पीएम नमो पासून ९३ हजार शेतकरी वंचित
नमो शेतकारी महा सम्मान निधि योजना
सौजन्य : अग्रोवन
दिनांक : 02-Dec-23
राज्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या पंधराव्या हप्त्यापासून वंचित
राज्यातील ९३ हजार शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेच्या पंधराव्या हप्त्यापासून वंचित राहावे लागले आहे. आधार क्रमांकाशी बॅंक खाते संलग्न न केल्यामुळे हा गोंधळ झाला आहे. याच शेतकऱ्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळालेला नाही. या शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आता सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू आहे.केंद्राने मदत दिलेल्या शेतकऱ्यांनाच राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी पात्र ठरविले आहे. त्यामुळे केंद्राच्या हप्त्यासाठी तात्पुरत्या अपात्र ठरलेल्या ९३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना ‘नमो’चा पहिला हप्ता मिळालेला नाही. सध्या राज्य शासनाकडून ‘नमो’चा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यासाठी नियोजन सुरू आहे.“पंधरावा हप्ता जमा केलेल्या शेतकऱ्यांची माहिती आम्ही केंद्राकडे मागितली आहे. ही माहिती आठवडाभरात प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या माहितीची छाननी करून महाआयटीकडून ‘नमो’चा दुसरा हप्ता डिसेंबरअखेर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात वर्ग केला जाईल,” असे सूत्रांचे म्हणणे आहे.“आधार संलग्न बॅंक खात्यातच शेतकऱ्याचा निधी पाठवला जाईल, अशी सूचना केंद्राने पुन्हा केली होती. परंतु, चौदावा हप्ता देताना अट शिथिल केली. त्यामुळे राज्यातील ८५.६० लाख शेतकऱ्यांना चौदावा हप्ता मिळाला. परंतु, १५ नोव्हेंबरला पंधरावा हप्ता जमा करताना अट पुन्हा लागू करीत फक्त आधार संलग्न बॅंक खात्यातच रकमा जमा केल्या गेल्या.
त्यामुळे केवळ ८४.६७ लाख शेतकऱ्यांना निधी मिळाला. आधार संलग्नता नसलेल्या ९० हजाराहून अधिक शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. अर्थात, वितरित न केली गेलेली रक्कम आधार संलग्नता होताच शेतकऱ्याला मिळवून देण्याची सुविधा केंद्राने ठेवलेली आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले. खरीप व रब्बी पिकाविषयक आठवडी मोफत सल्ला
महसूल विभागाकडे आधी पीएम किसान योजनेची जबाबदारी
महसूल विभागाकडे आधी पीएम किसान योजनेची जबाबदारी होती. शेतकऱ्यांच्या भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करा, शेतकऱ्यांची बॅंक खाती आधार संलग्न करून घ्या तसेच सर्व पात्र शेतकऱ्यांच्या ई-केवायसी (अर्जदाराची वैध ओळख) करून घ्या, अशा तीन सूचना केंद्र शासनाने राज्याला दिलेल्या होत्या. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले. या तीनही अटींमध्ये केवळ ७० लाख शेतकरी पात्र ठरत होते.
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पीएम किसान योजनेची जबाबदारी राज्याच्या कृषी विभागाकडे देण्यात आल्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये ई-केवायसी व आधार संलग्नता अभियान राबविण्यात आले. या कामांमध्ये क्षेत्रिय यंत्रणेने शेतकऱ्यांची खेडोपाडी, शेतशिवारात भेट घेत आधीची अटींची पूर्तता करून घेतली.
त्यामुळेच लाभार्थी संख्या वाढली व तेराव्या हप्त्यापोटी ८१.१३ लाख शेतकऱ्यांना जवळपास १६५० कोटी रुपयांची मदत मिळाली. भूमी अभिलेख यंत्रणेनेदेखील नोंदी अद्ययावत करण्यात आघाडी घेतली. त्यामुळे या अटी पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ७० लाखांवरून थेट ८४.५० लाखाच्या पुढे गेली.विस्तार व प्रशिक्षण विभागाचे कृषी संचालक दिलीप झेंडे म्हणाले, ‘‘कृषी विभागाच्या यंत्रणेने उत्तम काम केल्यामुळे १४ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण होऊ शकली. त्यामुळेच पीएम किसानचा चौदावा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या ८५ लाखांच्या पुढे गेली आहे. मात्र, पंधराव्या हप्त्यासाठी आधार संलग्नता सक्तीची केल्यामुळे एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना हप्ता मिळण्यात अडचणी आल्या.’’
थोडक्यात महत्त्वाचे
– लाभार्थी वाढविण्यासाठी यंत्रणांची धावपळ
-‘नमो’चा दुसरा हप्ता देण्याचे नियोजन सुरू; डिसेंबरअखेर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याची शक्यता
– थकीत व पुढील हप्त्यासाठी बॅंक खात्याशी आधार संलग्न करण्याचे आवाहन
– कृषी विभागाच्या यंत्रणेने उत्तम काम केल्याने १४ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण
आधार संलग्नता, ई-केवायसीची पूर्तता न केलेल्या शेतकऱ्यांनी आता कृषी सहायकाची मदत घेत त्याची पूर्तता करून घ्यावी. त्यामुळे थकीत हप्ता व सोळावा हप्ता मिळण्यात अडचणी येणार नाहीत.
– दिलीप झेंडे, कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विभाग.