समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारे आपल्या वेदना का लपवितात ?

समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारे आपल्या वेदना का लपवितात ?

दि. 01/02/2024
संपादकीय.

समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारे
आपल्या वेदना का लपवितात ?

विज्ञान-तंत्रज्ञानात कमालिची क्रांती झाली आहे, माहितीचा स्फोट झाला आहे. मानवी बुद्धीमत्ता ही कृत्रिम बुद्धीमत्तेपर्यंत (एआय) जावून पोहचली आहे. ‘वस्तु’ आणि ‘व्यक्ती’ जाहिरांतीच्या बाजारात स्वतःला जास्तीत-जास्त प्रसिद्धी कशी मिळेल या स्पर्धेत धावतांना दिसत आहेत. जाहिरातींचे सर्व व्यासपीठ माणसांना कमी पडत आहेत. प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडिया, युट्युब चॅनेलसह एक्स मात्र अहोरात्र धावतांना दसतो आहे.

जाहिरातींच्या या युगात सर्वात शाश्वत व्यासपीठ आहे ते म्हणजे प्रिंट मिडिया. इलेक्ट्रॉनिक माध्यमे ही गतीमान माध्यमे असल्याने त्यांच्या बद्दलचे आकर्षण हे सुद्ध मानवी स्वभावामुळे प्रसिद्धीस आहे. जागातिल कोणताही घटनाक्रम ताबडतोबीने जाणून घेण्याची, माहित करून घेण्याची मानवी जिज्ञासा ही जन्मताच मानवात असते. परंतू आठवणींचा अलबम आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी दाखवलेले घटनाक्रम विस्ताराने जाणून घेण्यासाठी त्यातील तथ्य खरे आहेत का हे माहिती करून त्यांचा संग्रह करण्यासाठी प्रिन्ट मिडियाची शाश्वतता आजही कायम आहे. परंतू प्रिंट मिडियाचे अस्तित्व आज धोक्यात आले आहे. धोक्यात का आले आहे तर त्याचे एकमेव कारण हे आर्थिक निकषात मोडलते.

कोरोनाचा काळ यासाठी आजून कारणीभूत ठरला. या काळात तब्बल सहा महिने वर्तमानपत्रे बंद होती. सुरू झाली पुन्हा थोड्या काळासाठी अजून बंद झाली. आणि प्रिंट मिडियाच्या मालकांनी कर्मचारी कपातीचे धोरण स्विकारले. कर्मचार्‍यांचे वेतन कपातीचे धोरण स्विकारले. वेगवेगळ्या प्रकारचे खर्चावर कात्री लावली. ज्या ठिकाणी 20 कर्मचारी काम करायचे त्याला ठिकाणी केवळ चार ते पाच कर्मचारी असे धोरण स्विकारले. दुसरा मुद्दा असा की इलेक्ट्रानिक माध्यमांच्या सोबत युट्युब चॅनलची संख्या वाढली. लोक चॅनललची संख्या वाढली.

या काळात साप्ताहिकांची अवस्था तर अधिकच बिकट झाली. आणि सोशल मिडियाच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे म्हणा किंवा प्रसारामुळे म्हणा राजकारणातील नेते, पुढारी, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य हे सोशल मिडीयावर आपला वाढदिवस साजरा करायला लागले. राज्याच्या एखाद्या पक्षाचा नेता जिल्ह्यात आला, मंत्री दौर्‍यावर आले, तर सर्व प्रिंट मीडियाला जाहिराती दिल्या जायच्या. कार्यक्रमाच्या जाहिराती दिल्या जायच्या. परंतू अलिकडच्या काळात यात मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो.

शेकडोंच्या संख्येने डिजीटल बोर्ड लावले जातात परंतू प्रिंट मिडियाला, इलेक्ट्रॉनिक मिडियाला जाहिराती दिल्या जात नाही. नेत्यांच्या बातम्या मात्र आल्या पाहिजेत, पहिल्या पानावर असायला हव्यात अशी अपेक्षा केली जाते. कितीही मोठा नेता असला तरी आपल्या वरिष्ठांसाठी जेव्हा फाईल तयार केले जाते तेव्हा-तेव्हा प्रिंट मिडियाने दिलेली प्रसिद्धीची कात्रणेच महत्वपूर्ण ठरतात. पंरतू या प्रिंट मिडियाला राजकीय मंडळींनी जाहिराती देण्यास टाळाटाळ करण्याचे धोरण अवलंबिले आहे. कागद महाग झाला आहे, छपाईचे दर वाढले आहेत, त्यामुळे वर्तमानपत्र काढणे आता परवडेनासे झाले आहे.

जिल्हा दैनिकांना एकेकाळी खुप महत्वाचे स्थान होते. कारण जिल्हा स्तरावरील सुख-दुखः प्राधान्याने दखल घेणारी स्थनिक वृपत्रेच असतात. स्थानिक राजकारणाचे विश्लेषण, स्थानिक नेत्यांचे वृत्त, त्या नेत्यांसंदर्भातील लेख-अग्रलेख लिहिण्याचे काम केवळ जिल्हा दैनिकेच करू शकतात. त्यामुळे जिल्हा दैनिकांचे महत्व स्थानिक नेत्यांसाठी अधिक होते. आता नेत्यांनाच कळत नाही, ते डिजीटल बोर्ड शेकडोच्या संख्येने तयार करून शहरभर/जिल्हाभर लावतात, परंतू त्यातून त्यांची प्रतिमा निर्माण होत नाही हे त्यांना समजावून सांगणारा स्विय सहाय्यक आम्हाला दिसला नाही. त्यामुळे जिल्हा दैनिके सुद्धा संकटात सापडली आहेत. जिल्हा दैनिक काढण्यासाठी कागद नसेल, पैसा नसेल तर एखाद्या नेत्याच्या घरी जावून वृत्तपत्र चालक पैसे आणत असे आणि मग वृत्तपत्र काढत असे असा एक काळ सुद्धा होता ज्याचे आम्ही साक्षीदार आहोत.

परंतू आता तेवढ्या उंचीचे आणि तेवढी जाण असलेले नेते सुद्धा नाहीत. वर्षभर आपल्याला प्रसिद्धी देणार्‍या वृत्तपत्रांना वर्षातून चार जाहिराती देण्याची मानसिकता सत्तेवर असलेल्या नेत्यांची नाही, दोन नंबरच्या फळीतील नेत्यांची, नगरसेवकांची, जिल्हा परिषद सदस्यांना सुद्धा वर्षातून एक जाहिरात द्यावी असे वाटत नाही, मग वृत्तपत्र चालतील कसे ?

दैनिक पोलीस शोध या लोकप्रिय वृत्तपत्राला सात वर्ष पूर्ण होवून आज 26 जानेवारी रोजी आठव्या वर्षात पदार्पण करीत आहोत. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम आम्ही सातत्याने केले आहे. अचूक राजकीय विश्लेषण करून आम्ही राजकीय लोकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. शैक्षणिक संस्थांच्या वृत्तांना मोठ्या प्रमाणावर आम्ही प्रसिद्धी देतो. क्रीडा, कला क्षेत्रातील वृत्तांना प्राधान्य देतो. रक्तदाना सारख्या वृत्तांना ठळक प्रसिद्धी देतो, धार्मिक कार्यक्रम असो की राजकारणा-समाजकारणात काम करणारा युवा तरूण असो त्याला प्रसिद्धी देवून बळ देण्याच काम दैनिक पोलीस शोधने सातत्याने केले आहे. एक विधायक दृष्टीकोन घेवून आम्ही पत्रकारिता करतो. लाचारी, लाळघोटेपणा, मागेमागे फिरणे ही आमची पत्रकारिता नाही. आमचा स्वाभिमान कायम ठेवून सत्य मांडण्याची भूमीका आम्ही स्विकारली आहे. चांगल्या गोष्टींना चांगले म्हणण्याची आमच्या लेखणीची वृत्ती कायम आहे. कोणत्याही पक्षाचा राजकीय द्वेष न करता आम्ही सर्वसमावेशक पद्धतीने वृत्तांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो. जिल्ह्यातील, राज्यातील घडणार्‍या घडामोडींवर सडेतोडपणे सत्याची अट कायम ठेवून अग्रलेख लिहितो. त्यामुळे राज्यस्तरापर्यंत आमच्या लेखणीची दखल घेतली जाते याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. मात्र कुणाच्या दाराशी येवून आम्ही याचना करावी असा भ्रम कुणाला असेल तर थांबून जाण्याची आमची तयारी आहे.

पत्रकारीतेच्या क्षेत्रातील काम करणार्‍या मंडळींच्या वेदना या छापून येत नाहीत. समाजातील वेदनांना वाचा फोडणारे, कुणावर अन्याय झाला असेल त्याला न्याय मिळवून देणारे, आपल्या वेदना कुणाजवळही मांडू शकत नाही हे वृत्तपत्र सृष्टीतील पडद्यामागील सत्य आहे. परंतू ते कुणीही समजून घेत नाही, ही शोकांतिका आहे. वृत्तपत्र सृष्टीतील लोक खूप मजेत असतात, त्यांना कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही हा समाजाचा, राजकीय क्षेत्रातील नेत्यांचा भ्रम मात्र कायम आहे. दुसर्‍यांचे अश्रू समाजासमोर मांडून, प्रशासनासमोर ठेवून त्याला न्याय मिळवून देणार्‍यांचे अश्रू मात्र कुणालाही दिसत नाही, ही आजच्या काळातील वर्तमान पत्रकारीता आहे. म्हणून वृत्तपत्रांना त्या वृत्तपत्र चालकांना समजून घेण्याची भूमीका रूजली पाहिजे असे आम्हाला वाटते.

वृत्तपत्रांना भरभरून नव्हे तर किमान स्वरूपात जाहिराती देण्याची भूमिका समाजाने, शिक्षण संस्थांनी, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, सत्तेतील नेत्यांनी स्विकारावी असे आवाहन या निमित्ताने आम्ही करू ईच्छितो. वर्तमान पत्र जगले पाहिजे अशी भूमीका स्विकारली गेली पाहिजे, वृत्तपत्र चालविणे ही साधारण बाब नाही तर ते एक ‘व्रत’ आहे, असे आम्ही मानतो. समाजातील नोकरदार वर्ग जो दररोज सोफ्यावर बसून चहा पितांना वर्तमान पत्र वाचतो. परंतू त्याचा वर्तमान पत्राला जाहिरात देण्याशी कोणताही संबंध नसतो. अशा धनाड्य व्यक्तींनीसुद्धा वर्तमानपत्रांना आर्थिक सहकार्य करावे, शिक्षण क्षेत्रातील बातम्यांना वर्तमानपत्र प्रसिद्धी देत असते. परंतू शिक्षक-प्राध्यापक जे लाखो रूपये पगार घेतात परंतू त्यांना कधीही जाहिरात द्यावी असे वाटत नाही. त्यांनी सुद्धा वर्तमान पत्रांना जाहिराती देवून ते समाजाचा आरसा असतात याची जाणीव ठेवण्याची गरज आहे.

साने गुरूजींनी समाजाकडून वर्गणी मागून वर्तमान पत्र चालविले. त्यामुळे वृत्तपत्रांना समाजाने आपणहून मदत करावी जेणेकरून समाजाचे प्रश्न मांडणार्‍या वृत्तपत्राला कोणत्याही आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये. दैनिक पोलीस शोधची पत्रकारिता ही निष्पक्ष, कुणाचाही द्वेष न करणारी, सत्यावर लेखन करणारी, सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी, अन्यायावर तुटून पडणारी, भ्रष्टाचाराचा भंडाफोड करणारी आणि जे चांगले आहे त्याचे कौतुक करणारी अशीच आहे. श्वानाला वाघाची झुल झालून त्याला वाघ म्हणणे आमच्या लेखणीच्या सिद्धांतात बसत नाही. श्वानाला श्वान आणि वाघाला वाघच म्हणावे या तत्वानुसार पत्रकारितेतील मूल्यांची जपणूक करत सिद्धांतवादी तत्वांशी तडजोड न करता आम्ही लेखन करतो आपण वाचक म्हणून नेहमी आमचे कौतुक करत असतात, तशा प्रकारचे हजारो मॅसेज आपण आम्हाला पाठवून आमचा उत्साह द्विगुणीत करत असतात, त्याबद्दल वाचकांचे आम्ही मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आपले प्रेम असेच राहू द्या. तुर्तास एव्हढेच…

नरेंद्र जमादार
संस्थापक, संपादक दैनिक पोलीस शोध

1 thought on “समाजाच्या वेदनांना वाचा फोडणारे आपल्या वेदना का लपवितात ?”

Leave a Comment