बोल हे अंतरीचे लेखसंग्रहाचे बुलढाणा येथे प्रकाशन
बोल हे अंतरीचे लेखसंग्रहाचे बुलढाणा येथे प्रकाशन
चित्रकार आणि कवी दिनेश चव्हाण लिखित बोल हे अंतरीचे या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन बुलढाणा येथे सहावे राज्यस्तरीय “उल गुलान” आदिवासी साहित्य संमेलनात रविवारी, २९ रोजी संपन्न झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन बुलढाण्याचे माजी आमदार विजयराजे शिंदे, झारखंडचे आदिवासी साहित्यकार वंदना टेटे आणि डॉ. विनायक तुमराम यांच्या हस्ते झाले. या वेळी संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. गोविंद गायकी, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सदानंद देशमुख, दिलीप मोरे, सुनील कुमारे, मांगीलाल राठोड, नवाज रफी राही, आदिवासी साहित्यिक सुनील गायकवाड, गौतमकुमार निकम, कवयित्री ललिता पाटील, कवयित्री नंदा मघाडे आणि आदिवासी साहित्यकार मंचावर उपस्थित होते.
बोल हे अंतरीचे या लेखसंग्रहात एकूण २० वैचारिक लेख आहेत, जे विविध सामाजिक, शैक्षणिक तसेच महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकतात आणि बौद्धिक विचारांना प्राधान्य देतात. या पुस्तकाला बीडचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक प्रा. शशिकांत कुलथे यांनी प्रस्तावना लिहिली आहे, तर पाठराखण बालभारती पाठ्यपुस्तक मंडळाचे माजी सदस्य, लेखक, निवेदक, विचारवंत आणि इतिहास अभ्यासक श्रीकांत चौगुले यांनी केली आहे. साईराजे प्रकाशन, पुणे यांनी या पुस्तकाचा दर्जेदार अंक प्रकाशित केला आहे.
दिनेश चव्हाण यांचा हा तिसरा लेखसंग्रह आहे. यापूर्वी त्यांचा शब्दस्पंदन हा चित्रचारोळी संग्रह मुंबईत ताजमध्ये मोठ्या दिमाखात प्रकाशित झाला होता. तसेच, अधोरेखित हा काव्यसंग्रह अमळनेर येथे ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या हस्ते प्रकाशित झाला होता.
दिनेश चव्हाण हे चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत आणि त्यांची ओएमजी बुक ऑफ रेकॉर्डमध्ये *फास्टेस्ट स्केच आर्टिस्ट* म्हणून नोंद आहे. त्यांच्या विविध कथा, कविता, लेख, चारोळ्या, व्यंगचित्र, कथाचित्र, लेखचित्र, आणि पोट्रेट विविध मासिके, वर्तमानपत्र, दिवाळी अंकांमध्ये नियमितपणे प्रकाशित होत असतात. याशिवाय त्यांनी अनेक राज्यस्तरीय आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनांसाठी बोधचिन्ह तयार केले आहेत. त्यांच्या या तिसऱ्या पुस्तकाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
लेखक परिचय:
दिनेश चव्हाण हे एक अष्टपैलू लेखक, कवी आणि चित्रकार आहेत. साहित्य क्षेत्रात त्यांच्या विविध कलाकृतींमुळे त्यांचे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जाते.