साक्षात स्वर्ग आला
सत्यास न्याय मिळता जगतास हर्ष झाला
श्रीरामजन्मभूमी न्यासास अर्थ आला
वनवास भोगताना शिणला न भागला तो
राष्ट्रार्थ झुंज द्याया निमिषात सज्ज झाला
नेतृत्व सिद्ध केले दुर्दम्य साहसाने
दैत्यास संपवाया लढण्या समर्थ झाला
केला विनाश सत्वर मारीच त्राटिकेचा
संहारता सुबाहू नाही अनर्थ झाला
चीत्कार ऐकुनीया हतबल असूर झाले
माथा सदा यशाने उन्नत सहर्ष झाला
शापातुनी मिळाया मुक्ती सती शिळेला
तत्काळ रघुपदाचा हळुवार स्पर्श झाला
भिल, गिद्द, वानरासह, हनुमंत शक्तिशाली
होताच दहन लंका रावण सगर्व आला
धर्मास रक्षिण्याला केलेत यत्न भारी
सीतेस मुक्त करण्या राघव सुसज्ज झाला
होता विजय परतले सजले नगर अयोध्या
धरणीवरी दिव्यांचा साक्षात स्वर्ग आला
वृत्तबद्ध रचनाकार
शिवाजी साळुंके, ‘किरण’
चाळीसगाव, जि. जळगाव.