“मुख्यमंत्र्यांनी दिले ‘शाब्दिक ‘वाण’! गीतांजली ताईंनी केले ‘जिवाचे रान’!”
धुळे येथील समाजसेविका गीतांजलीताई कोळी यांनी आजवर समाजामधील अनेक दुष्ट प्रवृत्तींचा नाश करून सदैव समाजातील वेगवेगळी कार्य केलेली आहेत. समाजामधील वयोवृद्धांपासून तर तरुणांची, स्त्रियांपासून तर पुरुषांची कामे त्यांनी अगदी निस्वार्थपणे केलेली आहेत. त्यासाठी त्यांनी लढाई, केली संघर्ष केला, एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या खस्ता खाल्ल्यात. त्यानंतर त्यांनी गेली साठ वर्षांपासून कोळी जमातीवर शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविला यासाठी त्यांनी तब्बल 11 दिवसांचे उपोषण केले. तरीही शासनाने या स्त्रीकडे, तिच्या आवाजाकडे लक्ष दिले नाही!
कोळी समाजाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950 पर्यंत एस.टी.चे आरक्षण मिळत होते. त्यानंतर मात्र काही वर्षांनी गोविंद गारे यांच्या अपूर्ण संशोधनाच्या आधारे हे आरक्षण नाकारण्यात आले. गोविंद गारे यांनी कुठलेही वैयक्तिक संशोधन न करता, महाराष्ट्रातील इतर भागांमधील कोळी समाजाचा अभ्यास न करता केवळ आंधळेपणांनी मेकॅनटोश नावाच्या इंग्रज लेखकाच्या मर्यादित नोंदीवरून आपला पीएच. डी.चा प्रबंध सादर केला. आणि त्याचाच आधार घेऊन शासनानेही कुठलीही वास्तविकता न तपासता सरसकट महाराष्ट्रातील कोळी बांधवांचे अस्तित्व नाकारले. त्यांचे आरक्षण काढून टाकण्यात आले. हा खेळ शासनाने पुढेही कायम ठेवला. महाराष्ट्रातील अनेक लोकांनी याविरुद्ध आवाज उठविला. परंतु 1950 च्या पूर्वीचा कोळी समाजाची नोंद असलेला पुरावा द्या आणि सवलत मिळवा असा ‘कुरघोडीचा खेळ’ शासनाने चालविला आहे.
महाराष्ट्रातील कोळी समाजाचे विद्वान संशोधक डॉ. ज. पां . खोडके यांनी प्रचंड संशोधन करून कोळी जातीचा 1916 सालचा पुरावा शोधून काढला. आर. व्ही. रसेल या आयसीएस अधिकाऱ्यांनी 1916 साली लिहिलेल्या ‘The tribe and cast of Central provinces of India’ या पुस्तकांमधील पृष्ठ क्रमांक 534 पानावर नमूद केलेला पुरावा शोधला. त्यामध्ये रसेल यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की “In bearer the principal group is that of Mahadeo Kolis, whose name maybe derived from the Mahadeo or pachmarhi hills.” यामधील बेरार म्हणजे पूर्वीचा बेरार यामध्ये आजच्या विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा व यवतमाळ हे जिल्हे येतात. “रसेल यांच्या या पुराव्यावरून महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये असलेले कोळी लोक हे अनुसूचित जमातीच्या सर्व सवलतींचे हक्कदार आहेत.
यासाठी अण्णासाहेब राऊत (माजी जिल्हाधिकारी), रावसाहेब आपोतीकर, डॉ. ज. पां. खोडके, आमदार क्रांती कोळी यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा शिष्टमंडळे शासनाला व आयोगांना भेटलीत पण प्रत्येक वेळी गोविंद गारेंची ढाल पुढे करून नकार देण्यात आला ( दै. देशोन्नती अकोला दि. २१/०८/१९८६ डॉ . ज. पां. खोडके यांच्या लेखणीतून…)
माननीय गीतांजलीताई कोळी यांनी या अन्यायाला परत एकदा वाचा फोडली. शासनाला शांततापूर्वक विनंती करण्यासाठी आणि समाजावरील अन्यायाची दखल घेऊन त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सोडण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाकडे कुच केली. या महिलेने अन्यायाविरुद्ध लढण्याचे धाडस दाखविले. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री यांनी 2014 मध्ये महाराष्ट्रातील कोळी बांधवांना वचन दिले होते. त्या वचनाचे स्मरण करून देण्याकरिता या महिलेने चक्क आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यंत कडाक्याच्या थंडीत धुळे ते नागपूर अशी पदयात्रा काढली.
विदर्भातील थंडीचा सामना करीत 550 किलोमीटरचा रात्रंदिवसाचा प्रवास करून दाखविला. धुळे ते नागपूर असा त्यांच्या चार सहकाऱ्यांना घेऊन त्यांनी प्रवास पूर्ण केला. गीतांजली ताईंनी आपल्या शिष्ट मंडळातील पंधरा व्यक्ती सोबत नागपूर येथील यशवंत स्टेडियम गाठले. तिथून त्या निवेदन देण्याकरिता अधिवेशन स्थळी गेल्यात. या ऐतिहासिक क्षणाचे आम्हा शिष्टमंडळांसह अनेक समाज बांधव प्रत्यक्ष साक्षीदार होतो.
महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या बांधवांचे तसेच संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे गीतांजली ताई यांच्या या निवेदनाकडे लागून होते. या संघर्षात शेवटचा आशेचा किरण दिसत होता मात्र दुर्दैवाने मुख्यमंत्रीसाहेबांची भेट होऊ शकली नाही.
संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी कोळी समाजाचे प्रतिनिधित्व एका स्त्रीने करावे आणि एवढा जबरदस्त लढा द्यावा ही घटनाच तिचे ‘रणरागिणत्व’ सिद्ध करणारे आहे. त्या क्षणी मुख्यमंत्रीसाहेब भेटू न शकल्यामुळे आणि समाजाचा न्याय करू न शकल्याने गीतांजलीताई हरल्या नाहीत. तर त्यांनी जोवर समाजाचा हा प्रश्न सोडवीणार नाहीत तोवर ‘यशवंत स्टेडियम’ वरून हलणार नाही असा ‘प्रण’ घेतला आहे.
महाराष्ट्रातील सरकार हे एकवचनी प्रभू श्रीरामचंद्रांना मानणारे, स्वीकारणारे, आणि एवढेच नव्हे तर पुन्हा प्रस्थापित करणारे सरकार आहे. आता प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी सामाजिक न्याय करावा एवढीच माफक अपेक्षा आम्ही करतोय.
शब्दांकन
नागपूर टीमच्या वतीने…
पद्मिनी खोडके (देशमुख)