रामाचा पाळणा

रामाचा पाळणा

अयोध्या नगरीस आनंद झाला
सूर्यवंशात पुत्र जन्मला
सूर्यासम तेजस्वी बालक जन्मला
सूर्य ही आज लाजून उगवला
जो बाळा जो जो रे जो ।।

पुत्र जेष्ठ राम चार अनुज
भरत शत्रुघ्न लक्ष्मण नाम
चक्रवर्ती सम्राट दशरथ राज
सजली अयोध्या दीपमालासम
जो बाळा जो जो रे जो ।।

कले कलेने वाढतसे हा जगजेठी
दैत्यनाशासाठी अवतार धारी
आदर्शांची करी पायाभरणी
धर्म रक्षणासाठी सदैव तत्पर राम
जो बाळा जो जो रे जो ।।

पिता वचनासाठी वनवासी गेला
राज्याचा मोह ना कधी त्यासी पडला
यज्ञ रक्षून क्षात्रधर्म पाळला
दुष्ट रावण धारातिर्थी पाडला
जो बाळा जो जो रे जो ।।

त्रिभुवन सुंदरी भार्या जानकी
काया मने वचने एकरूप तियेसी
एक पत्नीव्रत आचरीले जीवनी
स्त्री सन्मानाची देतसे ग्वाही
जो बाळा जो जो रे जो ।।

नाम श्रीरामाचे वदता मुखी
भवसागर तरणार जीवनी
प्रभुनामात आहेच ती शक्ती
मंत्र जपू आज रामनवमीदिनी
जो बाळा जो जो रे जो ।।

डाॅ. शैलजा करोडे ©®
नेरूळ नवी मुंबई