार करणं शक्य झाले आहे. कोणत्याही भाषेचं अन्य कोणत्याही भाषेत भाषांतर सहजपणे करता येऊ लागलं आहे. पूर्वी ॲनिमेशन करताना एक सीन तयार करण्यासाठी एक आठवडा लागायचा, आता ए.आय. मुळं एका मिनिटात चित्र तयार होतं. आयटी प्रोग्रॅमरला पूर्वी कोडींग करायला खूप मोठा कालावधी लागायचा. आता काही क्षणात ऑटोमॅटिक कोड तयार होतो.
मनुष्यबळ व्यवस्थापन करणाऱ्या लोकांची पूर्ण रिक्रुटमेंट प्रोसेस आणि टेलीकॉलिंग हे ए.आय. करू शकतं. बीपीओ इंडस्ट्रीतले जवळजवळ ९० टक्के जॉब गेल्यात जमा आहेत. संपूर्ण टेलीकॉलिंग आणि कस्टमर फेसिंग ए.आय. मार्फत करण्यात येतंय. कायदा आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात एखादी केस फाईल करायची असेल तर कोणतं कलम लागेल? कोणत्या सेक्शन अंतर्गत केस फाईल होऊ शकेल? हे सर्व काही ए.आय. सांगतो. वैद्यकीय क्षेत्रात आजार सांगितल्यावर विविध प्रकारचे मेडिसीन प्रिस्क्रिप्शन ए.आय. बनवून देतो.

शिक्षण क्षेत्रात ए.आय. मुळे प्रचंड उलथापालथ होऊ शकते. तुम्हाला एखादा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा असेल आणि तो विषय तुम्ही ए.आय. चा वापर करून तुम्ही हव्या त्या भाषेमधून तो विषय शिकवू शकता. तुम्हाला ग्रंथालयात तास न् तास बसून मोठमोठे संदर्भ ग्रंथ उघडून पाहण्याची मुळीच गरज लागत नाही..
विशेष म्हणजे आताच्या परिस्थितीत ए.आय. ने पुरवलेली माहिती ही ८०-९० टक्के अचूक असते. त्यावर माणसाला फक्त १०-२० टक्के काम करण्याची गरज असते. मीडियामध्ये आपण पाहतोच आहोत की, आज तकसारख्या न्यूज चॅनलवर हवामानाच्या बातम्या ए.आय. देत असते. हळूहळू सर्व बातम्या ए.आय. कडूनच दिल्या जातील. फिल्म शूटिंगमध्ये फक्त कलाकाराचा चेहरा लावून उर्वरीत संपूर्ण एडिटिंग हे ए.आय. कडून करता येईल. म्हणजे चित्रपटाचा मोठा सेट लावायची गरज उरणार नाही. मागे ग्रीन कर्टन लावून पुढे शूटिंग केलं की मागचे बॅकग्राऊंड ए.आय. कडून ऑटोमॅटिकली टाकलं जाईल.
आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का?
ए.आय.चा असा वापर सध्या होतोय. तो यापुढच्या काळात आणखी वाढणार आहे. त्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न तयार होईल. बहुसंख्य लोकांच्या हाताला काम मिळणे कठीण होईल. सध्याच आपण बेरोजगारीच्या प्रश्नाने त्रस्त आहोत. ए.आय. मुळे हा प्रश्न आणखी मोठा होणार आहे या नुसत्या कल्पनेनेही अंगावर काटा उभा राहतोय. नोकरीसाठीच्या मुलाखतीत आजवर “तुझ्यात असं काय वेगळं आहे, जे इतरांमध्ये नाही?” असा प्रश्न हमखास विचारला जात होता. यापुढच्या काळात आपला सगळ्यात मोठा स्पर्धक ‘ए.आय.’ असणार आहे. त्यामुळं पुढील काळात “तुम्ही असं काय वेगळं करू शकता, जे ‘एआय’ करू शकणार नाही?” असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अशावेळी तुमचं उत्तर काय असेल?
“माणूस म्हणून स्वतंत्र विचार करण्याची क्षमता आणि माझी स्वतःची स्टाइल” हेच तुमचं उत्तर असायला हवं.
कारण स्वतंत्र विचार करणे, स्वतःची भूमिका असणे आणि आपली विशेष अभिव्यक्ती असणे हे तीनच आधार तुम्हाला वाचवू शकतात! ए.आय. च्या माध्यमातून सिनेमांचे साचे जरुर तयार होतील पण त्यातल्या कोणत्याही साचात राज कपूर, गुरुदत्त, जी.पी. सिप्पी, के.सी. बोकाडिया, अनुराग कश्यप किंवा नागराज मंजुळे तयार होऊ शकणार नाही. कितीही टेलिप्रॉम्प्टर आले, तरी निखिल वागळे किंवा रविशकुमारसारखा ॲंकर ए.आय. तयार करू शकणार नाही. निरनिराळ्या व्यक्तींचा कितीही डेटा दिला तरी ए.आय.ला पु.लं. देशपांडे यांच्यासारखं ‘व्यक्ती आणि वल्ली’ लिहीता येणार नाही.
स्वतः मुळीच विचार न करता ए.आय. चा वापर करीत काम करणं आता कितीही सोईचं वाटत असलं तरी ते तुमच्या मुळीच सोईचं नाही. ए.आय. मुळे तुम्ही निविर्चारी होत जाणार आहात. तुमची निसर्गदत्त बुध्दी अडगळीत पडून निरुपयोगी होणार आहे. तुमचा हा निर्विचारीपणाच उद्या तुम्हाला बेरोजगार करुन ठेवणार आहे. याचा अर्थ, आधी तुम्हाला मशीन करुन टाकायचं. तुमची सारी उर्जा मशीन आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्यातच खर्च करायची. अन् एकदा तुमचं मन बुद्धीचा ऱ्हास होऊन निर्विचार झालं की मग तुमचं काम आता हे तर मशीनच करेल, असं म्हणत तुम्हाला आऊट करायचं, असा हा तुमच्या अंगलट येणारा डाव आहे.
सामाजिक सलोखा, एकात्मता आणि शांतता याबरोबरच विचार करणं- भूमिका असणं आणि आपल्या स्वतःच्या शैलीत अभिव्यक्त होणं या केवळ तुमच्या- आमच्या नव्हे तर संपूर्ण समाजाच्या सर्व्हायव्हलसाठीच्या आवश्यक पूर्वअटी आहेत. त्या आपण समर्थपणे निभावू शकलो तर ए.आय. समोर आपला निभाव नक्की लागेल, याबद्दल मी नि:शंक आहे.
लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी,अहमदनगर,
महाराष्ट्र विकास प्रकल्प पुन्हा एकदा बाय पास खान्देश
तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा
1 thought on “Artificial intelligence आर्टिफिशियल इन्टेलिजन्स समोर आपला निभाव लागेल का?”