मतितार्थ
तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा
आजकालची तरुण मुलं आपल्या खास स्टाईलनं राहाणं पसंत करतात. कुणी दाढी राखतं. कुणी राखलेली दाढी कोरतं. कुणी मिशीचा आकडा वळवतात. कुणी मिशीला पीळ देतात. कुणी लांबच लांब केस राखतं, कुणी या केसांची अगदी पोनीटेल देखील बांधतं. या स्टाईलमध्ये क्वचित काही मुलं छान दिसतात; पण बहुतेक वेळा हे त्यांच्या देहयष्टिला शोभणारं नसतं. अशा वेळी त्यांच्या जवळची मंडळी अर्थात आई-वडील या अशोभणीय गोष्टी न करण्याचा सल्ला देतात. तरुणांनोआधी तुमचं कर्तृत्व फुलवा
अर्थातच हा त्यांचा सल्ला मुलांकडून सहजपणे धुडकावला जातो. मुलं आपल्या पालकांचं ऐकत नाहीत. मुलं आपलाच हट्ट धरून ठेवतात कारण हे त्यांचं ‘न ऐकण्याचं वय’ असतं! पालक देखील कधी काळी या परिस्थितीतून गेलेले असतात; पण आता त्यांना त्याचं विस्मरण झालेलं असतं. कदाचित त्यांच्या हट्टांचं स्वरूप भिन्न असतं त्यामुळं हे विस्मरण होत असावं. काही पालकांचं मात्र विस्मरणाचं वयही झालेलं असतं !
अशाच एका मुलाशी माझा संवाद
अशाच एका मुलाशी माझा संवाद सुरू होता.
त्या मुलाचा सरळ आणि साधा प्रश्न होता –
” हौस म्हणून केली थोडी स्टाईल, तर त्यात काय मोठं बिघडलं?”
मी पालकांच्या पिढीचा प्रतिनिधी तर आहेच; पण मी समुपदेशकही आहे. त्यामुळं मला त्याच्या या प्रश्नाचं उत्तर देणं आवश्यक वाटलं. दोन वेगळ्या वयांतील व्यक्तिंच्या नातेसंबंधात अडचणीचा ठरू शकेल अशा या प्रश्नाचं समर्पक उत्तर दिलं जाणं ही माझ्या लेखी महत्वाची गोष्ट होती.
मी तारुण्याच्या उंबरठ्यावर असताना तरुणांनो आधी तुमचं कर्तृत्व फुलवा
मी उत्तरासाठी नेमके शब्द शोधीत होतो. नेमकं त्याच वेळी मी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाचे म्हणजे मी कॉलेजात शिकत असतानाचे दोन वेगवेगळे प्रसंग मला आठवले.
त्यातला
पहिला प्रसंग मी अकरावीत होतो तेव्हाचा.. तरुणांनोआधी तुमचं कर्तृत्व फुलवा
मी माझ्या केसांचा मधुन भांग पाडीत असे. अगदी ‘तेरे नाम’ सिनेमातील सलमानसारखा नसला तरी त्याचं अनुकरण म्हणता येईल असा भांग मी पाडीत असे. त्या काळी माझे वडील गावातल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीत सेक्रेटरी म्हणून सेवेत होते. दरवर्षी खरीप आणि रब्बीच्या पीककर्जाची प्रकरणे केली जात. शेतकऱ्यांना जिल्हा सहकारी बँकेकडून सोसायटीच्या माध्यमातून कर्ज दिले जात असे.
एका सिझनला अगदी दोनशे-अडीचशे शेतकऱ्यांना हे कर्ज मिळत असे. या शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम चेकने दिली जाई. त्यामुळे माझ्या वडिलांना असे शेकडो चेक लिहावे लागत असत. मी अकरावीला असताना एकदा माझ्या वडिलांनी असे नव्वद चेक लिहिण्याची कामगिरी माझ्यावर सोपविली होती. शेतकऱ्यांची नावे, कर्जरकमा आणि इतर तपशील माझ्या वडिलांनी मला दिला होता. एका रात्रीतून हे सर्व चेक लिहून द्यायचे होते. मी अगदी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली आणि ती पूर्णही केली होती.
हे नव्वद चेक लिहीण्यापूर्वी मी कधीही चेक लिहीलेला नव्हता. त्यामूळे माझ्याकडून चेक लिहीताना सहा चेकमध्ये नाव, तारीख किंवा रक्कम यामध्ये कुठेतरी चूका झाल्या. आणि मी चौऱ्याऐंशी चेक बिनचूक लिहू शकलो. दुसऱ्या दिवशी वडिलांनी मी लिहीलेले चेक पाहिले. सहा चेकमध्ये चूक झालीय असं म्हटल्यावर ते मला म्हणाले- “अरे अनिल, चेक लिहिणं हे काही केसांचा मधुन भांग पाडण्याइतकं सोपं नाही.”
मित्रहो, त्या दिवसांपासून आजतागायत मी केसांचा मधून भांग पाडला नाही!
दुसराही एक प्रसंग असाच…
मी महाविदयालयीन पदव्युत्तर शिक्षण संपवून नोकरीला लागलो. माझं लग्नही झालं होतं. त्यावेळी मला ओठांवर जाड मिशी राखायला आवडत असे. माझी तब्बेत किरकोळच होती. तरीही आवड म्हणून मी जाड मिशा ठेवल्या होत्या. एकदा सुटीला गावाला आलो होतो. मी चांगला बोलका असल्यामुळं मी घरी आलो की घरी येणाऱ्या मोठया माणसांशी मी संवाद करायचो.
त्या दिवशी आमचे शेजारी आणि गावचे त्याकाळचे सरपंच असलेले भारदस्त व्यक्तिमत्त्वाचे श्री गांगड दादा घरी आले होते. ख्याली-खुशालीचं बोलणं सुरू होतं. अचानक दादा मला म्हणाले, ”अनिल, तुझी तब्बेत केवढी, तूझ्या मिशा केवढ्या? तूला शोभत नाहीत अशा जाड मिशा..” स्वतःच्या जाडजूड मिशांवर हात फिरवित दादा पुढं म्हणाले- “तूझ्यासारख्या शिकलेल्या मुलानं कसं टापटीपीत राहायला हवं. तू बारीक मिशी ठेवायला हवी.”
मित्रहो, त्यावेळी मला अगदी पाण्यात पडल्यासारखं झालं. मी त्यानंतर कधीच जाड मिशी ठेवली नाही.
मुलाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर
मला माझ्या वडिलांनी किंवा शेजारच्या गांगड दादांनी दिलेला टोमणा वर्मी लागला किंवा माझा आत्मसन्मान जागृत झाला वगैरे मी म्हणणार नाही. पण मी त्या गोष्टी पुन्हा कधीच केल्या नाहीत. असं का? या प्रश्नाचं उत्तर खूप महत्वाचं आहे. लेखाच्या पूर्वार्धात माझ्याशी संवाद करू पाहाणाऱ्या मुलाने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यामध्येच आहे.
या दोन्ही प्रसंगात माझ्या मनात जे विचार त्या क्षणी आले त्या विचारांचा परिपाक म्हणून पुन्हा कधीही ‘केसांचा मधुन भांग न पाडण्याचा’ किंवा ‘ ओठांवर जाड मिशी न ठेवण्याचा’ मला त्यावेळी नकोसा वाटलेला निर्णय मी घेऊ शकलो आणि आजपर्यंत त्यावर ठाम राहू शकलो.
त्यावेळी माझ्या मनात आलेले विचार काय होते?
दोन्ही प्रसंगांचा विचार करता त्यावेळी माझे केस, माझा भांग आणि माझी मिशी या चटकन् नजरेत भरणाऱ्या गोष्टी होत्या. माझे कोणतेच कर्तृत्व तोपर्यत दृष्टीस पडत नव्हते. त्यामूळे माझ्या दृष्य गोष्टी फुटकळ असूनही त्याच नजरेत भरत होत्या. त्या क्षणी मला हे कळले होते की माझ्या पालकांना माझे कर्तृत्व दिसले पाहिजे. एकदा का माझे कर्तृत्व त्यांच्या नजरेत भरले, की मग त्यांचे लक्ष अशा फुटकळ गोष्टींकडे जाणार नाही!
या विचारांनी प्रेरित होऊन मी केवळ माझं कर्तृत्व घडविण्याकडंच सारं लक्ष केंद्रीत केलं. त्यानंतर मला अजून तरी मी कसं राहावं? माझी केशभूषा किंवा वेषभूषा कशी असावी? याबाबत माझ्या पालकांकडूनच काय इतरही कुणाकडूनही मला कधीच आणि काहीच ऐकावं लागलं नाही.
मतितार्थ असा की,
मुलांनो तुमच्या आणि तुमच्या भोवतालच्या लोकांची नजर तुमच्यावर असणारच आहे. हे लक्षात ठेवून तुम्ही त्यांच्या नजरा तुमच्यातल्या गुणांवर आणि तुमच्या कर्तृत्वावर स्थिरावतील याकडे लक्ष दयायला हवं. तुमचे गुण आणि तुमचं कर्तृत्व इतकं फुलवा की ज्यामुळे त्यांच्या नजरा तुमच्या गुणांवर आणि कर्तृत्वावरच स्थिरावतील आणि तुमच्यातल्या क्षुल्लक, फुटकळ अवगुणावर त्यांची नजर जाणार नाही..!
लेखक
© अनिल आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक*
सावेडी, अहमदनगर
धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन
अहिरानी निरुपण पुस्तक संत तुकाराम ना आगाजा
राज्यसभेवर खान्देशातून किती लोक घेतले?
खान्देशी कलावंत दिनेश चव्हाण यांना दादासाहेब फाळके पुरस्कार