टचकन डोळ्यात पाणी आणणारी कविता भुई आणि बाई
डॉ. युवराज पवार
खानदेशातील नव्या ताकदीचा उमदा युवा कवी अशी मी प्रविण पवार यांची ओळख करून देतो. प्रविण पवार यांनी आता पर्यंत साहित्य अकादमी दिल्ली तर्फे घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय साहित्य उत्सवामध्ये चारदा काव्य वाचनाच्या माध्यमातून आपल्या खानदेशच्या मातीचा गौरव केला आहे. त्यामुळे त्यांची कविता केवळ खानदेशची नसून ती संपूर्ण भारतातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व करते. अल्पावधीतच त्यांनी साहित्य क्षेत्रात आपले नाव लौकीक केले आहे. खानदेशाला यापूर्वीच अनेक कवी कवयित्रींची पार्श्वभूमी लाभलेली आहे. खानदेशात सर्व स्तरातून लेखन करणारे दिग्गज साहित्यिक आढळून येतात. साहित्यिकांच्या या मांदियाळीत प्रविण पवार या कवीने दमदारपणे प्रवेश केला आहे. त्यांचा ‘माझी मिडल क्लास कविता’ ‘जाक्तीजोत’, ‘भुई आणि बाई ‘असे तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून त्यांचा ‘भुई आणि बाई’ या संग्रहातील कविता खानदेशच्या भुई आणि बाईच्या अस्मिता, अस्तित्वाची कळकळीने दखल घेणारी कविता आहे.
शेतशिवार, निसर्ग, भुई आणि बाई या प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून बहिणाबाई चौधरी, ना.धो. महानोर यांसारख्या कवी कवयित्रींनी काव्य लेखन जरी केले असले तरी प्रवीण पवार या कवीने हाच धागा पकडून भुई आणि ग्रामीण स्त्रीचे भावविश्व आपल्या अनुभवाच्या पातळीवर मांडण्याचा जो स्तुत्य प्रयत्न केला आहे. त्यात कवी निश्चिंतच यशस्वी झाला आहे.
प्रविण पवार हा युवा कवी अत्यंत संवेदनशील, हळव्या मनाचा आहे. ज्या मातीत, परिसरात तो वाढला, शिकला. त्या परिसरातील ग्रामसंस्कृतीचे तेथील जीवन जाणिवांचे, तेथील आचार विचारांचे त्याच्या मनावर झालेल्या चांगल्या वाईट अनुभुतीतून कवी उभा राहिला आहे. दुसरे असे की, तो माती आणि बाईशी तादात्म्य पावलेला आहे. स्वतः शेतमजूर स्त्रियांसोबत शेती मातीत काम करतांना आणि आपल्या भोवतालच्या परिसरातील स्त्रियांच्या जीवनांचे जवळून निरिक्षण करतांना कवीच्या मन पटलावर जे भाव संवेदन उमटतात त्याच भाव संवेदनेतून या कवीची कविता फुलली आहे. असे एकंदरीत ‘भुई आणि बाई’ या संग्रहातील कविता वाचतांना वाटते. या कवितांमागे निश्चित एक घटना, एक प्रसंगानुभाव दडलेला आहे. प्रत्येक एक कविता आपल्या मुशीतून एक विषय घेऊन वाचकाच्या समोर येते. विसरल्या न जाणाऱ्या गतकाळातल्या वेगवेगळ्या आठवणीचा गोतावळा या कवितेतून दिसून येतो.
‘भुई आणि बाई’ या संग्रहातील कविता वाचतांना अनेक प्रश्न पडतात. हे प्रश्न साधे नाही तर फार महाभयंकर आहेत. अस्वस्थ करून सोडतात. आपण असंच जर वागलो तर…? किंवा या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं तर…? उद्या आपल्या हातात पश्चतापाशिवाय काहीच उरणार नाही. येणारा भविष्यकाळ आपल्याला कदापि माफ करणार नाही. अती आणि तात्काळ उत्पन्नासाठी बाजारात येणारी रसायने आणि खुल्या बाजार पेठा यामुळे चाललेली चढाओढ आणि जागतिकीकरणामुळे
माणसा माणसाच्या मनात निर्माण होत चाललेला माया मोहाचा स्वार्थ, या साऱ्या रगाड्यात आपण सारेच भुईच्या जीवावर उठलो आहोत. हे सत्य कुणाला ही नाकारता येणार नाही. रस्ते, पुल, धरणे यासाठीचे काँक्रीटीकरण हे ग्लोबल वॉर्मिगला आव्हान करणाऱ्या मानवी भौतिक सुख सुविधांमुळे आज भुईची दमछाक होते आहे. पर्यावरणाचा अतोनात नास होतोय. विश्वगुरू बनू पाहणाऱ्या डिजिटल भारतातील कृषिप्रधान व्यवस्थेशी जुळलेल्या ग्रामीण भागातील जात समूहाचे जीवन किती आणि कसे नासुर कष्टप्रद असून त्यांची दयनीय स्थिती किती हलाखीची आहे. हा सगळा मजकूर कवितेतून वाचून टचकन डोळ्यात पाणी येतं. काळजाला पीळ पडतो. स्वातंत्र्य समता बंधुता हया सगळ्या संकल्पना थिट्या पडतात.
‘भुई आणि बाई’च दुखं हे आदिम आहे. त्यांच्या व्यथा वेदनेत थोडा फार फरक असेल परंतू दुःखाची जातकुळी एकच आहे. बाई बोलू शकते. व्यक्त होऊ शकते परंतू भुई बोलू शकत नाही. तिला व्यक्त होता येत नाही. हे जरी सत्य असले तरी भुईच्या दुःखाची तीव्रता ही जाणून घेता येते. समजून घेता येते. म्हणून कवी तिच्याशी हितगूज करतो. तिची आर्तता समजून घेतो. तिच्या वेदनेला शब्दरूप देतो. दोघींच्या दुःखांची तुलना करतो. येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भुई आणि बाई शाबूत कशी राहिल याची करुणा भाकतो. बाई जन्म देते आणि भुई पोसते हे सत्य समाजाला ज्ञात असून ही बाई आणि भुईवर अनन्वित अत्याचार केला जातो. तो थांबायला तयार नाही. ही सल कवीला अस्वस्थ करते. ( प्रजिमा) काल्पनिक स्त्रीला आपल्या मनात निर्मुन तिच्याशी संवाद साधत कवी रात्री बे रात्री हातात पेन घेऊन आपल्या मनाची अस्वस्थता कागदावर लिहून मोकळा होतो.
प्रविण पवार या कवीच्या कवितेत वाघरी, अहिराणी, भाट, भिलाऊ, पावरा बोली आणि प्रमाण भाषेचा सुंदर असा मिलाफ पहावयास मिळतो. या सगळ्या बोलींच्या उपयोजनामुळे त्यांच्या कवितेला सौंदर्याचा एक तजेल जिवंतपणा लाभल्याचा प्रत्यय कवितेतून येत राहतो. शेतीमातीत कष्ट उपसणाऱ्या कष्टकरी स्त्रियांच्या तोंडातून निघणाऱ्या संवाद रूपी बोलीतली ही कविता काळजाला भिडते. त्यांचा
‘जाक्तीजोत’ हा कवितासंग्रह पूर्णतः वाघरी बोलीतून त्यांनी लिहिला आहे. बोली भाषेचं संवर्धन व्हावं, तिला वाचक मिळावा हा त्यांचा प्रांजळ प्रामाणिक हेतू आहे. आज आपण पाहत आहोत अनेक बोली भाषा मृत पावत चाललेल्या आहेत. त्यांनी वाघरी बोलीचं केलेलं संवर्धन उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शन करणार ठरेल यात तिळमात्र शंका नाही.
भुई आणि बाई विषयी आपल्या मनोगतात प्रविण पवार म्हणतात.” भुई च्या व्यथा गुगलच्या बांधावर बसून कळणार नाहीत, त्या कळतील तर प्रत्यक्ष वर्तमानातला भुईगर्भ समजून घेतल्यावरच. का ? तर भूक लागली की गुगलवर भाकर डाऊनलोड करता येणार नाही ना ? आणि सुदृढ गर्भ असल्याशिवायही भविष्याचा विचार पण करता येणार नाही. मग तो गर्भ भुईचा पिक पाण्यासाठी असो वा बाईचा पुढील पिढीसाठी” भुई आणि बाईच्या रक्षणार्थ प्रविण पवार यांनी लेखणी उचलली आहे. आपल्या कवितेतून ते भुई आणि बाईच्या वेगवेगळया पैलूंचा शोध घेतात.
पहिल्याच कवितेत कवी खेड्यातील एका कष्टकरी महिलेच्या स्वाभिमानाची नि तिच्या खानदानीपणाची ओळख करून देतात. खेडयातील महिला किती काटक आहे. कामसू वृत्तीची आहे. तिच्या स्वभाव गुणवैशिष्ट्यचा चांगला दाखला कविने दिला आहे… तिच्या बोटांना जिवाई लागली आहे. बोटांना रक्त फुटलेलं आहे. बोटांना झालेल्या जखमा विसरून ती आपल्या कुटुंबासाठी शेतात कापूस वेचण्याचं काम करते आहे. यावरूनच ग्रामीण स्त्रियांच्या सोशिक्तेचा सहनशीलतेचा धाडशीपणाचा प्रत्यय आपल्याला लक्षात येतो.
भुईची कथा आणि बाईची कहाणी कशा स्वरूपाची आहे. हेही कवी चाणाक्षपणे लक्षात आणून देतो.
भुईची कथा
बाईंची मी कहाणी
युगे शहाणी (भुई अन् बाई पृ. क्र.१६)
युगे शहाणी झाली परंतू भुई आणि बाईचा छळ मात्र अजून संपला नाही. बाई अजूनही पाहिजे तेवढी आत्मनिर्भर झाली नसून ती आजही परावलंबी आहे. स्त्रीचं जीवन म्हणजे अनेक अडचणींनी, मनस्तापाने भरलेलं आहे. समाजाने दिलेल्या छळाची तीव्रता कमी व्हावी म्हणून बाई भुईला साद घालते.
भुईही बाईशी बोलते. दोघीही एकमेकाशी संवादातून आपल्या झिजवलेल्या हयातीचा दाखला देतात. दोघीही आपल्या अनंत दुःखात बुडून जातात. बाईचा गर्भ पिकला नाही तर तिला वांझ म्हणून हिणवले जाते तर न पिकणाऱ्या भुईला पडीक भुई आणि बाईंच्या वेदनेला सीमाच नाही.
त्या सर्जक जरी असल्या तरी त्यांना बोलण्याची मुभा पुरूष प्रधान व्यवस्थेने दिलेली नाही. ही सल, घुसमट दोघींच्याही मग संवादातून प्रकटते
तू तीळ मी राई
दोघींचाही जलम
भुईतुनच बाई
भुई आणि बाई कशा एकजुग झाल्या आहेत. त्यांच्या अंतर्मनातील घालमेल, संवेदन कवीने टिपून कवितेच्या माध्यमातून समाजासमोर मांडले आहे. हे इतकं सहज सोपं नाही. मुळातच कवी जवळ हळवं आणि संवेदनशील मन असल्यामुळेच ते शक्य झालं आहे. कविता हा साहित्यातील उत्कट असा प्रकार आहे. कवीला जे सांगायचं आहे. ते तो अगदीं समर्पक आणि कमीत कमी शब्दात सांगण्याचा प्रयत्न असतो. प्रविण पवार यांची कविता मुळातच उत्कट आहे. ती मनात कुठलाच मळभ ठेवत नाही.
बोलल्याशिवाय किंवा संवाद साधल्याबिगर एकमेकांचे सुख दुःख,भाव भावना विचार कसे कळतील. एक मुकी दुसरी बोलकी परंतू एकमेकींच्या संपर्कातून जीवनाच्या अनेक पैलूंचे पदर या दोघीही उलगडत जातात. असे असले तरी दोघींच्या बेंबीखाली असलेल्या गर्भातूनच कोंब फुटतो. या सत्याची जाणीव होताच दोघीही लढण्याच्या पावित्र्यात येवून, आजवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी आवाज उठवण्याविषयी ठरवितात.
भावनांना विवस्त्र करून
तुला फक्त स्पर्श हवा होता ना
तो क्षण नव्हताच रे
तुला समजून घेण्यासाठी
इतकेच अश्रू पुरेसे आहेत
पापण्या भिजवण्यासाठी
( भावनांना विवस्त्र करून पृ.१९)
ग्रामीण भागात आजही स्त्रियांच्या भावना समजून घेतल्या जात नाही. स्त्रियांकडे आज ही भोग वस्तू म्हणून पाहिले जाते तिचे स्वप्न कुचकरले जाते. तिला दुय्यम गणले जाते. अशीच एक खेडयातील स्त्री फुलण्याआधीच तिच्या भावनांना कुचकरल्याची व्यथा मांडते.
अलीकडच्या काळात आय वी एफ च्या माध्यमातून स्त्रियांना हल्ली अनैसर्गिक गर्भ धारण करता येऊ शकतो परंतू सक्षम पिढी त्यातून निर्माण होऊ शकेल का ? एक चांगला मौलिक प्रश्न कवीने या कवितेतून समाजासमोर ठेवला आहे. नोकरी करणाऱ्या बऱ्याच विवाहित स्त्रियांना संसार करावासा वाटत नाही. त्यांना मन मोकळं जगावेसे वाटते. अशा स्त्रिया लग्न करून आपल्या पतीशी फारकती घेऊन स्वतंत्र राहतात. ही प्रथा समाजात रुढत चाललेली आहे. परंतु ‘ हल्ली मला नवऱ्याची नाही ‘ ही कविता वाचतांना वेगळाच अनुभव येतो. तो म्हणजे पतिविना जन्माला घातलेल्या अनौरस संतानांना वडिलांचे नाव कसे मिळेल या विवंचनेत सापडलेल्या स्त्रीचं दुःख सैरभैर करून सोडत.
प्रविण पवार या कवीची कविता वाचताना कवितेत जो घटना प्रसंग कवीने कवितेत उभा केला आहे. तो आधी समजून घ्यावा लागतो तेंव्हाच ती कविता कळते.
भरल्या
ज्वारीच्या तोट्यागत
टराटरा वाढलेली पोर
पोर वयातच पोराची माय झालेली ( पृ.२३)
जिचे वय खाण्या पिण्याचे शिक्षण घेण्याचे आहे. त्याच वयात ती पोराची माय होते तेंव्हा ती मुले कुपोषित होणार नाही कशावरून ? महिला सबलीकरणाच्या किंवा सक्षमीकरण्याच्या खोट्या पोकळ बढाया मारणाऱ्यांना प्रविण पवारची कविता चांगला धडाच शिकवत नाही तर खेटरं मारते देशाचे सत्ताधारी स्वार्थाच्या खोल डोहात बुडल्यामुळे जनतेचे दुःख कुणाला ही दिसेनासे झाले आहे. एकिकडे प्रगतीच्या आणि विकासाच्या पोकळ बढाया मारणाऱ्या सत्ताधिषांना भारतातील अनेक खेडया पाड्यातील स्त्रियांचे जिवन किती भेसूर भयावह आणि दरिद्रीमय आहे. याची जरा सुध्दा चाड नाही.
खेड्यापड्यातीलच नव्हें तर शहरातील मुलींवर अत्याचार, बलात्कार छेडछाडीची घटना सर्रास घडायला लागल्या आहेत. या सर्व घटनामुळे स्त्रियांमध्ये अनामिक दहशत,भीती पसरते. बाईच्या मासिक धर्माला भ्रष्टता मानून तिला हीन दर्जाची वागणूक देणाऱ्या पुरूष प्रधान संस्कृतीच्या थोबाडीत कवी चांगलीच कसून चपराक हाणत म्हणतो.
बरं झालं भुई तुला मासिक पाळी नाही
नाही तर तुझही झालं असतं
असच काही ( पृष्ठ ४३)
तिची काहीही चूक नसतांनाही समाज कसा बाईचा छळ करतो. अगदी नैसर्गिक मासिक पाळी येणाऱ्या मुलींच्या किंवा बाईच्या घरभर वावरल्याने भ्रष्ट आचरण केल्याच्या नावाखाली जळतं लाकूड मारणारी सासू आणि उलून सोलून काढणारा नवरा सासुरवाशिणीला गांजपाट करतो. जी स्त्री माणसाला जन्माला घालते तिच्याच पदरी ही वृथा काळीज जाळून जाते.
आईवर कविता लिहिली नसेल असा कवी जगात कुठेही सापडणार नाही. प्रविण पवार या कवीने सुध्दा आईवर ज्या कविता लिहिल्या आहेत. त्याला तोड नाही. या कवीची आई शेतीमातीत काबाडकष्ट करणारी माता आहे. तिने सारे संस्कार आपल्या मुलावर केले आहे. आपल्या जीवनात जे काही आहे ते केवळ आईमुळेच, याची जाणीव कवीला आहे. म्हणूनच आपल्या आईचे कर्तृत्व आणि महात्म्य वर्णन करतांना कवी म्हणतो.
माझी माय माझ्यासाठी भाकरीच पीठ
माझी मायच माझं बोलकं विद्यापीठ
(बोलकं विद्यापीठ पृ.३४ )
आणि
भुईच्या भेगा पावसानं भरल्या जातात हो
पण माझ्या मायेच्या पायेच्या भेगा
भरल्या जात नै…
रघत निघत कधी कधी भेगातून
तवय भिलावा पण तिले सापडत नै
(बिघाभर माय पृ.६६)
आईच्या खंतड जीवनातील धगधगता संघर्ष कवीने अगदी सहजच टिपला आहे. जन्म देणाऱ्या आईची आणि भुईच्या दुखाची जी तुलना कवीने केली आहे. ती नैसर्गिक पातळीवरची वाटते. कृत्रिमता किंवा कुठेही कल्पना दिसत नाही.
विज्ञानवादी विचाराची एक आदिवासी वाघरी स्त्री समाजात सम्यक विचारांची पेरणी करते. आपल्या व्यथा बाजूला सारून समष्टीसाठी झिजते. बाई ही केवळ बाई नसते तर ती संस्कृतीची वाहक असते. तिच्या आचार विचारातूनच ती समाजात तात्विक मूल्य पेरण्याचं काम करीत असते. तिच्या प्रथा परंपरा ती जपत असते. परंतु पिढी जाचक रूढी तिला छळतच आल्या आहेत. म्हणून तिही छळवादाला नाकारून चांगले जीवन स्वीकारायला तयार आहे. पण तिला ते निरागस नागरिकत्व आजही मिळायला तयार नाही.
ग्रामीण भागातील विविध जाती समूदायासोबतच वाघरी समाजातील लोकदेवता त्यांच्या विविध चालारीती परंपरा, श्रद्धा – अंधश्रध्देचे मनोभावे दर्शन घडविले आहे.
बाया निंदत आहेत, नॉट रीचेबल, माय मिचुक पोरीचं, पंखांना सर्व्हिसिंग करूही, माय अन् पोर, ईशान्य प्रिय पाखरांनो, खरंच पटत नै, पोरी गायब होताहेत, बिघाभर माय, ग्लोबलची मालन, पोरी नांदत नाही हल्ली, गुगलच्या बांधावर बसून,
तारुण्य पिकल पोरीच, विसर्जन, माहित नाही यांसारख्या कवितांमधून ग्रामीण भागातील स्त्रियांच्या वेगवेगळया दुखांच्या नोंदी कवीने घेतल्या आहेत.
प्रविण पवार यांनी योजलेले ‘भुई आणि बाई’ हे शीर्षक समर्पक आहे. भुई आणि बाईंच्या तुलनात्मक समन्वय संग्रहाच्या मृखपृष्ठावरून दिसून येतो. मुखपृष्ठावरील रेखाटनात काळ्या कसदार मातीतून जन्माला आलेल्या बाईच्या तीन पिढ्यांचा नेटका अर्थबोध सूचित करणाऱ्या आहेत.भुईचे बाईचे टिपलेले मूक आक्रंदन हे या कवितेचे मुख्य वैशिष्ट्ये आहे. वाघरी, अहिराणी, भाट, भिलाऊ, पावरा बोली भाषेतील कठीण शब्दाचा अर्थ दिल्यामुळे कविता समजायला सोपी झाली आहे. इंग्रजी भाषेतील शब्द ही आढळतात उदा गुगल, नॉट रीचेबल, आयव्हीएफ, डिजिटल, रिस्टार्ट, टॉवर नेटवर्क,
मोबाईल इ. शब्दांच्या उपयोजनामुळे कवितेला वैश्विक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. भुई आणि बाई या संग्रहामुळे मराठी ग्रामीण कवितेला नवे तेज प्राप्त झाले आहे. ही नव्या अंगाने कविता लिहिली गेलेली आहे असे ठासून म्हणता येईल. पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा
पुस्तकाचे नाव : भुई आणि बाई (कवितासंग्रह)
संग्रहाचे कवी : प्रविण पवार
प्रकाशक : परीस प्रकाशन पुणे
मुखपृष्ठ : विजय माळी, कापडणे
प्रथम आवृत्ती : २९ ऑक्टोंबर २०२२
पृष्ठ्ये : १०४
किंमत : १५०
•डॉ.युवराज पवार•
३१ अ अभिकला निवास, श्रीनगर कॉलनी शिरपूर जि. धुळे ४२५४०५