विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान खान्देशी मुख्यमंत्री ला कधी मिळेल?

पांडुरंगा खान्देशी वारकारी दाम्पत्याला या वर्षी प्रथमच तुझ्या शासकीय पूजेचा मान दिलास. आता सांग खान्देशी मुख्यमंत्री ला हा मान कधी मिळेल? मुख्यमंत्री


खांदेशातील वारकरी कुटुंबाला, विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान प्रथमच मिळाला. विठुराया, आम्ही धन्य झालो!

सटाना तालुक्यातील आंबासन गावाचं भाग्य उदयाला आलं. या गावातील एक शेतकरी वारकरी दाम्पत्य, बाळूभाऊ अहिरे आणि त्यांच्या सौभाग्यवती आशाबाई अहिरे यांना या वर्षाचा पांडुरंगाच्या शासकीय पूजेचा मान मिळाला. धन्य झालो आम्ही अखिल खान्देशी अहिर जन!

अवघे गर्जे खान्देश बरं
चालला नामाचा गजर!

अजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू!

आनंदाचे डोही आनंद तरंग!

बाळू भाऊ आणि आशाबाई यांना मिळालेला हा मान इतरांच्या दृष्टीने एक सामान्य घटना असेलही, कारण दरवर्षी कोणीतरी वारकरी कुटुंबाला असा मान मिळतोच. पण माझ्या दृष्टीने ही असामान्य घटना आहे. कारण माझ्या माहितीनुसार, आतापर्यंत हा असा मान खान्देशी माणसाला मिळाला नव्हता. तो आज मिळाला. आम्ही भरून पावलो.

बाळूभाऊ सभ्यांग बाह्यांतरी खान्देशी आहेत. ते सटाणा तालुक्यातील आहेत. त्यांची भाषा अहिराणी आहे. त्यांचं आडनावं कुलनाम अहिरे आहे. हा अहिरांचा प्रथमच सन्मान आहे. एकंदरीत देव मामलेदार आणि पांडुरंग या वेळी सटाण्यावर खूप खूष आहेत. बाळू अहिरे अंबासनचे आहेत. तिथून जवळच अंतापूर ताराहाबाद आहे. तिथल्या उषाताई बच्छाव नुकत्याच खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. एकंदर सटाना तालुका भाग्यवान ठरत आहे.

दरवर्षी आषाढी कार्तिकी एकादशिला पंढरपूरात पांडुरंगाची यात्रा भरते. या पवित्र दिनी भक्तांना पांडुरंगाचे दर्शन देण्यापूर्वी एक मोठी शासकीय पूजा केली जाते. आषाढी एकादशिला मुख्यमंत्री आणि एक मानाचं वारकरी दाम्पत्य, आणि कार्तिकी एकादशिला उपमुख्यमंत्री आणि एक वारकरी दाम्पत्य अशी अलिखित परंपरा आहे.

आतापर्यंत या परंपरेत खान्देशी माणसाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वा मानाचा वारकरी म्हणून कधी पांडुरंगाची पूजा करायला मिळाली नव्हती. ती संधी आज बाळू भाऊ अहिरे आणि आशाबाई अहिरे यांना मिळाली. विठ्ठला, आम्ही भरून पावलो.

विठ्ठला, आता तुझ्या चरणी एक प्रार्थना आहे. आज खान्देशी वारकरी जसा पूजेला बोलाविला तसा पुढच्या वर्षी खान्देशी मुख्यमंत्री पूजेला घे. देवा, तू ठरविले तर अवघड काहीच नाही रे. होऊन जाऊ दे एकदा अहिराणी माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री!

आज बाळू भाऊ अहिरे आणि आशाबाई यांचं अभिनंदन. तुम्ही सोळा वर्षे वारी केली. यावेळी पांडुरंगाच्या दारात सर्वात आधी जाऊन बसलात, यात तुमचे कष्ट, पांडुरंगावरील तुमची श्रद्धा, भक्ती आणि भाव कारणीभूत आहेत. तुमची जिद्द कारणीभूत आहे.

रामकृष्ण हरी!

बापू हटकर
 

Leave a Comment