अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा

अनुभवांचे गाठोडे मोबाईलवेड सोडा

कधीकाळी केवळ दूरभाषयंत्रणेच्या माध्यमाचा वापर करुन फोनवर बोलणारे आपण सारे भारतीय आता भ्रमणध्वनिद्वारे एकमेकांशी दृकश्राव्यच नव्हे तर फेसबुक, व्हाट्सअप, ट्युटर, ईन्स्टाग्राम, युट्युब अशा अनेकानेक तांत्रिक सोईंच्या माध्यमांचा सहज व सुलभपणे वापर करुन केवळ राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी संपर्क साधून विचरांसोबतच गैरविचारांचे आदान-प्रदान करू शकतो. हे जरी खरे असले तरीदेखील आपल्यातील काही अतिविद्वान, शहाणे म्हणा अथवा दीड शहाणे म्हणा असे महाभाग पूर्वीप्रमाणेच याही वैज्ञानिक यंत्रणेचादेखील सर्रासपणे दुरुपयोग आणि गैरवापर करीत आहेत. या मोबाईलयुगाचे जितके फायदे आहेत तितकेच किंबहुना त्याहूनही अधिक तोटेच आहेत हे आपणापासून आता लपून राहिलेले नाही.
परक्यांना किंवा अनोळखी माणसांना फसविणे किंवा मुर्ख बनविणे एकदाचे आपण समजून घेऊ शकतो, परंतु आपल्याच आप्तेष्टांची व सन्मित्रांची राजरोसपणे फसवणूक करणाऱ्या महाभागांचे पितळ उघडे पडल्यावर जे शल्य मनाला बोचते ते साहण्या पल्याडचे असते!
काही दिवसांपूर्वी धुळे येथील माझे व आपणा सर्वांचे लाडके खान्देशभूषण आदरणीय आप्पासाहेब विश्रामजी बिरारी सरांनी एक मजेदार किस्सा मला संगितला तो असा की, सरांनी समुहात एक स्वानुभव पाठवला. कितीही निष्णात अथवा शीघ्रतिशीघ्र वाचक असला तरी हे कथन वाचयला कमीतकमी पाच ते सात मिनिटांचा कालावधि लागतो हे आप्पासाहेबांना पक्के माहीत होते, पण त्यांच्याच एका सन्मित्राने तो लेख वाचून झाल्याचा अभिप्राय स्माईलीसहीत अवघ्या एका मिनिटातच पाठवला. अर्थातच तत्वनिष्ठ आप्पासहेबांना ही गोष्ट कशी बरे आवडेल? आप्पासाहेबांनी त्यापुढे आपल्या त्या सन्मित्राला आपले लेख, कथा, कविता आणि गीते असे कुठलेही सहित्य पाठविणे बंद केले ते अगदी कायमचे! आप्पासाहेंबाच्या या अनुभवातून मला बरेच काही शिकायला मिळाले व तेंव्हापासून मी देखील माझ्या आप्तेष्ट व स्नेहीजनांकडून येणाऱ्या अभिप्रायावर डोळ्यात तेल घालून पाळत ठेवायला सुरुवात केली, तेंव्हा मलासुद्धा आप्पासाहेबांसारखाच खूप खूप वाईट अनुभव आला. त्यातल्या एक दोघांना याविषयी विचारणा केली असता अजून एका वेगळ्याच रहस्याचा मला उलगडा, झाला तो असा की, “आम्ही आधी वाचल्याचा अभिप्राय लगेसच पाठवतो व फावल्या वेळात तुझ्या कविता अन् गझला वाचून काढतो.” अर्थातच याला मीच नव्हे तर कुणीही लंगडे समर्थनच म्हणेल. काही राजकीय पक्षभक्त तर याहूनही महाबिलंदर निघालेत! चुकून माकून जर काँग्रेस, शिवसेना किंवा बीजेपी किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध असलेल्या फारवर्डेड माहितीला आपण पुढे आपल्या समुहात जरी फारवर्ड केलेले आढळले तरी ते भयंकर संतापतात व आपली ऐशी तैशी करायचीही तयारी ठेवतात.
असो! असे एक नव्हे तर अनेक ब-या-वाईट अनुभवांचे गाठोडे पाठीशी बांधून तुम्ही आम्ही वावरत असतो.
आजची कविता याच मध्यवर्ती कल्पनेला धरुन आहे. हा लेख वाचून झाल्यावर कृपया ही कविता वाचून काढावी व आपला अभिप्राय अवश्य कळवावा.

शिवाजी साळुंके, ‘किरण’
ह.मु. वरोरा, जि. चंद्रपूर.

मोबाईलवेड सोडा

एका सेकंदात सांगा कशी वाचता कविता?
समुहात, सन्मित्रांना उगा मुर्ख बनविता!

डोक्यावरुनच जाती लागेचना अर्थ काही
ऐसे गहन कशाला सुविचार पाठवता?

वाचायला जे हवे ते, कधी वाचता का सांगा?
बघण्यासारखे नाही, तेच बघत बसता!

गूढ सोडवावे कोडे, वाढवावे ज्ञान थोडे
व्यर्थ चॕटींग करीत वेळ वाया दवडिता!

व्हाट्सअप फेसबुक, युट्युबही तुम्हा हवे
अकारण रिचार्जचा खर्च करीत बसता

गेम खेळता खेळता पोल, पूल उडविता
मोबाईल डाटा लगे हातोहात संपविता

मोबाईलवेड सोडा, बरा नाही नाद याचा
उपयोग छान करा, वाचा ग्रंथ, ग्रामगीता

शिवाजी साळुंके, ‘किरण,’
ह.मु. वरोरा, जि. चंद्रपूर.

Leave a Comment