विद्यार्थीनींना आता उच्च शिक्षणाची कवाडे खुली
शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून राज्यातील 20 लाखांहून अधिक विद्यार्थीनींना आता उच्च शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत. उच्च शिक्षण घेवू इच्छिणार्या मात्र आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणार्या किंवा अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागणार्या विद्यार्थीनींना आता कला-विज्ञान-वाणिज्य शिक्षणाबरोबरच वैद्यकीय, अभियांत्रिकी सारख्या आठशे अभ्यासक्रमांमध्ये मोफत शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे मुलींच्या शिक्षणाची पालकांना असलेली चिंता आता मिटेल असा निर्णय राज्य सरकारने नुकताच घोषित केला आहे.
आपल्या देशाची विभागणी साधारणपणे प्रमुख दोन भागात केली जाते, आधुनिक भारत आणि ग्रामीण भारत. महाराष्ट्रात देखील प्रगत महाराष्ट्र, आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा पद्धतीने दोन भागात राज्याची विभागणी केली जाते.
या दोन भागांचे वर्गीकरण सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक-प्रगत-अप्रगत-सुविधा-असुविधा अशा अनेक स्तरांवर करता येते. राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने महिलांसाठी, तरूणींसाठी अनेक योजनांची घोषणा केली असली तरी मुलींना शिक्षण घेतांना आजही तारेवरची कसरत करावी लागते. आणि मुलींच्या शिक्षणाची तारांबळ कुणाला प्रत्यक्ष बघायची असेल तर त्यांनी या राज्यात कोणत्याही जिल्ह्यात बसने प्रवास करावा. आणि त्या बस प्रवासात लक्षात येते की, या राज्यातील हजारो मुली आजही शिक्षणासाठी खेड्यातून बसमध्ये बसतात आणि जवळच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी दररोज अपडाऊन (ये-जा) करतात.
कारण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या जागी आजही पालक आपल्या आर्थिक स्थितीमुळे रूम करून आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी सोय करू शकत नाहीत. घोषणा खुप आहेत परंतू ग्रामीण भागातील मुली तालुक्याच्या ठिकाणी असल्याच्या तरूणी आजही शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर धावपळ करतांना दिसतात. घरातली कामे करून या मुली दप्तर घेवून टिफीन घेवून रोडवर येवून बसची वाट पाहतांना दिसतात. गावाचा थांबा नसलेल्या लांबपल्ल्याच्या बसेस सरळ निघून जातात. परंतू गावा-गावाचा थांबा असलेल्या बसेस या मुलींना घेवून त्यांच्या ठिकाणी त्यांना पोहचवितात. माध्यमिक शिक्षण, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, नर्सिंग, फार्मसी, आयटीआय अशा कितीतरी अभ्यासक्रमांच्या मुली दररोज प्रवास करतात. प्रवासात त्यांना बसायला जागा मिळत नाही, म्हणून त्या उभ्याने प्रवास करतांना दिसतात. दिवसभर आपले शिक्षण घेवून परत घरी पोहचतात. घरी आल्यावर आईला कामाला मदत करतात, रात्री अभ्यास करतात, पुन्हा दुसर्या दिवशी शिक्षणासाठी बसच्या थांब्यावर उभ्या दिसतात.
त्यामुळे दररोज प्रवास करून शहरात शिक्षण घेणार्या मुलींच्या आईचे ‘मन’ आणि बापाचे ‘हृदय’ हे चिंतेत असते हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. घरचा डबा घेवून जाणारी आपली तरूण लेक म्हणजे आई-वडीलांसाठी एक मोठी जबाबदारी असते. त्यातच तिच्या शिक्षणाचा खर्च, लग्नासाठी लागणारा खर्च म्हणून पालक चिंताग्रस्त असतात. याच आर्थिक विवंचनेमुळे पालक दहावी, बारावी किंवा पदवी पर्यंतचे शिक्षण आटोपले की मुलीच्या लग्नाच्या तयारीला लागतात. एका जबाबदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. मुलीच्या बापाच्या या ‘वेदना’ समाजाला दिसत नाहीत. परंतू ज्या घरात मुलगी असते ना.. त्या घरातील आई ही घारीसारखी आपल्या मुलीसाठी शरीराने आणि मनाने तिच्या भोवती घिरट्या घालत असते. आणि यातूनच ‘मुलगी नको’ अशी धारणा समाजात रूजली आहे. वंशाला दिवा हवा परंतू तो दिवा लावण्यासाठी दिवटीपण हवी हे अपूर्ण ज्ञान असलेल्या समाजाला कधी कळेल ? अर्थात ज्या घरात मुलगी असते ना..
त्या घरात साक्षात ‘लक्ष्मी’ असते. आणि ते घर नेहमी हसत असत. परंतू राक्षसांना मुलींचे ‘गर्भपात’ करायला आवडतात. आणि राक्षसी मनोवृत्तीच्या डॉक्टरांना गर्भलिंग चाचणीत हवा असतो केवळ पैसा. परंतू एक गर्भलिंग चाचणीचे ‘पाप’ त्यांच्या खात्यावर जमा होत असते हे ते ‘पापकृत्य’ करणार्या डॉक्टरांना देखील कळत नाही. म्हणून मुलीचा जन्म हा आता ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या घोषणेपर्यंत येवून पाहचला आहे. परंतू सरकारने उशिरा का असेना एक चांगला निर्णय घेण्याची बुद्धी सुचली आहे, जाग आली आहे. आणि या निर्णयातून जवळपास 842 अभ्यासक्रमांसाठी मुली आता शिक्षण घेवू शकतील. त्यामुळे मुलींनो खुप शिका आणि मुलींकडे समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलायला भाग पाडा.
‘चुल आणि मुल’, सातच्या आत घरात, चार भिंतीच्या आड, जिच्या हातात पाळण्याची दोरी ती घर उद्धारी या जुन्या संकल्पनांना आता पूर्णपणे कालबाह्य करण्याची वेळ आलेली आहे, तिला शिक्षणाच्या माध्यमातून बदलण्यासाठी मुलींनी शिक्षणाच्या या संधीचा फायदा घेण्याचा निश्चय करावा. आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महिलांसाठी खुली केलेली शिक्षणाची कवाडे आता खर्या अर्थाने मुलींचे स्वागत करतील. म्हणून पालकांनी सुद्धा मुलींना उच्च शिक्षण घेण्यासाठी संधी उपलब्ध करून द्यावी. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत मुलींना मोफत शिक्षणाच्या संधी या राज्यात उपलब्ध झाल्या आहेत.
त्यामुळे पालकांनी आता आपल्या घरात मुलींना जन्म घेवू द्या, त्यांच्या जन्माचे जल्लोषात स्वागत करा, मुलींना खुप शिकवा, शिक्षणाची एकही संधी घालवू नका. मुलांच्या पालकांनी आपल्या मुलीला मागणी घातली पाहिजे, मुलांचा बायोटाडा आणि फोटो मुलींकडे आले पाहिजेत किंबहुना मुलीने घोड्यावर बसून मुलाच्या घरी येण्याची वेळ येवू द्या. परंतू मुली आणि महिलांच्या संदर्भातील या समाजाचे बुरसटलेले विचार मुलींच्या शिक्षणाच्या माध्यमातून दूर झाले पाहिजेत असे आमच्या समाजवादी मित्राला वाटते.
शिक्षणाशिवाय महिलांवर होणारे अत्याचार थांबणार नाहीत, महिलांना मान,सन्मान मिळणार नाही, महिलांना समान संधी मिळणार नाहीत. एकमात्र निश्चित मुलींनी कितीही उच्च शिक्षण घेतले तरी आपली भारतीय संस्कृती, भारतीय संस्कार, भारतीय परंपरा यांना तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी. सुन आणि मुलगी या दोन्हींमध्ये समाज फरक करणार नाही अशा पद्धतीने समाजाची मानसिकता आपल्या शिक्षणातून मुलींनी बदलावी. शिक्षणाच्या माध्यमातून क्रांती करण्याची ही संधी आहे. पालकांनी मग ते शहरी असोत किंवा ग्रामीण त्यांनी आपल्या मुलींसाठी शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा, मुलींना डॉक्टर, बनावा, आयटी क्षेत्रात इंजिनिअर बनवा परंतु त्यांचे शिक्षण अपूर्ण ठेवू नका येणार्या काळात महिलाच या समाजाचे, देशाचे नेतृत्व करतील यात शकां नाही.
म्हणून महिलांनी आपल्या आत्मसन्मानासाठी पुढे पाऊल टाकून आकाशाला गवसणी घालण्याची आवश्यकता आहे. कारण ‘यत्र नार्यस्तू पूज्यन्ते रमंन्ते तत्र देवता..’ जेथे स्त्रियांचा आदर होतो तिथेच ईश्वर निवास करतात म्हणून मुलींचा, महिलांचा सन्मान घरा-घरात व्हावा.
3 thoughts on “मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा !”