One handed claps टाळी एका हातानं वाजत नाही

One handed claps टाळी एका हातानं वाजत नाही

मध्यंतरी शेवगाव जि. अहमदनगरच्या एका तरुणानं एका हातानं टाळी वाजवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरल झाला. टीव्हीच्या काही चॅनल्सनं त्याची दखल घेऊन त्याची बातमीही प्रसारीत केली. या तरुणानं एका हातानं टाळीचा आवाज काढून दाखवला असला तरी त्याला टाळीचा फील येत नाही. हे आपणही पाहिलं व अनुभवलं असेलच. एखाद्या अपवादात्मक व्यक्तीच्या कौशल्याने एखादा समाजमान्य सिद्धांत खोटा ठरवता येत नाही.

सुशील आणि सुशीलाचा संसार गेली दोन दशके सुखाने चालला होता. दोघेही आता वयाच्या पन्नाशीत आले होते. मोठा मुलगा ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षात होता. मुलगी बारावीत शिकत होती. सर्व काही जणू ठरवून चाललं आहे इतक्या सहजपणानं सुरु होतं. अशा चांगल्या चाललेल्या संसाराला कुणाची तरी दृष्ट लागल्यासारखं घरातलं वातावरण एकाएकी बिघडलं. चौघांची तोंडं चार दिशेला फिरली अन् सगळंच मुसळ जणू केरात गेलं! एकमेकांना दोष देऊन मीच तेवढा बरोबर आहे हे सांगण्याचा आटापिटा सुरु झाला. “टाळी एका हातानं वाजत नाही!” असं सांगून त्यांच्या कौटूंबिक मित्रांनी चौघांनाही चांगलंच सुनावलं. तेव्हा कुठं सगळे ताळ्यावर आले. घरात सुख आणि समाधान पुन्हा एकदा नांदू लागलं!

सुशील आणि सुशीलाच्या घरात जे घडलं ते खरं तर आपल्यापैकी अनेकांच्या घरात घडत असतं. काहींच्या घरात एव्हाना ते घडूनही गेलं असेल. आपल्यालाही कुणीतरी “टाळी एका हातानं वाजत नाही!” असं सांगण्याचा प्रयत्न केला असेल. पण सुशील आणि सुशीलाच्या घरातसं सुख आणि समाधान पुन्हा नांदू लागलं तसं ते आपल्यापैकी अनेकांच्या घरात घडताना दिसत नाही. असं का होत असावं? हा आपल्या सर्वांच्या चिंतेचा आणि चिंतनाचा विषय होऊ शकतो.

टाळी एका हातानं वाजत नसते! हे अगदी खरे असले तरी आपण त्याचा नेमका काय अर्थ लावतो? आजवरच्या अनुभवावरून आपणास असं नक्की म्हणता येईल की, बहुतेक वेळा हे वाक्य आपण चुकीच्या संदर्भात वापरत असतो. म्हणजे कसं? असं विचाराल तर दोघांच्या भांडणात कुणा एकाचाच दोष नसतो तर दोघांचही काहीतरी चुकलेलं असतं! हे स्पष्ट करण्यासाठी आपण हे वाक्य वापरत असतो. आपण त्या वाक्याचा अशा अर्थाने केलेला वापर योग्य असतो का? माझ्या मते, मुळीच नाही! आपण अशा रितीने हे वाक्य वापरत असू तर आपणास त्या वाक्याचा योग्य अर्थ कळलाच नाही असाच त्याचा अर्थ होतो.

या पार्श्वभूमीवर आपण टाळी कधी व का वाजवतो? या प्रश्नाचं उत्तर शोधलं तर आपल्या असं लक्षात येतं की, आपण आनंदाच्या क्षणी, आनंद व्यक्त करण्यासाठी टाळी वाजवतो. आपला आनंद जितका मोठा असेल तितका आपल्या टाळीचा वेग आणि आवाजही मोठा असतो. आपण भजनात टाळी वाजवतो. कधी आपण कुणाच्या स्वागतासाठी टाळी वाजवतो. कधी कुणाच्या कौतूकासाठी टाळी वाजवतो. कधी कुणाला साथ देण्यासाठी टाळी वाजवतो. एखादी कार्यपूर्ति झाल्यावरही टाळी वाजवली जाते. उदा. लग्न मंडपात सर्व मंगलाष्टके म्हणून झाल्यावर आपण टाळी वाजवतो किंवा अवकाशयानाने आकाशात यशस्वी उड्डाण केलं की आपण टाळी वाजवतो. यावरून हे स्पष्ट होतं की, टाळी हे आनंदाचं आणि पूर्णत्वाचं प्रतिक आहे!

आपल्या आयुष्यात येणारे सुखाचे, समाधानाचे, मांगल्याचे, प्रसन्नतेचे क्षण आपल्याला आनंद देतात. हा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी आपण टाळी वाजवतो. टाळी कुणाला प्रोत्साहन देते, कुणाचा उत्साह वाढवते, कुणाला प्रेरणा देते, कुणाला लढण्याचं बळ देते. टाळी कुणाचं स्वागत करते, कुणाचं कौतूक करते, कुणाला शाबासकी देते, कुणाला साथ देते, कुणाला दाद देते!
ही टाळी एका हातानं वाजत नाही याचा अर्थ हाच होतो की, आपल्याला एकट्याला आपलं आयुष्य आनंदी बनवता येत नाही. त्यासाठी आपल्याला एकापेक्षा अधिक किंबहुना अनेक हातांची गरज असते. दुर्दैवाने टाळीचा हा संदर्भ दुर्लक्षित करून आपण सर्वजण अगदी सहजपणे टाळीला चुकीचा संदर्भ देतो आणि चुकीच्या अर्थाने टाळी एका हाताने वाजत नाही असं म्हणत राहतो.

वास्तविक, आपण संकटात असताना टाळी वाजवत नाही किंवा भांडणातही टाळी वाजवत नाही. याउलट आपलं संकट दूर झाल्यावर आपण आनंदानं टाळी वाजवतो. भांडण मिटल्यावर टाळी वाजवतो. ध्येय गाठल्यावर टाळी वाजवतो. अशावेळी ‘टाळी वाजवली’ असं म्हणण्याऐवजी आपण ‘टाळ्या पिटल्या’ असं म्हणतो. याचा अर्थ आपण आधी म्हटल्याप्रमाणं आपल्याला झालेल्या आनंदाच्या प्रमाणात आपल्या टाळीचा वेग आणि आवाज वाढलेला असतो.

मध्यंतरी शेवगाव जि. अहमदनगरच्या एका तरुणानं एका हातानं टाळी वाजवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांत प्रचंड व्हायरल झाला. टीव्हीच्या काही चॅनल्सनं त्याची दखल घेऊन त्याची बातमीही प्रसारीत केली. या तरुणानं एका हातानं टाळीचा आवाज काढून दाखवला असला तरी त्याला टाळीचा फील येत नाही. हे आपणही पाहिलं व अनुभवलं असेलच. एखाद्या अपवादात्मक व्यक्तीच्या कौशल्याने एखादा समाजमान्य सिद्धांत खोटा ठरवता येत नाही. टाळीला ताल असतो, लय असते, आनंदाचे आणि प्रसन्नतेचे वलय असते. टाळ्या हलक्या-फुलक्या असल्या तरी बोलक्या असतात! टाळ्या भरभक्कम असतील तर भाटांच्या ढोलक्या असतात! शेवटी काय तर, टाळी एका हातानं वाजत नाही हेच खरं आहे आणि त्याचा आपण स्वीकार करणं हेच बरं आहे!

लेखक
© अनिल आत्माराम उदावंत
ज्येष्ठ प्रशिक्षक, समुपदेशक व साहित्यिक
सावेडी, अहमदनगर, संपर्क : ९७६६६६८२९५

1 thought on “One handed claps टाळी एका हातानं वाजत नाही”

Leave a Comment