काळजी करु नका, काळजी घ्या! Don’t worry, take care!
Table of Contents
या काळजीचं नेमकं काय करायचं?
“माणसानं काळजी तरी कशा- कशाची करावी?” किंवा “काळजी तरी किती करावी माणसानं?” यासारखे प्रश्न विचारणारी प्रश्नांकित चेहऱ्याची अनेक काळजीग्रस्त माणसं आपल्याला रोज दिसतात. कधी कधी आपण स्वतःही त्यांच्यातलेच एक असतो. दुसरीकडे “काळजी करु नका, सारं काही ठीक होईल.” असं म्हणत धीर देणारीही अनेक माणसं आपणास दिसत असतात. कधी ना कधी आपणही त्या भूमिकेत असतोच. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची काळजी लागून राहिलेली असते. कोणतीच काळजी नसलेला माणूस या भूतलावर शोधूनही सापडणार नाही. थोडक्यात काय तर, काळजी ही मानवी जीवनातली सर्वव्यापी आणि अटळ गोष्ट आहे. या काळजीचं नेमकं काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर सांगणारा आणि माणसाचं जगणं सोपं करणारा हा लेख.
काळजीनं आमचं मन व्याकूळ होतंय
“माझ्या मधूचं पुढं कसं होणार? या काळजीनं आमचं मन व्याकूळ होतंय. एवढा पोस्ट ग्रॅज्यूएट झालाय; पण नोकरी लागत नाही. वय वाढत चाललंय. त्याचं लग्न कसं होईल? एवढं मोठं घर बांधून ठेवलंय, ते आम्हाला खायला उठतंय. कशातच आमचं मन रमत नाही.” मधूचे आई- वडील बोलत होते.
“विदूची आम्हाला काळजी वाटतेय. तिचं लग्न काही केल्या जुळत नाही. एवढी शिकली- सवरलेली विदू चांगल्या लठ्ठ पगाराची नोकरी करतेय; पण काय चाटायचंय का त्या नोकरीला?” विदूचे आई-वडील आपला संताप व्यक्त करीत होते.
सिग्नलवरचा अनामिक मुलगा आपल्या हातातल्या लहान मुलीकडे बोट दाखवून म्हणत होता- “दोन दिवस झालेत, पोटात अन्नाचा कणही गेला नाहीय. आम्ही कसं जगायचं?”
“आपला अंथुरणावर खिळलेला बाप आता कधी बरा होणार? की या आजारातच तो आपला दम तोडणार?
” रघुला हा प्रश्न छळत होता.
काळजी ही मानवी जीवनातली सर्वव्यापी आणि अटळ गोष्ट
या आणि यासारख्या विविध प्रकारचे काळजीचे सूर आपल्या अवतीभवती आपण ऐकत असतो. कुणाला चाकरीची तर कुणाला भाकरीची काळजी असते. कुणाला अन्नाची तर कुणाला धनाची काळजी असते. कुणी आजाराच्या काळजीनं तर कुणी शेजाराच्या काळजीनं बेजार असतं. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची काळजी लागून राहिलेली असते. कोणतीच काळजी नसलेला माणूस या भूतलावर शोधूनही सापडणार नाही. थोडक्यात काय तर, काळजी ही मानवी जीवनातली सर्वव्यापी आणि अटळ गोष्ट आहे. या काळजीचं नेमकं काय करायचं? हा प्रश्न प्रत्येकाला कमी अधिक तीव्रतेनं छळत असतो.
भीती, चिंता आणि घोर
काळजीची तीव्रता ज्या प्रमाणात कमी अधिक होते त्यानुसार काळजीचं वर्णन करण्यासाठी भीती, चिंता आणि घोर असे शब्द आपण क्रमाक्रमाने वापरीत असतो. ‘भीती’ ही काळजीची पहिली पायरी असते. माणसाला त्याच्या जवळचे धन, दौलत, पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान, तारुण्य, सौंदर्य, वेळ, काळ आणि वय इ. गोष्टी सरण्याचे भय असते. हे सारं किंवा यातलं काही सरुन गेल्यावरही तो स्वतः मात्र मागे एकदम रिता होऊन उरणार असतो. या रितं होऊन मागं उरण्याची त्याला ‘चिंता’ वाटत असते. त्याच्या सोबत असं काहीही अघटीत होऊ नये यासाठी तो आयुष्यभर लढत असतो. या लढाईत त्याला बऱ्याचदा मनासारखं यश मिळत असलं तरी प्रत्येक वेळी यशच मिळेल असं होत नाही. जेव्हा एखाद्या अशा लढाईत माणूस हरतो तेव्हा त्याची काळजी वाढत जाते, ज्याला आपण ‘घोर’ असं म्हणतो. याचा अर्थ भीती, चिंता आणि घोर ही काळजीचीच रुपे आहेत.
नको खेद करु कोणत्या गोष्टीचा I तूझी चिंता त्याशी सर्व आहे
काळजी मग ती कोणत्या का प्रकारची असेना, त्यातून खेद निर्माण होतो. खेद ही दुःखाची पहिली पायरी आहे.
या खेदामुळेच माणसाला दुःखाची प्रथम जाणीव होते. पुढे खिन्नता, निराशा, उदासी असं मजल दरमजल करीत आयुष्यातला आनंद नाहीसा होत जातो. हे होऊ नये यासाठीच संतश्रेष्ठांनी म्हटले आहे- “नको खेद करु कोणत्या गोष्टीचा I तूझी चिंता त्याशी सर्व आहे ॥”
माणसानं काळजी करावी की करू नये? याबाबत अनेक विचारवंतांनी आपली मतं मांडली आहेत. त्या सगळ्या मतांचा सारासार विचार केला तर “माणसानं काळजी करु नये” या मताशी बहुसंख्य विचारवंतांचं एकमत झालेलं आहे असं आपणास दिसून येतं. “कर्मण्येवाधिकारस्ते माफलेषु कदाचन्” या गीतेतील कर्मसिद्धांताच्या मुळाशीही नेमका हाच विचार आहे.
नकारात्मक विचार करणं टाळा
माणसाला बुद्धीचं वरदान मिळालेलं आहे. या बुध्दीच्या आधाराने तो विचार करु शकतो. विचार करता येणं हे माणसाचं सामान्य लक्षण आहे. असं असलं तरी ‘विचार करणं’ म्हणजे ‘काळजी करणं होय’ असा काहीसा गैरसमज दुर्दैवानं बहुतेक माणसांचा झालेला आहे. याच गैरसमजामुळे माणसाची विचार करण्याची शक्ती हीच माणसाची कमतरता ठरली आहे! हे वास्तव आपणास नजरेआड करता येणार नाही. आपल्याला मिळालेल्या बुद्धीचा वापर करुन माणसानं वास्तविक आणि सकारात्मक विचार करायला हवा. आपले नकारात्मक किंवा अवास्तव विचार आपली काळजी वाढवित नेतात. म्हणूनच आपण असा अवास्तव आणि नकारात्मक विचार करणं टाळायला हवं. असं करताना माणसानं काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी असं मला तीव्रतेनं वाटतं.
काळजी करण्यापेक्षा काळजी घ्यायला हवी
‘काळजी करणं’ आणि ‘काळजी घेणं’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माणसानं काळजी करायची नाही याचा अर्थ भीती, चिंता आणि घोर निर्माण होईल अशा विचारांना माणसानं दूर ठेवलं पाहिजे. ‘द सिक्रेट’ या प्रसिद्ध पुस्तकात सुमारे सदोतीस शास्त्रज्ञांनी एकमताने असं मत मांडलं आहे की- “तुम्हाला हव्या आहेत त्याच गोष्टींवर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रीत करा, तुम्हाला नको असलेल्या गोष्टींचा तुम्ही विचारही करु नका. हेच तुमच्या यशाचं खरं गमक आहे!” लेखाच्या शीर्षकाच्या उत्तरार्धात म्हटल्याप्रमाणे आपण फक्त काळजी घ्यायला हवी. काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं? असा प्रश्न वाचकांना पडला नसेल तरच नवल म्हणायचे. काळजी घेणं म्हणजे ‘काळ’ जे म्हणेल त्याला आपण ‘जी’ असं म्हणत रहाणं होय. याचा सरळ अर्थ असा की, काळजी घेणं म्हणजे प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणं होय. अर्थात प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करणं म्हणजे “कालाय तस्मै नमः” असं म्हणत परिस्थितीला संपूर्ण शरण जाणं नव्हे!
याचं भानही आपण राखायला हवं. प्राप्त परिस्थितीचा आहे तसा स्वीकार करुन आपण थांबायचं नाही तर आपले कष्ट आणि प्रयत्नांच्या आधारे परिस्थितीची प्रतिकुलता अनुकूलतेत रूपांतरीत करण्यासाठीची लढाई सुरु ठेवायची असते. या लढाईत आपण जिंकू किंवा कदाचित हरूही शकतो. आपल्यासमोरची परिस्थिती आपल्याला प्रयत्नांनीही अनुकूल करता येत नसेल तर अशा वेळी आपण स्वतःमध्ये बदल घडवणं हा एकमेव पर्याय आपल्याजवळ उरतो. स्वतःला बदलवणं म्हणजे आपल्या धारणा आणि श्रध्दा बदलणं होय. अशा बदलासाठी आपली आवड, निवड, इच्छा, आकांक्षा आणि आपल्या काही गरजांनाही मुरड घालावी लागते. हे सोपं नसलं तरी खूप कठीणही नाही हे आपण समजून घेणं महत्वाचं असतं. एकदा हे समजलं की, आपल्याला काळजी करण्यापेक्षा काळजी घेणंच महत्वाचं आणि उपयोगाचं आहे हेही लक्षात येतं.
म्हणून काळजी करु नका, काळजी घ्या!
लेखक
© अनिल आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक*
सावेडी, अहमदनगर,
अनाथांचे देवरुप घर श्री शंकरबाबा पापडकर
मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा
लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे
1 thought on “काळजी करु नका काळजी घ्या”