लोकशाही म्हणजे काय

लोकशाही म्हणजे काय

पेटत्या मशाली

“लोकशाही म्हणजे काय ?”
काॅलेजच्या वर्गावर नजर फिरवीत राज्यशास्त्र शिकविणा-या सरांचा प्रश्न ..
“सर, मी सांगतो. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय.”  वर्गातील पुस्तकी किडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं उत्तर ऐकून सरांना समाधान वाटले.
” छान ! अगदी बरोबर !”
“पण सर ,असे जर असते तर लोकांना या प्रशासनाबाबत अविश्वास वाटला नसता.  शासनाच्या यंत्रणेतील सावळ्या गोंधळाचा लोकांना त्रास झाला नसता.”  वर्गातील एका विवेकवादी विद्यार्थ्याचे हे बोलणे ऐकून सर गडबडले. स्वतःला सावरत त्यांनी विचारले
“म्हणजे ? तुला काय म्हणायचे आहे ? मतदारांनी म्हणजे लोकांनीच तर लोकप्रतिनिधींना निवडून दिलेले असते. तेच राज्यकारभार चालवितात. त्यासाठी योग्य त्या अधिकाऱ्यांची निवड करतात. ते पण वेगवेगळ्या परीक्षा पद्धतीतून निवडले जातात.”
“सर, ते सगळं बरोबरच आहे. पण लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी, अधिकारी लोकांसाठी खरंच कामे करतात का ? की, स्वतःच्या स्वार्थासाठी आणि सत्तेसाठी कामे करतात ?” विवेक वादी विद्यार्थ्यांचा पुन्हा सवाल.
      आता मात्र सरांना नेमके काय उत्तर द्यावे हे सुचत नव्हते. तरीही भारतीय लोकशाहीचे अनन्य साधारण महत्त्व पटविण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करीत राहिले. गेल्या तीन वर्षापासून संस्था चालकाकडे दहा लाख रुपये देऊन बिनपगारी नोकरी करीत असलेले सर ह्या क्षणी मात्र खरोखरच केविलवाणे दिसत होते. आजच्या लोकशाहीचे केविलवाणं रूपच जणू त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं.
“सर ,भारतीय लोकशाही एवढी ग्रेट आहे तर मग गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकं, जेल मध्ये शिक्षा भोगलेले गुंड निवडणुकीत उमेदवारी अर्ज कसे भरतात ?  कसे निवडून येतात ? ” दुसऱ्या एका विद्यार्थ्यांचा प्रश्न…
” सर, भ्रष्टाचारी लोकनेते तुरुंगाची हवा न खाता वेगवेगळ्या पदांवर कसे काय स्वतःला मिरवून घेतात ?” बाजूच्या कोपऱ्यातून तिसरा प्रश्न
“चुकीच्या मार्गाने पैसे कमावणाऱ्या अधिकाऱ्यांना शिक्षा का होत नाही ?” चौथ्या विद्यार्थ्यांचा सवाल …
” मोठमोठ्या उद्योगपतींनी घेतलेले कर्ज सरकार माफ का करते ?” पलिकडच्या कोपऱ्यातून पाचवा प्रश्न….
“सर, तुम्ही एवढे छान शिकवता तरी पण तुम्हाला संस्थेला दहा लाख रुपये का द्यावे लागले ?  अजूनही तुमचा पगार सुरू नाही. असे का ? ” विवेकनिष्ठ विद्यार्थ्याच्या या प्रश्नाने सर भांबावले आणि गपकन खुर्चीवर बसत विचार करू लागले……
        अभ्यासक्रमातील धड्यांमधून देशाचे कितीही गुणगान आपण गायलं तरी या विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोरची वस्तुस्थिती कशी लपवणार आहोत आपण ? वृत्तपत्रातून राजरोस येणाऱ्या बातम्या, सोशल मीडियातून प्रसारित होणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या काळ्या कारणामांच्या चित्रफिती,  आठवड्या गणिक लोकप्रतिनिधींचे होणारे पक्षांतर, पैसा आणि सत्तेच्या लालसेपोटी ताटाखालची मांजर होत, कुत्र्यासारखी लाळ घोळणारी कार्यकर्त्यांची जमात, भूकबळी, महागाई, बेरोजगारीची आकडेवारी कशी लपवणार आहोत आपण ?
     मन, मेंदू, आणि मनगट बळकट न होता सुशिक्षित होणारी मस्तके निर्बुद्ध सत्ताधाऱ्यांची हस्तक होऊन कुणापुढेही नतमस्तक होताना ही पिढी उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आरक्षणाच्या आधाराने देशात लादली जाणारी गुलामगिरी, यंत्रणेतील गेंड्यांना धडधाकट करणा-या शासकीय योजना, गुणवत्तेचे होणारे अवमूल्यन…. अशा कितीतरी असंविधानिक गोष्टी ह्या पिढीला पावलागणिक अनुभवायला मिळत आहेत.  अशावेळी ह्या पिढीने लोकशाहीचा आदर का म्हणून बाळगावा ?
     संवेदनशील मनाच्या सरांना बसल्या बसल्या गरगरल्या सारखे होऊ लागले.  वर्गातील एक एका विद्यार्थ्याच्या हातात त्यांना ‘पेटत्या मशाली’ दिसू लागल्या….आग ओकत जणू त्या लोकशाहीला सांगू पहाताहेत…..

“हे लोकशाही,
रोज फसविलं जातंय तुला
जागतिकीकरणाच्या गदारोळात..
लंब्याचौड्या भाषणबाजीत….
चहुबाजूंनी आळवले जाताहेत
पाॅझिटिव्हनेसचे सूर
‘किती करतोय आम्ही……!’
‘किती मरतोय आम्ही…..!’
आतमध्ये असो कितीही त्रागा
दाखविल्या जाताहेत तुला
कृत्रिम फुलांच्या बागा….”

“सा-यांना जडलाय तुझ्या नावाने
मोठ्ठं होण्याचा ध्यास
जणू एखाद्या फुटकळ कवितेने
स्वत:वर गुलाल उधळीत
वांझोट्या वादविवादांनी मांडावा
प्रसिध्दीचा हव्यास…”

“खरे तर लागलेली आहे
येथे छुपी आग
आहे सुरू चहुकडे भागम् भाग…
मोर्चा ,संप, धिक्कार, बहिष्कार ,
निषेध ,आंदोलने…..
एक ना अनेक
तरीही..सांगत राहाते
तुझ्या माध्यमातून
माध्यमातले सरकार
‘आहे सुरू सारा
आलबेल कारभार’
असो कितीही आणीबाणी
व्यवस्थेची चिमणी टाकत आहे
इवल्याशा चोचीने पाणी…”

” हे लोकशाही,
आता मात्र….
मिणमिणत्या काही पणत्यांमधील
संपत चालले आहे तेल
तर काहींनी पसंत केले आहे विझणे
यंत्रणेच्या वा-या वादळात….
मात्र…
काही पणत्या निघाल्या आहेत
स्फोटकांच्या भांडाराकडे
आगीचा व्हावा
‘वणवा’ म्हणून…
तुझ्याच नावाची
‘मशाल’ पेटवून….!
तुझ्याच नावाची ‘मशाल’ पेटवून…!!”

  – डॉ.नरेंद्र बापूजी खैरनार,.. साक्री
     ‘संवेदन’ प्लाॅट नं. ११,
     नयना सोसायटी साक्री
      ता.साक्री जि.धुळे ४२४३०४
      भ्र.9421884024

Leave a Comment