टोमॅटो व कांदा पिक सल्ला

टोमॅटो व कांदा पिक सल्ला

टोमॅटो पिक सल्ला
झाडांना आधार व मातीची भर देणे लागवडीनंतर ३० ते ३५ दिवसांनी झाडांची वाढ जोरदार झाल्यानंतर फांद्या व फुटी जोरात फुटतात. त्याकरिता त्यांना बांबू, सुतळी व तार यांनी आधार द्यावा. सरीच्या बाजूला ६ ते ९ फूट उंचीचे लाकडी बांबू जमिनीत रोवून घ्यावेत. जमिनीपासून १ मीटर उंचीवर दोन्ही खांबांवर तार ओढावी व घट्ट बांधून व मध्ये बांबूने आधार द्यावा. झाडाची उंची ३० सें.मी. झाल्यानंतर, झाडाच्या खोडाला सैलसर सुतळी बांधून ती तारेला बांधावी. नंतर जसजसे झाडाला नवीन फांद्या फुटतील, तशा प्रत्येक फांद्या सुतळीने तारेला ओढून बांधाव्यात.
लागवडीनंतर ३० ते ४५ दिवसांत झाडांना मातीची भर द्यावी. यासाठी झाडाच्या समोरील अर्धी सरी फोडून झाडाच्या बाजूस माती लावावी, त्यामुळे झाडाच्या खोडाला आधार मिळतो आणि मुळ्या फुटण्यास मदत होते. मातीतील हवेचे प्रमाण योग्य राहण्यास मदत होते. मातीची भर देताना झाड मातीमध्ये जास्त गाडले जाणार नाही, याची काळजी घ्यावी.


कांदा पिक सल्ला
रब्बी (उन्हाळ) कांदा रोपांची पुनर्लागवड सपाट वाफे पद्धतीमध्ये पाणी देऊन रोपांची लागवड केली जाते. काही ठिकाणी कोरडी लागवड करतात. परंतु या पद्धतीत रोपांची लागवड केल्याबरोबर पाठोपाठ वाफ्यातून पाणी द्यावे. पाणी देताना रोप वाहू नये, म्हणून वाफ्याच्या तोंडावर गवताची पेंडी लावून पाण्यावर नियंत्रण ठेवावे. ओली लागवड करताना पुरेसे पाणी राहील, याची काळजी घ्यावी. तसेच रोपांची संख्या ठराविक असावी. दोन ओळींमध्ये १५ सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेवून ५० ते ५५ दिवसांच्या रोपांची पुनर्लागवड करावी. पुनर्लागवडीकरिता खूप जास्त वाढलेली किंवा अतिशय कोवळी रोपे लावणे टाळावे. रोपे उपटल्यानंतर त्यांच्या पानांचा शेंड्यांकडील एक तृतीयांश भाग पुनर्लागवडीपूर्वी कापून टाकावा. कार्बेंडाझिम १ ग्रॅम अधिक कार्बोसल्फान २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात रोपांची मुळे दोन तास बुडवून नंतरच पुनर्लागवड करावी. यामुळे रोपवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थ्येमध्ये बुरशीजन्य रोग व फुलकिडींपासून पिकाचे संरक्षण होते. रोपे लागवड करताना ती अंगठ्याने दाबू नयेत, यामुळे माना वाकड्या होऊन वाढीस वेळ लागतो. ठिबक किंवा तुषार सिंचनावर लागवड करताना संच रोप लागवडीअगोदर सुरू करावा. सरासरी ४ सें.मी. खोलीपर्यंत ओल राहील, इतपत पाणी द्यावे. दुसऱ्या दिवशी वाफ्यावर लागवड करून त्यानंतर पाणी द्यावे. पुनर्लागवडीपूर्वी किंवा पुनर्लागवडीच्या वेळी, ऑक्‍सिफ्लोरफेन (२३.५ ईसी) १.५-२ मि.लि. किंवा पेंडीमिथेलीन (३० ईसी) ३.५-४ मि.लि. प्रति लिटर पाणी याप्रमाणे तणनाशक जमिनीवर फवारावे.

Leave a Comment