राजकारणातील दांभिक ढोंगीपणा ओळखता यायला हवा


राजकारणातील दांभिक ढोंगीपणा ओळखता यायला हवा

नव्या पिढीला हिंदू धर्मातील ऋषि, मुनि, साधू आणि संन्याशी इ. बाबत अवगत करणे आवश्यक आहे. प्राचीन काळापासून भारतवर्षात ऋषि, मुनि साधू आणि संन्याशांना महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यांनी समाजाला नेहमीच चांगले मार्गदर्शन केले असुन आपल्या ज्ञानाचा व तपसाधनेच्या माध्यमातून मिळविलेल्या विविध सिद्धींचा वापर करुन त्यांनी नेहमीच समाजाचे कल्याण साधले आहे. अशी भारतीय समाजाची धारणा आहे. आजही वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी किंवा जंगलामध्ये असे सत्पुरुष आपल्याला पहायला मिळतात. सदैव काही ना काही धार्मिक कार्यात गुंतलेल्या अशा सत्पुरुषांना ऋषि, मुनि, साधु आणि संन्यासी इ. नावांनी ओळखले जाते. हे महापुरुष नेहमी तपस्या, साधना, मनन, चिंतन इ. द्वारा ज्ञान संपादन करीत असतात. त्यासाठी त्यांनी भौतिक किंवा ऐहिक सुखांचा त्याग केलेला असतो. अर्थात अपवाद म्हणून काही जणांनी मात्र संसारी जीवन जगण्याचा अनुभव काही प्रमाणात घेतल्याचीही उदाहरणे आहेत.
कोण असतात हे ऋषि, मुनि, साधु आणि संन्यासी? त्यांच्याबद्दल आपणास नेमकी काय माहिती आहे? या सर्व शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत? या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरे या लेखात आपण समजून घेवूयात.

ऋषी:
भारत हा नेहमीच ऋषींचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय समाजात ऋषींची परंपरा आहे. आजही आपण प्रत्येक भारतीय कुणा तरी ऋषीच्या वंशाचे वंशज आहोत. आपले गोत्र आपल्या ऋषिकुळाचा परिचय देत असते. श्रुति, स्मृतिसारख्या वैदिक ग्रंथांचे अध्ययन करणे, त्यांच्या गुढ अर्थाची उकल करणे आणि त्यातुन मिळालेले ज्ञान सकल प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी उपलब्ध करुन देणे यासारखी कार्ये करणाऱ्या व्यक्तींना ऋषि म्हटले जाते.

‘ऋष’ म्हणजे पाहणे. या न्यायाने ‘ऋषि’ म्हणजे पाहणारा. सामान्य माणसाच्या दृष्टीला जे दिसु शकत नाही असे सर्व काही पाहता येईल अशी गुढ दृष्टी त्यांना त्यांच्या तप- साधनेतून प्राप्त झालेली असते. एका अर्थाने ऋषि दृष्टे असतात. त्यांचा जीव आणि शिवाशी थेट संपर्क असतो. इतकेच नाही तर एखाद्या जड वस्तुमधील उर्जेचे किंवा चैतन्याचे त्यांना झटकन आकलन होते. वैदिक परंपरेने ऋचिंचे ब्रम्हर्षि, देवर्षि, महर्षि, परमऋषि, काण्डर्षि, श्रुतर्षि, आणि राजर्षि असे सात प्रकार सांगीतले आहेत. अत्रि, वशिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, भारद्वाज आणि काश्यप असे सात ऋषि शास्त्रात आणि पुराणांत प्रसिद्ध आहेत.

jai shree ram
jai shree ram



मुनि:
मुनि हे एक प्रकारचे ऋषि असले तरी दोघांत एक मूलभूत फरक करता येतो, तो म्हणजे ऋषी कोपिष्ट, क्रोधी किंवा तापट असू शकतात; मात्र मुनि खूप शांत आणि संयमी असतात. ज्यांचे चित्त दुःखावेगाने उद्विग्न होत नाही, जे सुखाची इच्छा सुद्धा करीत नाहीत, ज्यांना राग येत नाही, जे क्रोधाला बळी पडत नाहीत, ज्यांना कशाचीही भीती वाटत नाही, अशा निश्चल बुद्धिच्या सत्पुरुषास मुनि असे म्हणतात. मौन राखणारे ते मुनि असं थोडक्यात म्हणता येईल.

प्राचीन काळापासून मौन राखणे ही एक साधना समजली जाते. असे मौन राखून तपस्या केली जात असे. अशी मौन राखून तपसाधना करणाऱ्यास मुनि म्हटले जात असे. कमी बोलून केवळ जप-जाप करणाऱ्यां ऋषिंनाही मुनि म्हटले जाते. नारदमुनि हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

मन आणि तनाचे सौंदर्य, आकर्षण आणि नवलाई यांच्याशी निगडीत कार्य मुनि करीत असतात. मन आणि तनाशी निगडीत बाबींचे मनन आणि चिंतन करणे हेच मुनिंचे मुख्य काम आहे. यातूनच विविध मंत्र आणि तंत्र जन्माला येतात. अशा अनेक मंत्रांची व तंत्रांची रचना अनेक मुनिवर्यांनीच केलेली आहे.

साधू:
एखादी साधना करणाऱ्या व्यक्तीला ‘साधू’ असे म्हणतात. प्राचीन काळी एखाद्या विषयाचे संपूर्ण ज्ञान मिळवण्यासाठी समाजात राहून अथवा समाजाबाहेर राहून साधना केली जात असे. अशी साधना करणाऱ्या व्यक्तीस ‘साधू’ म्हणून ओळखले जाई. अशी साधना करणारी व्यक्ती सरळमार्गी, सत्शील, लोकहित जपणारी, सज्जन असते. साधूने काम, क्रोध लोभ, मोह, मद आणि मत्सर या दोषांचा त्याग केलेला असतो. त्यामुळेच सज्जन वृत्तीच्या माणसाचे वर्णन करण्यासाठी कधी कधी साधू हा शब्द वापरला जातो.
“साध्नोति परकार्यम् इति साधु:” अशी साधूची व्याख्या कौमुदी लघुसिद्धांतात केली आहे. याचा अर्थ दुसऱ्याचे किंवा दुसऱ्यासाठी कार्य करणारा तो ‘साधू’ होय. भगवी वस्त्रे परिधान करुन धर्म मार्गाने मार्गक्रमण करीत मोक्षाच्या दिशेने चालता चालता समाजाला दिशा दाखवण्याचे महत्कार्य साधू करीत असतात.

प्रभु श्रीराम
प्रभु श्रीराम



संन्याशी:
वैदिक हिंदू परंपरेत संन्यासाचा किंवा कुणा संन्याशी व्यक्तीचा उल्लेख फारसा आढळत नसला तरी जैन आणि बौद्ध परंपरेत संन्यास आणि संन्याशी वृत्तीचा उल्लेखनीय आढळ दिसून येतो. संन्यास म्हणजे संसाराचा आणि संग्रही वृत्तीचा त्याग करणे. थोडक्यात संन्याशी व्यक्ती आपले घरदार, कुंटूब, नातेवाईक, सत्ता, संपत्ती इ. चा त्याग करते. संन्याशी जीवन स्वीकारताना गृहस्थ जीवनाचा त्याग करावा लागतो. अविवाहीत राहून ब्रम्हचर्याचे आचरण करावे लागते. संन्याशी व्यक्ती विरक्त भावनेने जीवन जगता जगता योगाभ्यास, ध्यानधारणा आणि आराध्य दैवताचे भजन पूजन करते. परिव्राजक, परमहंस आणि यति असे संन्यासाचे तीन प्रकार सांगीतले जातात.
ज्याला सुखाने प्रसन्नता मिळत नाही आणि दुःखाने उद्वेग येत नाही अशी निरपेक्ष, स्थिर, विरक्त व्यक्ती जी आत्मज्ञानाचा शोध घेत भ्रमण करते अशा व्यक्तीला ‘संन्याशी’ असे म्हणतात.

सध्याच्या राजकारणात स्वतःला साधू, संन्याशी, मुनि, योगी, बैरागी, सद्गुरू किंवा असेच काही समजणाऱ्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सत्तेच्या राजकारणात रस घेणारी किंबहूना सत्तेचा उपभोग घेणारी कोणतीही व्यक्ति ऋषि, साधू, मुनि, संन्यासी या धार्मिक संकल्पनेत बसू शकत नाही. हे वास्तव आपण नीटपणे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे राजकीय पटलावर सत्तेभोवती पिंगा घालू पाहणाऱ्यांचा दांभिक ढोंगीपणा आपणास ओळखता येईल व तो मोडूनही काढता येईल!

लेखक
© अनिल वत्सला आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क: ९७६६६६८२९५

Leave a Comment