सौर कृषी पंप मंजुरीसाठी शेतकऱ्याकडून लाच मागण्याचा प्रकार उजेडात
जळगाव: महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (MEDA) अंतर्गत सुरू असलेल्या कुसुम योजनेतून शेतकऱ्यांना अनुदानित सौर कृषी पंप दिले जात आहेत. मात्र, या योजनेत लाचखोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील एका शेतकऱ्याला त्याच्या अर्जानंतर मंजुरी मिळाली असतानाही, सर्वेक्षणासाठी आलेल्या लाईनमनने ₹1,500 लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
शेतकऱ्याची तक्रार – लाच मागणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी
गजानन गोविंदा पाटील ताडे ता.
एरंडोल जि.जळगांव यांनी MEDA योजनेत अर्ज करून ₹32,075 अधिकृत शुल्क भरले होते. त्यानंतर त्यांना MEDA कडून त्यांच्या पंपासंबंधी मंजुरीचा आणि सर्वेक्षणाचा संदेश प्राप्त झाला. नियमानुसार लाईनमन लखनसिंग रवींद्रसिंग परदेशी हे सर्वेक्षणासाठी त्यांच्या शेतात आले. मात्र, सर्वेक्षणाच्या प्रक्रियेनंतर त्यांनी मंजुरीसाठी ₹1,500 लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
त्यानंतर गजानन पाटील यांनी MEDA अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून, संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
MEDA योजनेत भ्रष्टाचार?
MEDA ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत संस्था असून, शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप अनुदानावर उपलब्ध करून देते. मात्र, अधिकाऱ्यांकडून लाचेची मागणी होत असेल, तर शेतकऱ्यांना न्याय कोण देणार? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
शासनाने तातडीने चौकशी करावी – शेतकऱ्यांची मागणी
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्यास, याचा परिणाम संपूर्ण कृषी क्षेत्रावर होईल. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करत आहेत.
