नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत
दैनिक पोलीस शोध
संपादकीय…
दि.1/1/2024
नूतन वर्षाचे हार्दिक स्वागत !
31 डिसेंबर 2023 या वर्षाला निरोप देतांना कुणाला वेदना झाल्या असतील तर कुणाला आनंद झाला असेल. कारण गेल्या वर्षात घडलेल्या घटना या कुणासाठी आंनदाच्या तर कुणासाठी दुखाःच्या असतील. अर्थात येणारा प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना, प्रत्येक वर्ष हे आपल्याच पध्दतीने निघून जात असते. आणि गेल्या वर्षाच्या राहतात केवळ आठवणी. म्हणून प्रत्येक क्षण आंनदाने जगण्याची कला जर आम्ही आत्मसात केली तर आयुष्य सुखाने जगता येते.
मोह, माया, आसक्ती या मानवी जीवनाच्या सामाजिक – राजकीय क्षेत्रातील व्यक्तीच्या व सामान्य माणसाच्या अविभाज्य संवेदना असतात. सामान्य माणसाला आपले जीवन सुखकर असावे अशी अपेक्षा असते. तर राजकीय क्षेत्रातील माणसाला सत्तेच्या पदासाठी आसक्ती असते.
अपेक्षा आणि आसक्ती यात खुप मोठे अंतर असते. अपेक्षा या सामान्य असतात तर आसक्तीमध्ये तीव्रता असते. अशा या चक्रात वर्षामागुन वर्षे येत राहतात आणि जात राहतात. अनेकजण यात यशस्वी होतात, तर शेतकरी, कामगांरासारखा वर्ग थोडक्यात समाधान मानुन जीवन जगत असतो. अशाच या दैनंदिन चक्रात वर्षामागून वर्षे संपत असतात. परंतू या काळाचे महत्व समजून आणि मोह, माया व आसक्ती यातून ‘मुक्त’ होत जीवन जगण्याचा प्रयत्न जे करतात ते ‘संत’ या संज्ञेत मोडतात.
कारण त्यांच्यामध्ये त्याग आणि समाधान यांची भावना दृढ असते. अपरिग्रहाची भावना त्यागात अधिक असते. म्हणून सामान्य माणूस अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत असतो. स्पर्धेच्या गतीमान युगात आम्ही जगतो आहोत. माहितीचा स्फोट झालेला आहे. साधनांमध्ये मानवी जीवनाची वाटचाल सुरु झाली आहे. म्हणून एकेकाळी साधनांशिवाय जगणारा माणूस आज साधनांच्या तंत्रज्ञानात अडकत चालला आहे. साधे-सरळ जीवन जगणे आता अशक्य वाटू लागले आहे.
आणि सांधनांसाठी मुबलक प्रमाणात आर्थिक सुबत्ता आवश्यक आहे. हीच आर्थिक सुबत्ता मिळावी यासाठी प्रत्येक माणूस अहोरात्र धावतो आहे. माझ्या जीवनाचे अंतिम सत्य काय? हे जाणून न घेता मात्र तो केवळ धावतो आहे. या धावण्याच्या मर्यादा कुणालाही माहित नाही. साधनांच्या प्राप्तीसाठी धावण्याची गतिमान स्पर्धा सुरु आहे. आणि यातच आम्ही मनशांती गमावून बसलो आहेात.
स्वास्थ्य गामावून आम्ही धावतो आहोत हे मात्र कुणाच्याही लक्ष्यात येत नाही हे विशेष. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, कृषी, क्रीडा, प्रशासन या सारख्या सर्वच क्षेत्रात साधी सुरु आहे. सामाजिक क्षेत्रात नाव मिळविण्यासाठी काही सिध्दांतवादी मंडळी काम करतांना दिसतात. तर याच क्षेत्रात समाजसेवेच्या नावाखाली बदमाशी करुन काम करणार्या मंडळीची देखील कमतरता नाही. राजकीय क्षेत्रात काम करतांना ‘सेवाभाव’ हा एकेकाळी महत्वाचा मानला जायचा. आज ‘मेवाभाव’ शिवाय सेवाभाव नाही अशी स्थिती आहे. राजकारण म्हणजे शिवी झाली आहे इतका खालचा स्तर राजकारणाने गाठला आहे. राजकीय स्पर्धेत एकदूर्याला संपविण्याचा कट रचला जात असून त्यासाठी कुठल्याही स्तरापर्यंन्त जाण्याची मानसिकता बळावतांना दिसते ओह.
द्वेष भावना वाढून राजकीय वैरभाव वाढतोे आहे. शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धा देखील जीवघेणी ठरते आहे. टक्केवारीच्या हा संशोधनाचा भाग आहे. लहान मुलांचे बालपण संपले असून दोन वर्षाच्या बाळाला प्ले ग्रूपच्या आकर्षण नावाखाली अडकविले जात आहे. तर एमपीएसी, युपीएसीच्या स्पर्धेत लाखो तरुण आपली सोन्यासारखी वर्ष अहोरात्र मेहनत करुन संपवत आहेत. त्यात मोजक्याच तरूणांना संधी मिळत असली तरी लाखो तरूण यातून नैराश्याच्या खाईत आले आहेत. आर्थिक सुबत्ता यावी, दोन पैसे अधिक मिळावेत यासाठी सामान्य कामगार, नोकरदार, शेतकरी माणूस धावतो आहे. परंतू आपल्या गरजा कमी करण्याचा विचार कुणाच्याही मनात येत नाही. संग्रह करण्याची प्रवृत्ती, वाढलेल्या अपेक्षा मानवी स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत आहे.
समाधान संपत चालले आहे, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडलेल्या रुग्णाचे दवाखाने मोठया प्रमाणावर रुग्णांच्या संख्येने भरलेले दिसत आहेत. अपेक्षा, मोह, माया, आसक्ती, संग्रह या मानवी प्रवृत्तीत प्रत्येक माणून गुरफटत चालला असून मानवी स्वास्थ बिघडत चालले आहे. प्रत्येक घरात ‘टेन्शन’ नावाचा शब्द आंनदाने वावरतो आहे. तर ब्लड प्रेशर, डायबीटीज,डीपप्रेशन सारखे आजार प्रत्येक घरात पोहचले आहेत. आधुनिक साधनांनी घरे भरली तशी आजारांनी शरीर ही व्यापले. गृहीणीची जागा काम करणार्या स्त्रीयांनी घेतली आहे.
घर झाडने, घर पुसधे, भांडी घासणे, कपडे धुणे आणि स्वंयपाक करणे या सर्व बाबी आता पैसे देऊन काम करणार्या श्रमिक, कष्टकरी महिलांकडुन करुन घेतल्या आहेत. त्यामुळे घरातील महिलांचे वजन वाढते आहे, त्यांचे आजार वाढत आहेत. परंतू हे कशामुळे होत आहे यावर विचार करायला कुणाकडेही वेळ नाही. त्यामुळे नूतनवर्षाचे स्वागत करतांना काही नवे ‘संकल्प’ दृढतापूर्वक करण्याची गरज आहे. सामान्य घरांमध्ये वाढलेले आजार, बिघडलेले स्वास्थ्य सुधरवायचे असेल तर श्रमाला महत्व द्या.
घरातली कामे घरातल्या महिलांनी करायला सुरुवात करा. पायी चालायला सुरुवात करा, व्यायम, प्राणायम, दिर्घ स्वसन करा. सकाळी पांच वाजता उठुन शरीरासाठी, मनस्वास्थासाठी व्यायाम करा. व्यसने सोडा, चहा बंद करा, सिगारेट, तंबाखू, गुटका खाणे पूर्ण बंद करा. ‘संयम’ हा आनंदी जीवनाचा महामार्ग आहे. तरुणाई मद्याच्या आहारी गेली आहे. परंतू आई-वडील अनंभिज्ञ आहेत. मुलींचे विवाह लांबत चालले आहेत परंतू त्याचे चितंन करायला कुणालाही वेळ नाही.
विवाह संस्था उध्वस्त होतांना दिसत आहेत. लिव्ह इन रिलेशन ही नवी संस्कृती अदयास येते आहे. संपूर्ण जीवन पध्दतीच बदलते आहे. त्यामुळे नव्या वर्षाचे स्वागत करतांना नव्या पध्दतीने विचार करुन नव्या उमेदीने, जगण्याची कला आत्मसात करा. मी आंनदी, समाधानी कसा राहिल या पध्दतीने जगायला शिका. नैराश्य, चिंता, अभिलाषा, लोभ, स्वार्थ या सर्व बाबी मनाला रोग लावणार्या आहेत.
त्यामुळे महात्मा गांधींच्या ‘एकादश’ व्रतामधील ’अपरिग्रह‘ म्हणजे संग्रह न करणे, या एका व्रतामुळेच मानवी स्वास्थ निरोगी होऊ शकते. म्हणून नव्या वर्षात खुप मोठया गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. लहान-लहान गोष्टी सुध्दा जीवनात आंनद निर्माण करू शकतात. विचार करा.
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.तुर्तास एव्हढेच.