मुंबई लोकल मुंब्रामधील अपघात

मुंबई लोकल मुंब्रामधील अपघात

दररोज लोकल ट्रेनमध्ये चढणाऱ्या हजारो माणसांच्या हातात तिकीट असतं
पण परतीचं आयुष्य हातात नसतं

कोणीतरी पावसात भिजत ऑफिसला जातं,
कोणीतरी बुटाच्या आत भिजलेले पाय घेऊन रोज दोन लोकल बदलतो.
कोणीतरी रात्री उशिरा घरी पोहचतो,
पण सकाळी मात्र वेळेआधीच स्टेशनच्या दिशेने पळायला लागतो.
हे सर्व कुठल्यातरी “स्वप्नासाठी” चाललेले असतं –
स्वतःचं नव्हे… घरच्यांचं. विशेषतः आपल्या बाळांचं, आपल्या बायकोचं, आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचं!

आज जे अपघातात गेले…
ते फक्त प्रवासी नव्हते…
ते कोणाचे बाबा होते, कोणाचा जीवनसाथी, कोणाचा मुलगा , कोणाचे भाऊ होते.

त्यांनी त्या दिवशीही नेहमीसारखंच ट्रेनमध्ये चढायचं ठरवलं असेल,
स्टेशनवर उभं राहताना मनात काही विचार असतील —
“आज साहेबाकडे वाढीव पगाराची चर्चा करायची आहे…”
“आज लेकासाठी ती सायकल बघायची आहे…”
“आज बायकोला म्हटलंय – वेळेवर घरी येईन…”
पण नियतीनं त्यांचं तिकीट फक्त ‘एक मार्गचं’ लिहून ठेवलं होतं.

मुंबई लोकल मुंब्रामधील अपघात 3



त्या लोकलच्या दरवाज्यातून लटकणाऱ्या प्रत्येक माणसामागे एक घर असतं…
एक स्वप्न असतं…
एक जबाबदारी असते.

तो प्रवासी रुळावर पडतो तेव्हा
केवळ एक देह संपत नाही –
एका घरात उजेड संपतो,
एका बाळाच्या डोळ्यातून बापाचा चेहरा हरवतो,
घरचा कर्ता मुलगा जातो..

विचार करा –
किती बापांच्या खिशात लेकीच्या फीचं भांडवल असेल?
किती घरांची किराणा यादी उराशी घेऊन चाललो होते?
किती जणांना घरातल्या आजारी आईच्या औषधांची आठवण होती?

आपण अपघाताची बातमी पाहून दोन मिनिटांनी दुसऱ्या व्हिडिओकडे वळतो,
पण ज्या घराने आपला माणूस गमावला असतो…
त्यांचं आयुष्य पुढे ‘स्टॉप’ होतं.
एकाएकी त्या घरात जेवण जरी शिजलं तरी भूक राहत नाही…
बाळाला बाबाच्या खांद्यावर बसायचं असतं,
पण आता फोटोवर हार टांगून ‘बाबा कुठे गेले?’ असा निरागस प्रश्न तो विचारतो…

आपण ट्रेनमध्ये प्रवास करताना रागावतो, वैतागतो –
“हे काय ट्रेन वेळेवर नाही आली…”
“इतकी गर्दी का ठेवतात इथे?”
पण ज्यांनी आपल्या आयुष्याची शेवटची सकाळ लोकलमध्ये पाहिली,
त्यांच्यासाठी वेळ, गर्दी किंवा डब्याचं दरवाजं महत्त्वाचं नव्हतं —
महत्त्वाचं होतं फक्त कामावर किंवा ‘घरी पोहोचणं…’

आज एकदा मनाशी विचार करा –
जे गेले, ते गेलंच…
पण आपल्या भोवती अशा हजारो लोकल वॉरियर्स आहेत —
जे दररोज घराच्या सुखासाठी, फुलपाखरांसारख्या बाळाच्या हसण्यासाठी,
आईच्या औषधासाठी आणि बायकोच्या स्वप्नांसाठी
आपलं सर्वस्व देत रुळांवर चालले आहेत.

त्या प्रत्येक माणसात एक ‘बाप’ एक मुलगा आहे,
एक ‘कमावता हात’ आहे,
एक ‘स्वप्नांचा रक्षक’ आहे.

मुंबई लोकल – मुंब्रामधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व निष्पाप प्रवाशांनाहृदयस्पर्शी श्रद्धांजली.

मुंबई लोकल मुंब्रामधील अपघात 5

Leave a Comment