अवकाळी पावसामुळे एरंडोलचे रस्ते झाले चिखलमय
संताप
ठेकेदार बिनधास्त-नवीन पाईपलाईनसाठी खोदकाम-कॉलनीवासियांना त्रास-प्रशासकांनी लक्ष द्यावे-मागणी
एरंडोल – दोन दिवस अवकाळी पाऊस झाला आणि सर्वत्र शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदील झाला असून एरंडोल शहरातील नवीन वसाहतींमधील रस्ते मात्र चिखलमय झाल्याने नपा प्रशासकांनी लक्ष घालावे अशी नागरीकांनी मागणी केली आहे.
एरंडोल शहरासाठी तालूक्याचे आमदार चिमणराव आबा पाटील यांनी पाण्याच्या टाकीसह शहर आणि नवीन वसाहतींमध्ये पाण्याच्या पाईपलाईनसाठी 29 कोटींचा निधी मंजूर करून काम देखील सुरू आहे. परंतू नवीन वसाहतींमधील सुस्थितीतील रस्ते खोदून नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी भर पावसाळ्यात काम सुरू केले. मात्र काँक्रीट रोड खोदल्यामुळे माती बाहेर निघाल्याने योग्य प्रकारे न बुजविल्यामुळे खड्डे तर पडलेतच परंतू काळ्या मातीमुळे, माती मिश्रीत मुरूममुळे चिखल झाला. पडलेल्या खड्ड्यांमुळे पायी चालणे कठीण झाल्यामुळे गणपती उत्सवानिमित्त झालेल्या शांतता समिती बैठकीत नपा प्रशासकांवर तक्रारींचा भडीमार झाला. म्हणूनच पाईपलाईनचे काम थांबले परंतू आत्ताच्या अवकाळी पावसामुळे पुन्हा जैसे थे परिस्थितीमुळे नागरीकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. संबंधित ठेकेदाराकडे याबाबत चौकशी, विचारले असता ठीक आहे सांगून मोकळे झाले.
नपा आरोग्य, प्रदूषण, स्वच्छता यासाठी चांगले काम करीत असले तरी पाईपलाईनच्या कामाकडे झालेल्या बेजबाबदारपणामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. यास जबाबदार कोण ? असाही संतप्त सवाल असून आता तर दिवाळीनंतर शाळा देखील सुरू झाल्याने चालकांना, वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नवीन पाईपलाईनची कामे योग्य प्रकारे करण्यासाठी प्रशासकांनी ठेकेदारास कडक सुचना द्याव्यात अन्यथा नवीन वसाहतीतील नागरीकांचा परिरवारासह धडक मोर्चा नपावर जाणार असल्याचा इशारा दिला आहे.


