काय गंमत असती राव सोनिया गांधी लेख विशेष

काय गंमत असती राव सोनिया गांधी लेख विशेष

आज्ज्या-पनज्यांपास्नं परदेशात जाऊन र्‍हायलेल्या.. भारताची आठवनबी न येनार्‍या कुनी बाप्यानं नायतर बाईनं, अमेरीकेत एखादं इलेक्शन जिंकलं-पद मिळवलं की “भारतीय वंशाचे”,”भारतीय वंशाच्या” म्हनून किंचाळत कौतुक करन्यात आमी फुडं असतो…

आनी त्याचवेळी, आपल्या प्रेमासाठी परदेशातून भारतात येऊन..भारतीय संस्कृतीशी एकरूप होऊन..भाषेपासुन पेहरावापर्यन्त आणि संस्कारांपासून आचारविचारांपर्यन्त अस्सल भारतीयत्व अंगीकारणार्‍या व्यक्तीला मात्र हिनवन्यात, बदनाम करन्यात, हेटाळन्यात आपन मागं पडत नाय !

…पन अशा परिस्थीतीतबी टीकेचे सगळे वार झेलून तिनं आपलं ‘भारतीयत्व’ जपलं. कारण ते तिनं तिच्या जोडीदारावरच्या प्रेमासाठी स्विकारलं होतं. शिनेमातली प्रेमं फिकी पडतील अशी नादखुळा लव्ह श्टोरी होती ती भावांनो !

फक्त एकोणीस वर्षांची होती ती. केंब्रीज युनिव्हर्सिटीत शिकत असताना इटालीयन फूड खायला मैत्रीनींबरोबर एका ग्रीक रेस्टाॅरंटमध्ये गेली होती. तिथं योगायोगानं राजीव गांधी नांवाचा पोरगाबी मित्रांसोबत आलावता.. तिला बघितलं आनि त्यो बघतच र्‍हायला… बघतSच र्‍हायला.. त्याच्या डोक्यात जनू गिटार वाजायला लागलं – ‘तुझे देखा तो ये जाना सनम !’ अस्लं कायतरी व्हायला लागलं..

राजीवनं तिथं असलेल्या रूमालावर तिच्यासाठी एक कविता लिहीली आन् वाईनच्या बोटलसोबत तिच्याकडं पाठवली… तिला बी पोरगा बरा वाटला.. तिला म्हाईतबी नव्हतं की ह्यो भारताच्या पंतप्रधानांचा मुलगा हाय ! कसं म्हाइत असनार? कुनालाच म्हाईत नव्हतं.. त्याच्या मित्रांनाबी !! कारन त्यो इतर सर्वसामान्य पोरं र्‍हात्यात तसा काटकसरीत रहात होता.. फावल्या वेळात आईस्क्रीम विकून पाॅकेटमनीसाठी पैसे साठवत होता.

..तिला बी ह्यो देखना, साधासरळ, कष्टाळू पोरगा आवडला. मैत्री झाली. प्रेमात रूपांतर कधी झालं कळलंच नाय. त्याच्या प्रेमाची जादू एवढी जबरदस्त होती की ती आपला देश, आपली मानसं, आपली माती सगळं सोडून भारतात आली. हितंं नव्यानं रूजली. आपल्या जोडीदाराचा देश, त्याची मानसं, त्याची माती, त्याची नाती हाय तशी स्विकारली. तो अर्ध्यावर डाव मोडून गेला. देशासाठी जीव गमावला त्यानं. त्याच्यानंतरबी तिनं हे सगळं घट्ट धरुन ठेवलं… त्याच्या स्वप्नांसकट !

मला बाकी राजकारनातलं काय कळत नाय भावांनो, पन का कुनास ठावूक, या एका गोष्टीसाठी या अफलातून बाईविषयी लै लै लै आदर वाटतो !

वाढदिवसाच्या लै लै लै मनापासून शुभेच्छा, सोनियाजी.

किरण माने.

Leave a Comment