खान्देश पुत्र जयदीप पाटील यांना डिलीट पदवी

खान्देश पुत्र जयदीप पाटील यांना डिलीट पदवी

इदं न मम – आपल्या सर्वांच्या सदैव ऋणात राहू इच्छितो

“मज पामराशी काय थोरपण,
पायाची वहान पायी बरी ॥
@ जयदीप पाटील

लोकमान्य संस्कृत विद्यापीठ येवला (नाशिक) यांच्यातर्फे नुकतीच मानद डिलीट पदवी मिळाली. आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त केला शुभेच्छांचा वर्षाव आतापर्यंत सातत्याने सुरू आहे.याबद्दल विनम्र भावनेने आपल्या सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाचा स्वीकार करतो.


      लोकमान्य संस्कृत विद्यापीठाचे कुलपती पंडित मनोहर सुकेनकर, बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्कृत विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेश सरकार,दाते पंचांग करते डॉ. मोहन दाते यांच्या हस्ते हा सन्मान मी आणि माझी अर्धांगिनी जयश्री आम्ही स्वीकारला.मे महिन्याच्या सुरुवातीला संस्कृतचे गाढे अभ्यासक डॉ प्रसाद कुलकर्णी (कुलसचिव लोकमान्य संस्कृत विद्यापीठ)यांचा फोन आला आणि नोबेल फाउंडेशन द्वारा गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या विज्ञान सेवेच्या कार्याला सन्मानित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यानिमित्ताने डि.लीट ही मानद उपाधी प्रदान करण्याचे सरांनी सांगितले. ऐकून आनंद वाटला. आणि काही काळ मन भूतकाळात गेले.


        धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ या छोट्याशा गावातून मी शिक्षण घेतले. माझी परिस्थिती अतिशय प्रतिकूल होती.अशा परिस्थितीत माझी आई – वडील यांनी मला मोठ्या कष्टातून शिक्षण दिले. शिक्षणाच्या आधारावर काम करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा संस्कार जडणघडणीच्या काळात पुस्तकांमधून,व्याख्यानांमधून मिळत राहिला.

माझ्या एकूण जडण घडणीच्या काळात विज्ञान हा विषय माझ्यावर गारुड करून होता.कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विज्ञानाचे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना विज्ञानाबद्दल कुतूहल वाढत राहिले. एक दशकाहून अधिक काळ दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून खानदेशात अधिकारी घडविण्याचे कार्य केले. शेकडो विद्यार्थ्यांना अधिकारी होण्यापर्यंत पोहोचवले. मात्र मनातील विज्ञान सेवेचा विचार काही जाईना.

म्हणून स्वतंत्र विज्ञान क्षेत्रासाठी वाहून घेतलेली नोबेल फाउंडेशनची रचना केली. या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांना ISRO,आयआयटीपर्यंत पोहोचवले. आज सकाळीच इस्रो आयआयटीचा नववा दौरा पूर्ण करून घरी आलो 665 विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेमुळे इसरो बघितले याचा आनंद वाटतो.

यासह विज्ञान जागरूकता, व्याख्याने, कार्यशाळा विज्ञानातील सेवाव्रत्तींना संस्थेच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे तसेच सामान्य स्तरातील विद्यार्थ्यांना JEE/NEET सारख्या परीक्षांना विनामूल्य मार्गदर्शन करणे असे विविध कार्य आम्ही करत राहिलो.


         हे कार्य एकट्या दुखट्याने शक्य नव्हते याच्यात अनेक व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे. म्हणून हा सन्मान माझा एकट्याचा मुळीच नाही. तर विज्ञानावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आणि विज्ञान शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा हा सन्मान आहे.

मी अतिशय नम्र भावनेने हात जोडून आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो.एवढ्या मोठ्या पदवीच्या पात्रतेचा मी अजिबात नाही.मी पदवी घेताना सुद्धा हे नमूद केले की,मी व्यक्ती म्हणून ही पदवी स्वीकारत नाही हा सन्मान विज्ञानाच्या कार्याचा आहे आणि विज्ञानासाठी कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचा आहे.

आपण सर्वांनी गेल्या काही दिवसापासून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव सातत्याने जो सुरू ठेवला आहे त्याबद्दल मन भरून येते.एका अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाला वयाच्या 38 व्या वर्षी डि.लीट सारखी पदवी मिळणे हा माझ्यामते प्रत्येक शेतकरी कुटुंबाचा सन्मान आहे.मी हा सन्मान माझे आई- आबा तसेच माझा परिवार आणि विज्ञानासाठी कार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांना पालकांना व विद्यार्थ्यांना तसेच नोबेलच्या सर्व पाठीराखे आणि हितचिंतकांना समर्पित करीत आहे.


            यानिमित्ताने सर्व वृत्तपत्र,वृत्तवाहिन्या,समाज माध्यमातील सर्व ग्रुप्स,सहकारी,गावकरी,आपतेष्ट यांनी दिलेल्या शुभेच्छा निमित्त मनापासून ऋण व्यक्त करतो.यापुढे विज्ञान क्षेत्राची तसेच समाजातील गोरगरीब स्तरापर्यंत शिक्षणाची सेवा करण्यासाठी अजून मोठ्या ऊर्जेने आणि उत्साहाने कामाला लागेल.माझ्या हातून समाजाची अल्पशी सेवा होत असताना मला परमेश्वराने कधीही अहंकाराचा वारा लागू देऊ नये हीच प्रार्थना परमेश्वराला करतो !



आपल्या सर्व समाजाच्या ऋणात राहू इच्छितो धन्यवाद !

आपला
जयदीप

NEET Scholarship
NEET Scholarship Batch डॉक्टर व्हायचे आहे का ? तेही अत्यंत कमी पैशात
खान्देश पुत्र जयदीप पाटील यांना डिलीट पदवी 3

Leave a Comment