लाडक्या बहिणीनी वाढविलेला मतदानाचा रेकॉर्ड ब्रेक टक्का कोणाच्या पारड्यात गेला?
महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीत या वेळी विक्रमी असे 65.11% मतदान झाले. गेल्या 30 वर्षातील हा उच्चांक आहे. यात महिला भगिनींचा मोठा सहभाग आहे.
माझ्या मते राज्यात आपल्या हक्का बाबत अत्यंत जागृत नागरिक कोल्हापूरचा आहे. त्यांनी त्यांच्या लौकिकाला शोभेल असे सर्वाधिक म्हणजे 76.25% मतदान केले.
या मतदानात अजून एक विचित्र घटना बघायला मिळाली. राज्यातील सर्वात विकसित, शिक्षित आणि श्रीमंत जिल्हा मुंबई इथे सर्वात कमी म्हणजे 52.07% आणि उपनगरात 55.77% फक्त मतदान झाले तर राज्यात सर्वात जास्त अविकसित, अशिक्षित, गरीब आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात कोल्हापूरच्या नंतर सर्वात जास्त म्हणजे 73.68% इतके मतदान झाले.
या विक्रमी मतदानाचे श्रेय लाडकी बहीण योजनेला जाते. सत्तेत असलेल्या राज्य सरकार पक्षाने महिला मतदारांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्या माध्यमातून सरसकट दीड हजार रुपये राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा केले.
सत्ताधारी पक्षाच्या या कृतीला विरोधी पक्षांनी आधी थोडा विरोध केला. तिजोरीवर जास्त भार पडेल, एव्हढा पैसा कुठून आणणार वगैरे पुटपुटले पण जोरात काही कोणी बोलले नाही. कारण राज्यात 50% लोकसंख्या महिलांची आहे आणि आपण लाडक्या बहीण योजनेला विरोध केला तर अर्धी लोकसंख्या आपल्या विरोधात जाईल म्हणुन मग त्यांनीही या योजनेचा पुरस्कार केला. सत्ताधारी पक्षावर कडी करण्यासाठी मग त्यांनीही हा मुद्दा प्रचाराचा केला आणि महा विकास आघाडीवाले सांगायला लागले की, आमची सत्ता आली तर आम्ही महालक्ष्मी योजना सुरू करून लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये महिना अनुदान सूर करू. यावर महायुतीने सांगितले आम्ही निवडणुकी नंतर दर महा 2,100/_ रुपये सुरू करू.
महायुती आणि महाविकास आघाडीतील या चढाओढ सुंदोपसुंदीचा लाभ घेण्यासाठी मग लाडक्या बहिणीनी मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लावल्या आणि त्यातून हे विक्रमी मतदान घडले. पण हे विक्रमी मतदान कोणाच्या परड्यात पडले काही सांगता येत नाही. मतदान करताना लाडक्या बहिणींच्या डोक्यात काय होते याचा काहीच अंदाज येत नाही.
या बहिणी दोन प्रकारे विचार करत असतील. महायुतीने दीड हजार रुपये दिले हे खरं आहे पण महाविकास आघाडी दुप्पट म्हणजे दरमहा 3 हजार रुपये देणार आहे, मग चला महा विकास आघाडीलाच मतदान करू या. दुसरा विचार असा, दीड हजार महिना लाडकी बहीण योजना तर महायुतीचे आहे, शिवाय त्यांनी पुढे 2,100/_ रुपये द्यायचे सांगितल आहे. महायुतीची ही योजना म्हणुन महाविकास आघाडीने ती बंद केली तर? तेलही जाईल, तूपही जाईल आणि हाती धुपाटणे येईल. कुठ हातच सोडून पळत्याच्या पाठी लागता. द्या आपल्या महायुतीला मत!
लाडक्या बहिणीने अशा द्विधा मनस्थितीत केलेले मत नक्की कोणाच्या परड्यात पडले ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा बाप सुद्धा सांगू शकणार नाही. खरं काय ते 23 तारखेच्या मतमोजणी नंतरच कळले. आज फक्त एवढेच कळले की, लाडक्या बहिणीनी मतदानाचा 30 वर्षाचा उच्चांक मोडला.
लाडकी बहीण योजनेचे जन्मदाते
या लाडक्या बहीण योजनेचे जन्मदाते आहेत विद्यमान केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे विक्रमी कालावधीसाठी मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री होते. नोव्हेंबर 2005 ते डिसेंबर 2023 या काळात 13 वर्ष 17 दिवस ते मुख्यमंत्री पदावर होते. त्यांनी अर्जुन सिंह आणि विद्याचरण शुक्ला यांचा विक्रम मोडून 4 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
डिसेंबर 2018 च्या निवडणुकीत शिवराज सिंह चौहान मुख्यमंत्री असताना भाजप हरली. कॉंग्रेस पक्षाला बहुमत मिळून कमलनाथ मुख्यमंत्री झाले. हा पराभव शिवराज सिंह यांच्या जिव्हारी लागला. त्यांनी कॉन्ग्रेस पक्षातील ज्योतिरादित्य शिंदे या बड्या कॉन्ग्रेस नेत्यांसह 23 आमदार फोडून 15 महिन्याचे कमल नाथ कॉंग्रेस सरकार पाडून चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले.
याच वेळी शिवराज सिंह चौहान यांनी निश्चय केला की यापुढे काहीही झाल तरी पक्षाचा पराभव होऊ द्यायचा नाही. त्या साठी त्यांच्या डोक्यात विचार चक्र सुरु झाले. महाविद्यालयीन दशेत शिवराज सिंह विद्यार्थी नेता होते. त्यांनी भोपळच्या बरकतउल्लाह विश्वविद्यालयातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) विषयात एम ए केल आहे. या परीक्षेत त्यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे.
त्यामुळे जात्याच हुशार असलेल्या या तर्क शास्त्राच्या विद्यार्थ्याने पक्षाचा पराभव होणार नाही या विषयावर तर्क सुरू केला आणि लाडकी बहीण योजनेचा शोध लागला. लगेच योजना अमलात आणली. त्याचा फायदा होऊन डिसेंबर दोन हजार 23 च्या मध्य प्रदेश विधान सभेच्या निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. पण पक्षाने त्यांना मुख्यमंत्री केले नाही. मुख्यमंत्रीदाची शपथ डॉ मोहन यादव यांनी घेतली. पण विजयाच श्रेय मात्र शिवराज सिंह यांचे आहे.
शिवराज सिंह चौहान आणि एकनाथ शिंदे यांचे युतीचे योग
त्यांनी केलेली काम आणि लाडकी बहीण योजना हिंदीत लाडली बहेना योजना मुळे ते मध्य प्रदेशात अत्यंत लोकप्रिय नेते आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत विदिशा लोकसभा मतदार संघात त्यांनी 11 लाख 16 हजार 460 मत घेऊन कॉन्ग्रेस सह सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे.
या शिवराज सिंह चौहान यांनी शोधून काढलेल्या लाडकी बहीण योजनेचा स्विकार करत एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र जिंकण्याचा मनसुबा तयार केला आहे. बघू या त्यांना किती ही योजना लाभते ते.
शिवराज सिंह चौहान आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक योग जुळून आला आहे. ग्वाल्हेरचे सरदार राणोजी शिंदे यांचे कार्यक्षेत्र सिहोर येथे शिवराज सिंह चौहान यांचा जन्म झाला, तर माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा कार्यक्षेत्रात एकनाथ शिंदे यांचा जन्म झाला. शिंदे-चौहान आणि चव्हाण-शिंदे असा योग जुळून आला आहे.
दुसरा योगायोग असा की, महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांनी युती करून अनेक वर्षे भारतावर राज्य केले. आता बघू या एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती किती वर्षे महाराष्ट्रावर राज्य करतात ते?
बापू हटकर