दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन



मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या व महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अन् गोदामाईच्या कुशीत अध्यात्मिक व ऐतिहासिक वैभव घेऊन जन्मलेली अन् सांस्कृतिक वारसा रुजून विस्तारलेली नाशिक नगरी म्हणजे मूर्तीमंत इतिहासाच्या,स्वातंत्र्याच्या अध्यात्माच्या अन् साहित्याच्या सुवर्णमयी पाऊलखुणा आपल्या काळजात जपणारी संस्कारवर्धिनीच होय.

नाशिक नगरी म्हणजे साक्षात कुसुमाग्रजांसारखे साहित्यसंत निर्माण करणारी ज्ञानपंढरी म्हटलं तरी वावगं ठरु नये..जानेवारी महिन्यातली अंगात हुडहुडी भरवणारी गुलाबी थंडी,वातावरणातला तीव्र गारवा अन् शेकोटीच्या सभोवती साहित्य,नृत्याविष्कार अन् लोककलांचा परमानंद देणारा उबदार गोडवा हा त्रिवेणी संगम म्हणजे साहित्य मांदियाळीची जमलेली देखणी पर्वणीच होती..भावबंधन मंगल कार्यालय नाशिक या प्रशस्त स्थळी दुसरे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन नुकतेच मोठ्या धुमधडाक्याने पार पडले.

गिरणा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष मा.दादासाहेब सुरेशजी पवार म्हणजे खान्देशाच्या मातीत जन्मलेला अनमोल कोहिनूर हिराच आहेत यात तिळमात्र शंका नाही..शेवटी साहित्यहिरा म्हटला म्हणजे तो झळकणारच व कला-साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कलावंत व साहित्यिकांच्या कला-साहित्याला झळाळी सुद्धा देणारचं..त्या अनुषंगाने अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन या सुंदर संकल्पनेचा जन्म गतवर्षी झाला आणि पहिलेच अखिल भारतीय शेकोटी संमेलन न भूतो न भविष्यती इतक्या सुंदरतेने यशस्वीपणे पार पडले याचं सर्वस्वी श्रेय मा.दादासाहेब सुरेशजी पवार व त्यांना समर्थ साथ देणाऱ्या गिरणा प्रतिष्ठानच्या सर्व बिनीच्या शिलेदारांना दिलचं पाहिजे.गिरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचं व सक्रिय कार्यकारिणीचं कितीही कौतुक केलं तरी शब्द अपुरेच पडतील इतकं सुंदर त्यांचं कला-साहित्य क्षेत्रातलं योगदान विलोभनीय आहे म्हणून कालच्या शेकाटी गझल मुशायऱ्या विषयी सांगावसं वाटतं.



शेकोटी तू फार भावली कवी मनाला
सांगेन तुझी किर्ती ‘देवा’अता जगाला..



थोर साहित्यिक स्व.ना.धो.महानोर व स्व.डॉ.शंकर बोऱ्हाडे साहित्य नगरीत शनिवार दि.१३ जानेवारी २०२४ रोजी पैगंबरवासी इलाही जमादार गझल मंचावर मराठी गझलेचे आद्यदैवत स्व.सुरेशजी भट साहेब यांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन माझ्या हस्ते करुन गझल मुशायर्‍याचा प्रारंभ करण्यात आला.गझल मंचाचे आयोजक माझे सन्मित्र मा.बाळासाहेब गिरी व गोरखजी पालवे यांनी अतिशय सुंदररित्या गझल मंचाचे नियोजन केले.या गझल मुशायऱ्याचा अध्यक्ष म्हणून मला जो सन्मान दिला व माझ्या हस्ते उपस्थित नव्या-जुन्या गझलकारांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला हे मी माझे परमभाग्य समजतो.

गझल मुशायऱ्यात जुन्या व नव्या गझलकरांचा यथोचित समन्वय साधण्याचा सर्वांगसुंदर प्रयत्न श्री.बाळासाहेब गिरी व गोरखजी पालवे यांच्या नियोजनातून निर्दशनास आला.गारव्याचा शृंगार लेऊन गुलाबी थंडी जशी कणाकणाने वाढू लागली तशी गझलकारांची दमदार मैफिल उबदार गझलांनी बहरू लागली.

गझल क्षेत्रातले नामवंत गझलकार श्री.तु.सी.ढिकले,सोमनाथजी साखरे,अरुणजी सोनवणे,नंदकिशोर ठोंबरे,अजयजी बिरारी,प्रदीप तळेकर,जयश्री कुलकर्णी,संजय गोरडे,राजेंद्र उगले,सोमदत्त मुंजवाडकर अन् नवे उभरते गझलकार कुणाल शिरोडे व सर्व तरुण गझलकारांनी सुंदर गझलांच्या सादरीकरणातून शेरांची उधळण केली व उपस्थित श्रोत्यांना हृदयाला स्पर्श करणाऱ्या सर्वांगसुंदर गझलांची मेजवानी दिली अन् तेवढ्याच ताकदीचे व तोलामोलाचे रेखीव आणि भरीव चपखल शब्दांनी खुमासदार सूत्रसंचालन गझलकारा जयश्री वाघ व विनय दादा यांनी करून गझल मुशायऱ्यात आगळी वेगळी रंगत आणली व शेकोटी गझल मुशायरा यशस्वी केला.


गिरणादूत मा.सुरेशजी पवार,सन्मित्र मा.बाळासाहेब गिरी व गोरख दादा पालवे यांनी मला गझल मुशायऱ्याचा अध्यक्ष म्हणून जो सन्मान दिला तो मी माझ्या आयुष्यातला अनमोल ठेवा म्हणून काळजात जपून ठेवेल.या सन्मानाबद्दल त्यांचे कितीही आभार मानले तरी कमीचं आहेत..मनापासून सर्वांचे ऋणनिर्देश व्यक्त करतो. गिरणा प्रतिष्ठानच्या आगामी तिसऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनासाठी मनस्वी शुभचिंतन करतो..धन्यवाद जय हिंद ! जय महाराष्ट्र ! जय खान्देश !

सुगंधानुज.
नामपूर ता.बागलाण जि.नाशिक
मो.नं.९४२१५०१६९५.

दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन 2
दमदार गुलाबी थंडीचं आगमन अन् उबदार शेकोटी गझल संमेलन

Leave a Comment