अहिराणी भाषा – खान्देशचा अभिमान!
शिंदाड येथे प्रा. प्रवीण माळींचे प्रेरणादायी व्याख्यान
पाचोरा:
अहिराणी भाषा ही खान्देशच्या संस्कृतीचे अनमोल वैभव असून, ती जपणे आणि अभिमानाने बोलणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत प्रा. प्रवीण माळी यांनी व्यक्त केले. शिंदाड येथे छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत “आयतं पोयतं सख्यांन” या एकपात्री प्रयोगाच्या पाचव्या पुष्पाच्या सादरीकरणावेळी त्यांनी हे विचार मांडले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रभाकर पाटील, वर्षा पाटील, स्वाती पाटील, वंदना मनगटे, दर्शना गजानन पाटील आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
अहिराणी भाषा – आपली ओळख, आपली शान
प्रा. माळी म्हणाले की, अहिराणी ही केवळ भाषा नसून खान्देशच्या संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. पुढील पिढ्यांसाठी तिचे जतन करणे आपली जबाबदारी आहे. कुटुंबात, विशेषतः आजी-आजोबांशी संवाद साधताना तरुणांनी अहिराणी भाषेचा वापर करावा. तसेच, त्यांनी वाचन आणि व्यायाम यावर भर द्यावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
एकपात्री प्रयोगाने रसिक मंत्रमुग्ध
प्रा. प्रवीण माळी यांनी आपल्या “आयतं पोयतं सख्यांन” या एकपात्री प्रयोगातून खान्देशी लग्नाच्या परंपरांचे विनोदी आणि वास्तवदर्शी वर्णन करत रसिकांना खळखळून हसवले. लग्नातील पारंपरिक अहिराणी गाणी सादर करत त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला आणि तरुणांनी हजेरी लावली. यावेळी गावातील शुभम पाटील आणि दिव्या परदेशी यांची पोलिस भरतीसाठी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.