राम

राम


नचिकेत कोळपकर

राम या एका शब्दाने भारतीय उपखंडात सर्वात जास्त प्रभाव टाकला आहे. प्रत्येकाच्या हृदयात रामा बद्दल आस्था प्रेम आहे. हजारो वर्षा पासून रामायण या महाकाव्याने जनतेच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. संता पासून राजकीय व्यक्ती पर्यन्त सर्वानाच रामाने वेड लावलं आहे. राम खरा की खोटा, यापेक्षा जीवन जगण्याचे तत्वज्ञान रामकथांनी दिले आहे.रामाच्या नावाने राजकारण करून द्वेष पसरविणाऱ्याची संख्या कमी नाही.म्हणूनच संतांचा राम, गांधीजींचा राम समजून घेण्याची आज खरी गरज निर्माण झाली आहे. रामायण


संतांनी मांडलेल्या रामाने जनतेला जीवन जगण्याची दिशा दाखविण्याचे काम केले आहे.संत नामदेव, तुकोबा, संत एकनाथ महाराज यांनी राम कथांच्या माध्यमातून नीती विचार मांडले.भेदाभेद नाहीसे करण्याचा प्रयत्न केला. प्रेमाचा मानवतेचा संदेश दिला. गंगा काठी भिल्ल मित्राला गळाभेट घेऊन समान दर्जा देणारा राम, शबरीची बोरे खाणारा राम, भावासाठी राज्य त्यागणारा राम ही प्रेमाची त्यागाची समतेची मूल्ये रुजविणारा राम जनमाणसाच्या हृदयात घर करून राहीला आहे. संत कबीराने राम रहीम एक मानून धर्माच्या चौकटीतून रामाला बाहेर काढून सर्वाचे बनविले.जय श्री राम


या सर्वांच्याच मनातील राम हा कोणी कट्टर हिंसक धार्मिक ऐतिहासिक राम नसून मानवतावादी प्रजावत्सल, आदर्श राजा राम आहे. त्याचे राज्य रामराज्य आहे. हाच राम त्यांना शिवरायांमध्ये दिसला आणि म्हणूनच तुकाराम महाराजांनी म्हटले की,

आले आले राम राज्य
आम्हा सुखा काय उणे.

महात्मा गांधीजींना ही संतांच्या या रामाने भुरळ घातली होती. 1946 मध्ये गांधींनी लिहिले की, माझा राम, माझ्या प्रार्थनेचा राम, अयोध्येचा राजा दशरथाचा पुत्र, हा ऐतिहासिक राम नाही. तो अनंत आणि अजन्मा आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गांधींच्या स्वप्नातील खरे ‘रामराज्य’ पुन्हा समजून घेण्याची गरज आहे. गांधीजी म्हणाले होते- ‘स्वराज्याचे कितीही अर्थ काढले तरी माझ्यासाठी त्रिकाल सत्याचा एकच अर्थ आहे आणि तो म्हणजे रामराज्य. रामराज्य या शब्दाबद्दल कोणाला वाईट वाटत असेल तर मी त्याला धर्मराज्य म्हणेन. रामराज्य या शब्दाचा अर्थ असा आहे की त्यामध्ये गरिबांचे पूर्ण संरक्षण होईल, सर्व कार्य नीतीने केले जाईल आणि जनमताचा नेहमी आदर केला जाईल. खरे चिंतन तेच आहे ज्यामध्ये रामराज्यासाठी योग्य साधनांचाच वापर केला गेला आहे.


रामराज्य स्थापनेसाठी आम्हाला कोणत्याही विद्वत्तेची गरज नाही हे लक्षात ठेवा. ज्या गुणवत्तेची गरज आहे ती सर्व वर्गातील लोकांमध्ये – पुरुष, महिला, मुले आणि वृद्ध – आणि आजही सर्व धर्माच्या लोकांमध्ये आहे दु:ख एवढेच आहे की त्या व्यक्तिमत्त्वाला अजून प्रत्येकजण ओळखू शकलेला नाही. सत्य, अहिंसा, प्रतिष्ठा, शौर्य, क्षमा, संयम इ. आपल्यापैकी प्रत्येकाला हवे असेल तर आज आपल्यापैकी प्रत्येकाला त्याची ओळख करून देता येणार नाही का? याही पुढे जाऊन रामराज्यातील महिलांच्या सहभागा विषयी बोलतांना 1925 मध्ये महिलांच्या एका विशेष सभेत महात्मा गांधी म्हणाले होते जोपर्यंत भारतातील महिला सार्वजनिक जीवनात सहभागी होत नाहीत तोपर्यंत भारताचा उद्धार होऊ शकत नाही. पण जे शरीर आणि मनाने शुद्ध असतील त्यांनाच सार्वजनिक जीवनात सहभागी होता येईल. ज्यांचे शरीर आणि मन एकाच दिशेने – पवित्र दिशेने चालले आहे, जोपर्यंत अशा स्त्रियांनी भारताचे सार्वजनिक जीवन पवित्र केले नाही, तोपर्यंत रामराज्य किंवा स्वराज्य अशक्य आहे. गांधीजींच्या राम राज्यात जातीव्यस्था आपसी प्रेम संबंधाने बांधलेली असावी हाच विचार आहे . जाती जातीतील तेढ निर्माण करणारे हे रामराज्य निर्माण करू शकत नाहीत हेच गांधीजी सांगत असत. गांधींनी ईश्वर-अल्ला ही दोन्ही नावे रघुपती राघव राजा राम यांच्याशी जोडली आणि रामधुन हा स्वातंत्र्य लढ्याचा विषय बनवून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनवले. भारताची उदारमतवादी आणि सहिष्णु परंपरा वाचवण्यासाठी आणि देशात पसरलेला द्वेष आणि जातीयवाद नष्ट करण्यासाठी गांधींनी रामनाम केले. शारिरीक, मानसिक आणि नैतिक व्याधी बरे करण्यासाठी राम नावाचे उत्तम औषध असे गांधींनी वर्णन केले.
संत तुलसीदास यांची भावनाही याहून वेगळी नव्हती.
ते म्हणतात

दैहिक दैविक भौतिक तापा। राम राज नहिं काहुहि ब्याप।।
सब नर करहिं परस्पर प्रीती। चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीत।।


म्हणजेच ‘रामराज्या’मध्ये कोणत्याही मानवाला शारीरिक, दैवी आणि भौतिक समस्यांनी त्रस्त होण्याची गरज नाही. सर्व मानव एकमेकांच्या प्रेमाने जगतात. प्रत्येक जण आपापल्या मानवतावादी धर्माचे पालन करतात.मानवता मुळाशी असलेले राज्य म्हणजे राम राज्य हीच संकल्पना संत तुलसीदास ही मांडतात. मात्र सोयी पुरते महात्म्यांना वापरणे ही एक वेगळीच संस्कृती हल्ली रुजत चालली आहे. त्यामुळे मूळ विचार बाजूला राहतो. गांधींसाठी, राम हे सर्वव्यापी दैवी शक्तीचे मूर्त स्वरूप होते. गांधींच्या मते, रामाला केवळ ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व मानून त्यांच्या अस्तित्वाचे पुरावे शोधणे म्हणजे भरकटल्यासारखे होते. स्वतःच्या रामाशी एकरूप होणे हे गांधींच्या नैतिक जीवनाचे ध्येय होते, कारण त्यांच्यासाठी राम नैतिक प्रतिष्ठेचा स्रोतही होता. त्यांनी रामाचे नाव अतुलनीय मानले आणि हा नामजप ही त्यांच्या आंतरिक देवत्वाला हाक मारण्याची प्रक्रिया होती. गांधींच्या रामावर हिंदू धर्माची मक्तेदारी नव्हती. त्यांचा राम हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन सर्वांचा होता.

रघुपती राघव राजा राम , पतित पावन सीता राम
ईश्वर अल्ला तेरो नाम ,सबको सन्मती दे भगवान

Leave a Comment