पडझडीचे वर्ष 2023
दैनिक पोलीस शोध
संपादकीय
पडझडीचे वर्ष 2023 !
देशात 2020 पासून ते 2022 पर्यंत कोरोना विषाणूने थैमान माजविले होते. त्यामुळे या दोन वर्षात देशात सर्वच क्षेत्रात झालेली पडझड आणि लोकांचे मृत्यू विसरता येणार नाहीत. त्याच प्रमाणे 2023 मध्ये संपूर्ण वर्षात कोरोनाचे संकट नसले तरी या वर्षात सर्वच क्षेत्रात पडझड झालेली दिसते. विशेषताः शेतकरी आणि विरोधी पक्षासाठी या वर्षात कोणतीही अनुकूलता नव्हती.
सामाजिक, राजकीय, आर्थिक, कृषी, क्रीडा, रोजगार या सर्वच क्षेत्रात 2023 मध्ये खूप आनंददायी किंवा समाधानकारक घटनाक्रम घडले असे नाही. सामाजिक स्तरावर सामान्य माणूस त्रस्त होता तर देशभरात महिलांवरील झालेल्या अत्याचाराच्या घटना या लाजीवरवाण्या तर होत्याच परंतू मणीपूरची महिलांची नग्न धिंड देशासाठी सामाजिक स्तरावर लज्जास्पद होती. देशातील अनेक घटना या सामाजिक स्तरावर चिंतन करायला लावणार्या होत्या. ज्यामध्ये लव जिहाद सारख्या घटनेचापण समावेश करता येईल.
राज्याच्या दृष्टीने विचार केल्यास महापूरूषांसाठी केलेले अवमानजनक वक्तव्ये ही विकृत मानसिकतेतून झालेली असल्याचे निष्पन्न होते. राजकीय पटलावर 2023 हे वर्ष मोठ्या प्रमाणावर गाजले या वर्षात 9 राज्यांच्या निवडणूका झाल्या. या नऊ राज्यातील निवडणूकांकडे 2024 च्या लोकसभा निवडणूकीची सेमीफायनल म्हणून पाहिले गेले. या 9 राज्यातील निवडणूकीत पाच राज्य भाजपाकडे गेली, ज्यामध्ये मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, त्रिपूरा, व नागालॅड यांचा समावेश आहे. परंतू काँग्रेस पक्षासाठी या निवडणूकीत अनुकूल निकाल न लागता हातात असलेले राजस्थान, छत्तीसगड सारखी दोन राज्ये निघून गेली. त्याच बरोबर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सुद्धा पडझड झाली. ‘मातोश्रीवर’ शिवसेनेसारख्या 55 वर्षाच्या संघटनेत मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. तर बारामतीची वतनदारीसुद्धा दोन भागात विभागली गेली. राष्ट्रवादी पक्ष एैन पंचविशीत दोन तुकड्यात विभागला गेला. तर तेलगांना सारख्या राज्यात के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षाची एकहाती सत्ता असतांना त्यांनी महाराष्ट्रात का म्हणून लक्ष घातले. ज्यामुळे त्यांची तेलगांना राज्यातील सत्ता हातातून निघून गेली.
कृषी क्षेत्रात देखील 2023 मध्ये मोठ्या प्रमाणावर पडझड झाली. संततधार पाऊस व गारपीटीमुळे खरीप हंगाम शेतकर्यांच्या हातातून गेला. रब्बी हंगामात नुकसान भरून काढता येईल या अपेक्षेने शेतकरी पुन्हा कामाला लागला. परंतू अवकाळीने रब्बी हंगामावर सुद्धा पाणी फिरविले. आणि 2023 च्या वर्षभरातील उत्पादनात शेतकर्यांच्या हातात काहीच आले नाही. कांदा, कापूस, सोयाबीन, उडीद, मुग, हरभरा, संत्रा, द्राक्षे यासारखी रोख पिकांसह फळ पिकांमध्ये सुद्धा शेतकर्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकरी पूर्णपणे नागावला गेला, गोष्टी इथेच थांबली नाही तर कांद्यांचे भाव गडगडले, कापूस पाच ते सहा हजार रूपयांचा आला, सोयाबीन मातीत मिसळले, टोमॅटोवर शेतकर्यांनी ट्रॅक्टर फिरविला, पपई, द्राक्षे यासारखी पिके जमीनदोस्त झाली, केळीचे भाव गडगडले आणि उसाचे भाव वाढलेच नाहीत. त्यामुळे शेतकर्याला उठण्याची संधीच मिळाली नाही. ‘राहु’ चा मारा संपला की, ‘केतू’ ने घेराव घातला. अशा दृष्ट चक्रात शेतकरी सापडला त्यामुळे हे वर्ष शेतकर्यांसाठी पूर्णपणे पडझडीचे वर्ष ठरले.
क्रीडा क्षेत्रात वर्ल्ड कपमध्ये 10 मॅचेस जिंकणारा भारत अंतीम सामन्यात मात्र पराभूत झाला आणि देशातील तरूणांनी दिवाळी सणासाठी दुपटीने खरेदी करून ठेवलेले फटाके तसेच पडून राहिलेत. तर जंतर-मंतरवर तब्बल 40 दिवस आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटू खेळाडूंनी आपल्यावर लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करत कुस्ती महासंघाचा अध्यक्ष खासदार ब्रिजभूषणसिंह यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यातून कोणतेही निष्पन्न न झाल्याने खेळाडूंनी आपले ‘पद्मश्री’ पुरस्कार वापसीचा निर्णय घेतला. साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया सारख्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सरकारवर रोष प्रकट करत साक्षी मलिकने आंतरराष्ट्रीय खेळातून निवृत्ती घेतली तर बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार पंतप्रधानांच्या पायरीवर ठेवला. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात झालेली पडझड न भरून निघणारी अशीच मानली गेली.
याच सोबत माजी खासदार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ खालीद अझीम यांची पोलीस कोठडीत गोळ्या घालून झालेली हत्त्या ही यावर्षातील सर्वात खळबळजनक घटना ठरली. तर जयपूरला राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामडी यांच्या घरात घुसून हत्यारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या यात गोगामडी यांचा मृत्यू झाला. राजपूत समाजाचे राष्ट्रीय नेते म्हणून त्यांची ओळख होती.
उत्तराखंडातील जोशीमठ डोंगराला तडे पडून खचण्याची घटना देखील देशभर गाजली. तर याच राज्यातील सिल्क्यारा बोगदा कोसळल्याने त्यात 41 मजूर अडकले त्यांना 19 दिवसानंतर बाहेर काढण्यात आले. तर ओडीशात बालासोरमध्ये शालिमार चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्सप्रेस, बंगलूर-हावडा सुपरफास्ट एक्सप्रेस आणि एका मालगाडीचा झालेला अपघात देशभर गाजाला या अपघातात 300 प्रवाशांचा मृत्यू झाला.
तसेच राज्यात समृद्धी महामार्गावर अपघातांच्या मालिका वर्षभर गाजत राहिल्या. एका खाजगी प्रवाशी बसला झालेल्या अपघातात बसने पेट घेतल्याने त्यात 40 च्या जवळपास प्रवाशांचा कोळसा झाला. अशा अनेक घटनांनी 2023 वर्ष गाजत राहिले.
आरोग्य क्षेत्रात देखील देशातील अनेक रूग्णालयांमध्ये लहान बालकांचे मानवी अक्षम्य चुकांमूळे मृत्यू झाले. आरोग्य व्यवस्था देशात आजही कोमात आहे, हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. भारतीय रूपया देखील गटांगळ्या खात राहिला. त्यामुळे भारताच्या आर्थिक स्थितीत पडझड होतच राहिली. उरलेल्या शेवटच्या महिन्यात देखील नव्या संसद भावनात दोन तरूणांनी उड्या घेत संसदेत धुराच्या नळकांड्या फोडल्या आणि संसदेची सुरक्षा व्यवस्था किती मोडकी आहे हे सिद्ध करून दाखविले.
2022-23 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध गाजत राहिले आणि 2023 मध्ये इस्त्रायल-हमास युद्धाने हजारो निरपराध नागरीकांचे प्राण गेले.
अर्थात या वर्षात काही चांगल्या घटनाही घडल्या असतील परंतू या वर्षात वर्षभर शेतकर्यांच्या डोळ्यात ‘अश्रू’ राहिलेत. त्यामुळे या वर्षातील काही आंनदाचे क्षण आम्ही पाहू शकलो नाहीत. सामान्य माणसाच्या चेहर्यावर हास्य नसेल, शेतकर्यांच्या डोळ्यात आनंदाची चमक नसेल तर या वर्षाला ‘पडझडीचे वर्ष’ या शिवाय दुसरे काय म्हणणार ?
मातृभूमीचा सेवक, अन्नदाताच दुखी असेल तर संपूर्ण जग आनंदात राहू शकत नाही म्हणून या वर्षाला निरोप देतांना सुद्धा आमच्या समाजवादी मित्राला वाईट वाटत नाही. विशेष म्हणजे या वर्षात अधिकमास आला होता, परंतू तो देखील दुष्काळत तेरावा महिना ठरला म्हणून;
अलविदा…..बाय..बाय…बाय.. 2023. भेटूया 2024 मध्ये आनंदाच्या एका नव्या पर्वासाठी.
तुर्तास एव्हढेच.