वैविध्यपूर्ण ऊस वाणांना परराज्यातूनही मागणी
सौजन्य:अग्रोवन
दोन महिन्यांपूर्वीच्या मंदीनंतर आता ऊस रोपवाटिकांमध्ये लगबग सुरू झाली आहे. जसा ऊस हंगाम पुढे जाईल तशी ऊस रोपांना महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश मधूनही मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे वैविध्यपूर्ण वाणांच्या रोपांना चांगली मागणी आहे.
अनेक रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांना आवश्यक ती रोपे पुरवण्यासाठी झगडावे लागत आहे. कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर तोडणी वेगात सुरू झाली. शेत रिकामे झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी रोप लावणीला पसंती दिल्याचे चित्र आहे.कांडी लावण केल्यानंतर थंडीमुळे उसाची वाढ कमी होते. यामुळे तयार रोपांची लागवड केल्यास उसाचा कालावधी कमी होत असल्याने शेतकरी रोप लावणीला प्राधान्य देत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.
जिल्ह्यातील रोपवाटिकांमधून देशभरामध्ये ऊस रोपे जातात. विशेष करुन महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश मध्ये रोपवाटिकांना चांगली मागणी असते.नोव्हेंबर पर्यंत ऊसतोडणी फारशी वेगात सुरू नसल्याने मागणी ठप्प होती. ज्या रोपवाटिकांकडे रोपे शिल्लक होती.
त्याची वाढ प्रमाणापेक्षा जास्त झाल्याने ही रोपे अक्षरशः चारा म्हणून वापरावी लागली. ज्या रोपवाटिका नुकत्याच सुरू झाल्या होत्या त्यांना याचा मोठा फटका बसला. ज्या रोपवाटिका नुकसान सोसून उभ्या राहिल्या त्यांना आता या मागणीचा फायदा होत आहे.जसे कारखाने सुरू होतील तशी मागणीत वाढ झाली. यंदाचा हंगाम लवकर संपण्याची शक्यता असल्याने लागवडी वेगात होण्याची शक्यता आहे. यामुळे रोपवाटिका चालक शेतकऱ्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रसंगी जादा रक्कम देऊन संबंधित जातीचा ऊस बियाणांसाठी खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत.
राज्यात विविध ठिकाणी ८६०३२, २६५ आदी ऊस वाण दोन वर्षांपर्यंत सर्वाधिक विक्री होणारे वाण होते. गेल्या वर्षापासून शेतकऱ्यांमध्ये वाण बदलाची मानसिकता होत आहे. विद्यापीठांनी, संशोधन संस्थांनी अनेक वाणांचे मिश्रण करुन नव्या जातीचे वाण विकसित केले आहेत.या पैकी ५०१२, १८१२१, २६५, १३३७४, १३४३६ या वाणांना राज्यातून मागणी आहे. या बरोबर मध्य प्रदेशात ८००५ तर गुजरात मध्ये २६५ वाणाला अधिक मागणी आहे. भौतिक परिस्थिनुसार वाढ होणाऱ्या वाणांची मागणी शेतकरी करत असल्याचे चित्र आहे.
डिसेंबर पर्यंतचा काळ रोपवाटिकांची परीक्षा पाहणारा ठरला. मागणी नसल्याने रोपांचे रोपवाटिकेत मोठे नुकसान झाले. ऊसतोड सुरी झाल्यानंतर चित्र पालटले. ज्या भागात पाण्याच्या पुरेशा पाणी उपलब्धतेची खात्री आहे त्या भागातून रोपांची मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या लोकप्रिय वाणांपेक्षा नवीन वाणांनाही चांगली मागणी आहे.
प्रल्हाद पवार, रोपवाटिका चालक, जांभळी, जि.कोल्हापूर