संमेलन नगरी अमळनेर,
आठवनी मनी धरती फेर :
संत सखाराम महाराजांची पावन भूमी, श्रीमंत दानशूर प्रतापशेठ यांच्या नावाने ओळख असलेल्या अमळनेरचा लौकीक महाराष्ट्रभर पसरला आहे. पू. साने गुरुजींच्या वास्तव्याने हे शहर पुनित झालं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीच्या काळात पू. गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. आता ही संस्था खानदेश एज्युकेशन सोसायटी म्हणून ओळखली जाते. या नगरीत आणि प्रताप महाविद्यालयातच माझे महाविद्यालयीन शिक्षण झाले. पू. साने गुरुजी ज्या वसतीगृहात राहिले, त्या आनंद भवन, राममंदिर वसतीगृहासह ए, बी, सी ब्लॉक होस्टेल आणि युजिसी होस्टेलला राहण्याचे भाग्य मला ७ वर्ष लाभले. माझा शैक्षणिक आणि साहित्यिक पिंड अमळनेर नगरीतच पोसला गेला. कडव्या शिस्तिसाठी प्रसिद्ध असलेले डॉ. ए. जी. सराफ, कनवाळू आणि मायाळू म्हणून विद्यार्थीप्रिय असलेले डॉ. का. झू. लाड आणि इंग्रजीभाषेवर निर्विवाद प्रभूत्व असणारे डॉ. अ. नि. माळी यांची प्राचार्यपदाची कारकीर्द मी अनुभवली आहे. त्यांच्या शिस्तीचं आणि संस्कारांचं गारुड माझ्या मनावर आजही कायम आहे. “बोले तैसा चाले” अश्या वृत्तीची ही माणसं, आजही अनेकांच्या स्मरणात पूजनीयच आहेत. त्या भूमीत ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, विद्रोही साहित्य संमेलन आणि एल्गार अ. भा. गझल संमेलन होत आहे. साहित्याचा त्रिवेणी संगमाच्या या पार्श्वभूमीवर अमळनेरच्या स्मृती जागृत होणं क्रमप्राप्तच आहे.
खानदेशातील एक महत्त्वाचे गाव म्हणजे अमळनेर. या शब्दाची उत्पत्ती, मलविरहीत ग्राम म्हणजे अमलग्राम अशी दिसते. येथे वाहणाऱ्या बोरी नदीचं पाणी म्हणजे चंद्रभागेसम पवित्र नीर. म्हणून, अमलग्रामचे अमलनीर झाले असावे. जे अपभ्रंश होवून अमळनेर झाले आहे. अमळनेर हे जळगाव जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध शहर आहे. अमळनेर तालुक्यात १६२ खेडी आहेत. सन १९०६ पुर्वी हल्लीचे जळगाव व धुळे ( पुर्वीचे पुर्व खानदेश व पश्चिम खानदेश ) या दोन जिल्ह्याचे मिळून एकच मोठा जिल्हा होता व त्यास खानदेश जिल्हा असे नाव होते. त्यावेळच्या खानदेशातील अमळनेर हे मध्यवर्ती ठिकाण म्हणता येईल. अमळनेर शहर पश्चिम रेल्वेच्या भुसावळ-सुरत मार्गावर आहे. ते जळगावपासून पश्चिमेकडे ५६ किलोमीटर व धुळ्यापासून पुर्वेकडे ३५ किलोमीटर अंतरावर आहे. भौगोलिक दृष्ट्या अमळनेर हे २१.३ उत्तर अक्षांशावर व ७५.१ पुर्व रेखांशावर आहे. हे तापी नदीच्या खोऱ्यात बोरी नदीच्या डाव्या काठावर वसले आहे. नदीमुळे शहराचे दोन भाग झाले असुन उजव्या तीरावरील वस्तीस पैलाड म्हणतात. तर डाव्या तीरावरील वस्तीला ऐलाड म्हणतात. समुद्र सपाटीपासुन गावाची उंची सुमारे ६०८ फूट ( सुमारे १८५ मीटर ) आहे. शहराचा उतार सामान्यतः दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे. टाऊन प्लॅनिंगमुळे हल्ली शहरांची पस्चिमेकडे वाढ होत आहे.
अमळनेर शहर बोरी नदीचा काठावर वसलेले असून. गावात प्रवेश करतांना ऐतिहासिक बुरुज, दगडी दरवाजा प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतो. नदी किनारी वाडी संस्थान हे तीर्थक्षेत्र आहे. ह्या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर असून, संत सखाराम महाराज ह्यांची ही कर्मभूमी आहे. यांचे पंढरपूराशी थेट नाते आहे. येथून आजही अखंड पायी वारी निघते. अमळनेरात मंगळग्रह मंदिर हे देवस्थान आहे, जे शिर्डीच्या श्री साई संस्थान आणि शेगावचे श्री गजानन महाराज संस्थानाच्या धर्तीवर विकास करत आहे. येथे दर मंगळवारी हजारो भाविक येत असतात. पांडुरंग सदाशिव सानेगुरुजी यांचे येथे वास्तव्य होते. अमळनेर मधील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे साने गुरुजी यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना प्रताप शेटजींनी अमळनेरात थांबण्यास सांगितले. स्वातंत्र्यपुर्व काळात साने गुरुजींनी अमळनेरच्या प्रताप हायस्कुलात अध्यापन केले. त्यांच्या कर्मभूमीत त्यांचे भव्य स्मारक आकार घेत आहे. अमळनेर शहर जळगाव जिल्ह्यात असुन ब वर्ग नगरपालिका आहे. शहराची लोकसंख्या सव्वा लाखापर्यंत आहे. अमळनेर शहरात आद्य संत श्री सखाराम महाराज यांचा यात्रा उत्सव वैशाख शुद्ध एकादशी पासुन सुरू होतो. खान्देशात “उच्छावनी जत्रा” म्हणून ती प्रसिद्ध आहे. यात एकादशीला रथ उत्सव असतो व पौर्णिमेला पालखी असते. पूर्वी यात्रा उत्सव बोरी नदी पात्रात महिनाभर चालत असे. जो त्या काळात सांस्कृतिक उत्सव गणला जायचा. आता तो आठवड्यावर आला आहे. यात्रेस जळगाव , धुळे, नंदुरबार महाराष्ट्रातील विविध ठिकाणावरून भाविक व वारकरी येत असतात.
सुमारे दीडशे-पावणेदोनशे वर्षापुर्वी अमळनेर येथे श्री सखाराम महाराज या नावाने एक प्रसिद्ध संत होऊन गेले. वारी हा त्यांचा नित्यक्रम होता. जेव्हा वृध्दापकाळाने त्यांना वारी शक्य नव्हती, तेव्हा साक्षात पांडूरंग त्यांच्यासोबत मूर्तीरुपात अमळनेरला आले. तेच हे सखाराम महाराजांचे वाडी संस्थान. त्यांच्या स्मरणार्थ बोरी नदीच्या पात्रात त्यांची समाधी बांधली आहे. पावसाळ्यात बोरी दुथळी भरुन वाहते, तेव्हा ह्या समाध्या, मंदिर पाण्याखाली जातात. ते विहंगम दृष्य बघणं, म्हणजे एक पर्वणीच असते. श्री संत सखाराम महाराजांच्या वास्तव्यामुळे व त्यांच्यानंतर चालत आलेल्या परंपरेमुळे अमळनेरला तिर्थक्षेत्र म्हणून मिळालेली मान्यता व प्रसिद्धी आजही कायम आहे. या गादीवर सद्या विद्यमान गादीपती म्हणून पू. प्रसादजी महाराज विराजमान आहेत. जे ही परंपरा पुढे नेत आहेत. आजही अमळनेर हे खानदेशचे प्रती पंढरपुर समजले जाते.
पूर्वीच्या काळी अमळनेर हे ऐतिहासिक महत्त्वाचे ठिकाण होते. नदीच्या काठी हल्ली एक पडकी गढी आहे. ती गढी म्हणजे भग्नावस्थेतील लहानसा भुईकोट किल्ल्याचे आजचे स्वरुप आहे. पेशवाईच्या काळी या किल्याची व्यवस्था पेशव्यांच्या वतीने मालेगांव येथील राजेबहाद्दरांकडे होती. सन १८१८ मध्ये ब्रिटीशांनी खानदेशावर आपला ताबा बसविला. त्यावेळी ह्या किल्ल्यात असलेल्या अरब शिपायांनी ब्रिटीशांच्या ताब्यात हा किल्ला देण्याचे नाकारले. तेव्हा मालेगाव येथून कर्नल हस्किसन्स याच्या अधिपत्याखाली ब्रिटाशाची सुमारे एक हजार फौज, तोफखाना व घोडदळ यांसह किल्ल्यावर चालून आली. अरब शिपायांनी आरंभी थोडासा प्रतिकार केला. परंतु, एवढ्या मोठ्या फौजेशी सामना देणे त्यांना शक्य झाले नाही. अखेर, त्यांना किल्ला खाली करावा लागला. त्यांनी आपली शस्त्रे किल्ल्याबाहेर आणून ठेविली व ते नदीच्या पात्रात आले. तेथे त्यांना ब्रिटीशांनी कैद केले. त्या वेळेपासुन अमळनेर हे ब्रिटीशांच्या अमलाखाली आले होते. डांगरी येथील स्वातंत्र सैनिक उत्तमराव पाटील आणि लिलाताई यांनी १५ ऑगष्ट १९४२ ला इंग्रजांना विरोध म्हणून तहसिल कचेरी, रेल्वे स्टेशन आणि पोस्ट ऑफिस पेटविले होते. त्यासाठी लिलाताईंना जेलमध्ये जावे लागले होते. जेलमध्ये जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्या या कार्यावर साने गुरुजींनी त्याकाळी आग्रलेख लिहिला होतो. पुढे जेलमधून पळून जावून ते भूमिगत झाले. आणि, पत्री सरकारात सामिल झाले होते. हा दैदीप्यमान इतिहास अमळनेरचाच. येथील तत्कालीन आमदार दाजीबा पर्बत पाटील यांनी १९७८ ते ८४ या कालावधीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची धूरा सांभाळली आहे. महाराष्ट्रभर खान्देशची मुलुखमैदान तोफ म्हणून धडाडणारं लोकनेतृत्व म्हणजे माजी आमदार गुलाबराव वामन पाटील. ते अमळनेर तालुक्यातील दहिवदचे. त्यांनी विधानसभेत आहिराणी बोलीतून शपथ घेवून नवा विक्रम केला होता. ते सभेला आहिराणीतूनच संबोधन करायचे. त्यांच्या जाहिर भाषणात श्रोत्यांसाठी अर्ध्यातासाचा मध्यंतर केला जायचा. तरीही श्रोत्यांची गर्दी कमी होत नव्हती. हा इतिहास आहे. अश्या सभा मी स्वतः ऐकल्या आहेत.
विकसनशील शहरं वाढतात तसा अमळनेरचा चौफेर विकास होत आहे. येथली ओळख असलेली प्रताप मिल कालौघात नामशेष झाली आहे. प्रतापशेठजींनी सुरु केलेले प्रताप हाॅस्पिटल त्याकाळी वैदकीय महाविद्यालयाच्या तोडीचे होते. या परिसरात शेठजींनी भव्य राम मंदिर बांधले होते. त्याची प्रासादिकता आजही कायम आहे. डालडा वनस्पती तुपाचा कारखाना विप्रो येथलाच. येथील चंदन आणि हळदीचा गुणविशेष सांगणारा संतूर साबण भारतभर प्रसिद्ध आहे. आर. के. पटेल यांच्या पटेल जर्दा ने त्याकाळी भारतभर मार्केट काबिज केले होते. तेलाच्या गिरण्या, जिनिंग फॅक्टरी, विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेलं प्रताप कॉलेज, प्रताप हायस्कुल व इतर माध्यमिक शाळा, अखिल भारतास ललामभूत ठरलेले व श्रीमंत प्रताप शेठजींच्या तत्त्वज्ञानप्रेमाचे द्योतक असलेले अखिल भारतीय तत्त्वज्ञान मंदीर ही ऐतिहासिक संस्था येथे आहे. त्यामुळे अमळनेरचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. राष्ट्रीय व कामगार चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणूनही अमळनेरचा लौकिक आहे. येथील पाचपावली सप्तशृंगी मंदिर, प्रताप मिल, आर. के. पटेल उद्योग यांच्या गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवांनी अमळनेरकरांना उत्तमोत्तम नाटकं, संगीतकारांची संगीत रजनी, चित्रपटांची मेजवानी देवून सांस्कृतिक आणि कलात्मक भान जोपासले आहे.
अमळनेरात श्रीरामशास्त्री उपासनी हे प्रख्यात संस्कृत व ज्योतिष विद्वान होवून गेले. त्यांनी त्याकाळी काशिक्षेत्रात गुरुकुल पद्धतीने सामवेद विद्यालयात वेद, उपनिषदे, षड्दर्शनशास्त्रे यांचे ज्ञान प्राप्त केले होते. अमळनेरच्या प्रताप विद्यालय व प्रताप महाविद्यालयात त्यांनी संस्कृत अध्यापनाचे कार्य केले. वेद, हिंदू धर्मशास्त्र, जैन आगम, बौद्ध धम्मशास्त्र आणि आणि तत्वज्ञान यावरील त्यांच्या गाढया अभ्यासामुळे, अनेक धर्मिय साधू व विद्वान त्यांचे भेटीसाठी येत असत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण्न यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. येथील सुप्रसिद्ध साहित्यिक वा. रा. सोनार यांनी चेतश्री प्रकाशनाच्या माध्यमातून अमळनेरला साहित्यिकांची पंढरी अशी ख्याती मिढवून दिली होती. भा. ज. कवीमंडन, गणेश कुडे, प्रा. ब. लु. सोनार यांनी साहित्य परंपरा समृध्द केली. येथील अंबऋषी टेकडी हजारो वृक्षराजीने नटली आहे. जी नागरीकांना प्रसन्न पहाटेचा निसर्गरम्य आनंद घेण्यासाठी खुणावत असते.
अझीम प्रेमजी यांच्या वडिलांनी हशिमजी प्रेमजींनी अमळनेरात विप्रोची सुरुवात केली होती. प्रताप महाविद्यालयातील अद्ययावत युजीसी होस्टेललाही त्यांची आर्थिक मदत लाभली होती. अमळनेरसारख्या तालुक्याच्या व दळणवळणाच्या दृष्टीने आडवळणाच्या गावी नियतकालिकेही चालविण्याचे प्रयत्न वेळोवेळी निरनिराळ्या साहित्यिकांकडून करण्यात आले. त्यात प्रथम श्री वासुदेव कृष्ण भावे यांच्या “बालवसंत” व “नागरिक” या दोन साप्ताहिकांचा व “निकास” मासिकाचा उल्लेख केला जातो. खानदेशबद्दल ज्यांना विशेष अभिमान व आत्मियता वाटत असे व ज्यांच्यामुळे खानदेशचे व विशेषतः अमळनेरचे नाव घेतले जाते ते सर्वांच्या सुपरिचयाचे व सच्चे कर्मयोगी कै.पुज्य सानेगुरुजी यांनी चालविलेल्या “काँग्रेस” साप्ताहिकाचा उल्लेख करताना, अमळनेरकरांना विशेष अभिमान वाटतो. कै. पुज्य सानेगुरुजी येथील हायस्कुलमध्ये शिक्षक असताना त्यांनी प्रौढ विद्यार्थ्यांकरीता “विद्यार्थी” मासिक काढले होते. त्या मासिकाचा दर्जा तात्कालीन मराठी मासिकात उल्लेखनिय होता. तत्त्वज्ञान मंदीरामार्फत “तत्त्वज्ञान मंदिर” हे उच्च दर्जाचे व तत्त्वज्ञानविषयक तत्त्वज्ञानास वाहिलेले त्रैमासिक प्रसिद्ध केले जात असे.
वाङमय विकास मंडळातर्फे सन १९४१ मध्ये अमळनेरला संयुक्त खानदेश साहित्य संमेलन “आनंद” मासिकाचे संपादक श्री गोपीनाथ तळवळकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. तसेच मराठी वाङमय मंडळाच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक श्री.कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली १९५२ साली महाराष्ट्र साहित्य संमेलन भरले होते. येथील वाड्मय मंडळाने अनेकदा राज्यस्तरीय संमेलन घेतली आहेत. येथे झालेल्या प्रतिभा साहित्य संमेलनाने अनेकांना साहित्यिक ओळख दिली आहे. येथील व्याख्यानमाला रसिक श्रोत्यांच्या उदंड प्रतिसादासाठी महाराष्ट्रात ख्यातकीर्त आहेत. अमळनेरचे पू. साने गुरुजी वाचनालयाला समृध्द असा साहित्यिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. विद्यमान संचालक मंडळ तो गुणात्मक दृष्ट्या वृध्दींगत करण्यासाठी परीश्रम घेत आहे. शिक्षण व साहित्य यांच्याप्रमाणेच व्यापार, उद्योगधंद्यासाठीदेखील अमळनेर प्रसिद्ध आहे. खान्देशातील प्रमुख ग्रामीण बोली भाषा अहिराणी असून, या भाषेतील जेष्ठ साहित्यिक कृष्णा पाटील यांनी आहिराणीचं संशोधनात्मक काम केले. त्यासाठी त्यांना, अखिल भारतीय साहित्य अकादमीचा सर्वोच्च असा भाषा सन्मान पुरस्कार मिळाला आहे. खान्देशचे शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उर्जा केंद्र म्हणून अमळनेर ओळखले जाते. ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने त्यात भरच पडणार आहे. ज्या मातीत खेळलो, शिक्षण घेतलं, वाढलो त्या मातीत, माय मराठीचा हा महोत्सव प्रत्यक्ष अनुभवणं, त्यात सक्रिय सहभाग नोंदवणं म्हणजे माझ्यासाठी एक पर्वणीच आहे. या नगरीला भेट द्यायला आपणही उत्सुक असालच. आपल्या भेटीची आतुरता मनात ठेवून आपणास संमेलनासाठी आग्रहाचं निमंत्रण देत आहे. आपले अमळनेर संमेलन नगरीत मनःपूर्वक स्वागत आहे.
© प्रा.बी.एन.चौधरी.
(९४२३४९२५९३)
4 thoughts on “संमेलन नगरी अमळनेर आठवनी मनी धरती फेर”