विधानसभेत बच्चू कडू नावाचा एकच ढाण्या वाघ बोलतो
दैनिक पोलीस शोध
संपादकीय…
विधानसभेत बच्चू कडू नावाचा
एकच ढाण्या वाघ बोलतो !
राज्याच्या विधानसभेत 278 सदस्य आमदार आहेत. त्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार व मंत्र्यांसह महाविकास आघाडीच्या तीन पक्षाचे आमदार व विरोधी पक्षनेत्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासह इतर मित्र पक्षांचे देखील लोकप्रतिनिधी या सभागृहात आहेत. विधान परिषदेचे सदस्य देखील या सभागृहात आहेत. नागपूर येथे दि. 7 डिसेंबर पासून हिवाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यातील विविध ज्वलंत प्रश्न नागरिकांना सतावत आहेत. परंतू या प्रश्नावर बच्चू कडू नावाचा एकटा ढाण्या वाघ बोलतांना दिसतो.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील शेतकरी उध्वस्त झालेला असतांना सत्ताधारी पक्ष केवळ त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहे. जवळपास तीन हजार शेतकर्यांनी आत्महत्या केलेल्या असतांना सुध्दा विरोधी पक्ष विधान सभेत आक्रमकतेने प्रश्न मांडण्यासाठी किंवा सरकारला धारेवर धरण्यात अपयशी ठरत आहे. अधिवेशनातून ही शेतकर्यांना काही मिळणार नाही किंवा राज्यातील ज्वलंत प्रश्न देखील राज्यासमोर येणार नाहीत हे नक्की. हिवाळी अधिवेशन आता संपण्याच्या मार्गावर आहे. या अधिवेशतून राज्यातील जनतेला काय मिळाले ? असा प्रश्न कोणी विचारला तर मोठा भोपळा असे त्याचे उत्तर देता येईल.
या अधिवेशनाचे निमित्ताने सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यासह विरोधी पक्ष नेत्यांच्या कामगिरीची चर्चा सुरु झाली आहे. त्यात काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडवेट्टीवार यांच्या कामगिरीवर चर्चा सुरु झाली आहे. विजय वडवेट्टीवार यांच्यापेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे विधान परिषदेतील काम अधिक प्रभावी असल्याचे दिसते आहे. अंबादास दानवे ज्या पध्दतीने सत्ताधारी पक्षावर तुटून पडतांना दिसत आहेत तसे वडवेट्टीवार दिसले नाहीत. वडवेट्टीवार भाजपाच्या वाटेवर तर नाहीत ना? अशी चर्चा देखील विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये होऊ लागली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचे जीवंत उदाहरण काँग्रेस पक्षांसमोर आहे.
वास्तविक पाहता महाविकास आघाडीच्या तीन्ही पक्षांनी अधिवेशनापूर्वी संयुक्त बैठक घेवून अधिवेशन काळात सत्ताधारी पक्षाला राज्यातील विविध ज्वलंत प्रश्नांसाठी रणनिती आखायला हवी, परंतू आपल्या पक्षाच्या रणनितीत दूसर्या पक्षाला का समाविष्ठ करुन घ्यायचे ? अशा अहंम भूमिकेतून विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण होत नाही हे मान्य करावे लागेल. एकेकाळी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विलासराव देशमुख विरोधी पक्षात असतांना ज्या आक्रमण भूमिकेत विधानसभेचे अधिवेशन गाजवायचे तो काळ पून्हा येणे नाही असे आताच्या विरोधी पक्षांच्या कामाकाजाकडे पाहुन वाटते.
सत्ताधारी पक्षाला आणि उत्तर देणार्या मत्र्यांना घाम फुटत असे अशा प्रकारची कामगिरी आम्ही पाहिलेली आहे. परंतू अलिकडच्या काळात अशा प्रकारचा विरोधी पक्षनेता दिसत नाही, ही लोकशाहीची शोकांतिका म्हणावी लागले. लोकसभा, राज्यसभेच्या 141 खासदारांच्या निलंबनाचे पडसाद देखील राज्याच्या विधानसभेत उमटायला हवेत, मात्र विरोधी पक्षाची ताकद कुठेतरी हरवत चालली आहे की काय अशी चर्चा आता होऊ लागली आहे. सत्ता कोणत्याही पक्षाची असो विरोधी पक्ष सक्षम असायला हवा, तरच या देशाची लोकशाही जीवंत राहील. एक मात्र निश्चित की या संपूर्ण गदारोळात प्रहार जनशक्तीचे आमदार बच्चू कडू यांचे नावाची चर्चा राज्यभर विविध समाज माध्यमातून सुरु आहे. केवळ चर्चा नव्हे तर कौतुकाचा वर्षाव बच्चू कडू यांचेवर होतांना दिसतो आहे. विरोधी पक्ष नेत्यालाही लाजवेल अशा दमदार आणि सरकारलाही धडकी भरवेल अशा शब्दात राज्यातील ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी सरकारला धारेवर धरले.
जेव्हा-जेव्हा आमदार बच्चू कडू विधानसभेत बोलतात तेव्हा ते कोणाचीही पर्वा न करता सडेतोड बोलतात. विदर्भाच्या भाषाशैलीत त्यांचे विधान भवनातील आक्रमण बोलणे ऐकून अध्यक्ष महोदयांसह मुख्यमंत्री आणि सभागृहातील सर्व मंत्रीगण लोकपप्रतिनिधी मात्र थक्क होऊन ऐकतात. कारण बच्चू कडूंच्या बोलण्यात शेतकर्यांचे जीव्हाळयाचे प्रश्न असतात, शेतीमालाच्या भावाचा प्रश्न असतो, शेतकर्यांच्या वेदना असतात आणि सरकारने पूर्ण न केलेल्या आश्वासंनाची ‘चिरफाड’ असते. मी सत्तेत असलो आणि नसलो तरी मला फरक पडत नाही कारण मेरा कोई मालिक नही अशा परखड शब्दात राज्यातील वस्तूस्थितीवर आक्रमकपणे आपल्या दमदार आवाजाने प्रकाश टाकतात. धर्माचे प्रश्न, जातीपातीचे प्रश्नावर सरकार सहज तोडगा काढते, परंतू शेतकर्याला स्वांतत्र्य प्राप्तीच्या पंच्याहत्तर वर्षात देखील त्याच्या मालाला ‘घामाचा भाव’ मिळत नाही ही शोकांतिका आहे, असे सांगत कपाशी, धान,सोयीबीनसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेले भाव हे शेतकर्यांच्या आत्महत्यासाठी कारणीभूत ठरत असल्याचे बच्चू कडूंनी ठणकावून सभागृहाला सांगितले आणि कुठे गेला स्वामिनाथन आयोग आणि त्यांनी दिलेले अहवाल.
यावेळी राज्यातील शेतकर्यांच्या डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाही. आपल्या खांदयावर कोणत्याही रंगाचा झेंडा असू द्या परंतू कधीतरी शेतकर्यांच्या, समाजाच्या प्रश्नासाठी ‘तिरंगा’ खांद्यांवर घेण्याचे भावनीक आवाहन जेव्हा बच्चू कडू सभागृहात करतांत तेव्हा सभागृहात स्मशान शांतता पसरलेली असते. राज्यातील भेसळयुक्त दुधाचा प्रश्न असेल, हमीभावांचा प्रश्न असेल, बेरोजगारांचा प्रश्न असेल, रासायनिक खंताचे भाव असतील, कांदाचे भावाचा प्रश्न असेल, संत्रा भावाचा प्रश्न असेल, कांद्यांच्या भावाचा प्रश्न असेल, शहरी व ग्रामीण भागातील घर बांधणीचा प्रश्न असेल, आरोग्य सेवेचा प्रश्न असेल, आरक्षणाचा प्रश्न असेल अशा सर्व प्रश्नापासून ते सरकारी वेतन आयोगापर्यंन्त अत्यंत अभ्यासूपणे प्रश्न मांडणारा एकमेव ढाण्यावाघ राज्यातील जनतेला विधान मंडळात बोलतांना दिसतो आहे.याच वेळी मात्र सत्तेतील आमदार आणि विरोधी पक्षाचे आमदार मुग गिळून बघ्याची भूमिका घेतांना दिसतात अशी चर्चा होते आहे. परंतू बच्चू कडू कुणाचीही पर्वा न करता वस्तूस्थिती मांडतांना दिसतात. याच वेळी शेतकरी संघटनेचे लोकप्रतिनीधी सुद्धा शांत बसलेले दिसतात, हे सत्तेची ताकद आणि दबाव असतो का ? परंतू आ. बच्चू कडू कुणालाही न घाबणारा शेतकर्याची औलाद असलेला खानदानी वाघ आहे.
तुर्तास एव्हढेच.
.