अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा
खान्देश साहित्य संघातर्फे पत्र

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे येत्या फेब्रुवारी २०२४ मध्ये होणार आहे. या संमेलनात खान्देशातील आहिराणी व इतर बोलीभाषांचा आणि खान्देशातील साहित्यिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा, यासाठी आयोजकांना लेखी स्वरूपात पत्र देण्यात आले. साहित्य संमेलनाचे आयोजक अमळनेर येथील मराठी वाङमय मंडळ असून याचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी व संमेलनाध्यक्ष मा. रविंद्र शोभणे यांना खान्देश साहित्य संघातर्फे लेखी स्वरूपात पत्र देवून आवाहन करण्यात आले. याआधी मौखिक स्वरूपात आग्रह धरण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करावी असेही सांगण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ साहित्यीक डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी दिली आहे.
खान्देशातील अहिराणी व तीच्या प्रभाव
खान्देशातील अहिराणी व तीच्या प्रभाव क्षेत्रात बोलल्या जाणाऱ्या बारा उपभाषा, ज्यामध्ये मध्यवर्ती अहिराणी, बागलाणी, लेवा गणबोली-लेवा पाटीदारी, डांगी, नंदुरबारी, नेमाडी, लाडशिक्की, मिलाऊ, आदिवासी, तडवी, भावसारी, गुजराऊ व तत्सम बोलीभाषा बोलल्या जात असून त्यांचे प्रतिबिंब साहित्य संमेलनात उमटणे आवश्यक आहे. अभीरांच्या ५००० वर्षांपेक्षा जुनी असलेल्या खान्देशी भाषेचे, साहित्य, संस्कृतीचे दर्शन घडणे गरजेचे आहे. यासाठी संमेलनातील ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद, चर्चासत्र, मुलाखत, निमंत्रितांचे कवीसंमेलन, गझलकट्टा, कवीकट्टा, कथाकथन, बालसाहित्य संबंधित बालकुमार मेळावा अशा सर्वच कार्यक्रमांच्या प्रत्येक सत्रात अधिकाधिक सहभाग व स्वतंत्र सत्र देखील आयोजित करणे आवश्यक आहे. खान्देशातील अधिकाधिक साहित्यिक व बोलीभाषा साहित्यिकांना या संमेलनात सन्मानपूर्वक सहभागी करून लेखन परंपरेचा वारसा वृध्दींगत करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करत प्रत्यक्ष भेट घेत खान्देश साहित्य संघाचे केंद्रिय अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी चर्चा करून सांगितले. प्रथमतः अमळनेर येथे साहित्यिकांची बैठक पार पडली व त्यात सर्व विषय निश्चित करून सदर विषय आयोजकांसमोर ठेवण्यात आले. यावेळी खान्देश साहित्य संघाचे शाहिर नाना पाटील, गझलकार शरद धनगर, जळगाव जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पवार, अमळनेर तालुकाध्यक्षा सुनिता पाटील, मनोहर नेरकर, उमेश काटे, रामकृष्ण बाविस्कर, छाया इसे, पूनम साळंखे, रजनी पाटील, रत्नाकर पाटील, बी.एन. पाटील, अशोक इसे, वाल्मिक मराठे, रेखा मराठे यांच्यासह खान्देश साहित्य संघाचे विविध पदाधिकारी, साहित्यिक उपस्थित होते. याप्रसंगी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांनी खान्देशातील संस्कृतीचे गुणविशेष जाणून घेत खान्देशातील साहित्य चळवळ व अभीरांचा इतिहास याबद्दल डॉ. सुर्यवंशींनी माहिती देत अध्यक्षांचे अभिनंदन केले. सदर मागणीचे पत्र आयोजक संस्थाध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांना देण्यात आले. यावेळी मराठी वाङमय मंडळाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. खान्देशात संमेलन होत असल्याने खान्देशातील साहित्य संस्कृतीचा अंतर्भाव अधिक असावा, असे आवाहन जनभावनेतून करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मानचिन्ह
2 thoughts on “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात खान्देशी बोलीभाषा आणी साहित्यकांचा अधिकाधिक समावेश व्हावा”