लोक चर्चा दैनिक तोफ ग्रामीण भागाचा शहरी चेहरा असलेले प्रा पी एन पाटील Prof. PN Patil, the urban face of rural areas
सामाजिक राजकीय आणि पत्रकारीतेत चांगलं काम करणाऱ्या लोंकांची प्रत्येकाची एक ओळख त्यांनी केलेल्या कामांतून समाजात निर्माण झाली असते,प्रत्येकाला आपला छंद जोपासण्याची एक पद्धत असते, त्या दिशेने आपल्या कामाचा ठसा उमटवून तो आपला छंद जोपासत असतो,अशी छंद जोपासणारी माणसं आपल्या वर असलेली जबाबदारीची जाणीव ठेवून प्रामाणिक पणे अविरतपणे त्यांचें काम करत असतात.
सेवानिवृत्ती हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसतोच, असेच एक व्यक्तिमत्त्व पत्रकारिता करत सामाजिक बांधिलकी ची जाण ठेवत आपल्या कामातून कर्तृत्वाची ओळख देणारा घोडगांव ता चोपडा या गावाच्या मातीतला आपल्या लेखणीतून ग्रामीण भागातील प्रश्न त्यांच्या व्यथा मांडणारा ग्रामीण भागाचा शहरी चेहरा असलेला प्रा पी एन पाटील सर यांची नुकतीच मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय सचीव पदी निवड करण्यात आली आहे. त्या आधी पी एन पाटील सर मराठा सेवा संघाचे वधू वर सूचक मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे,खरं तर हा वधू वर सुचकाचा वारसा प्रा पी एन पाटलांनी त्यांच्या वडिलांकडून घेतला आहे त्यांचे वडील त्यांच्या पंचक्रोशीत वधू वर सूचक(लग्न जुळवणारे )या कामा बद्दल ओळखले जायचे, वडिलांचा हा वारसा प्रा पी एन पाटलांनी आज ही चालू ठेवला आहे. जानेवारी महिन्यात मराठा सेवा संघाचे वधू वर सूचक मंडळाचा वतीने वधू वर परिचय मेळावा नुकताच पार पडला त्या मेळाव्याचे आयोजन संयोजक म्हणून पी एन पाटलांनी काम करतांना कुठेच कर्तव्यात कसूर केलेली नाही.
अर्थात या कामासाठी त्यांचे सहकारी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील,कुसुंबा चे उमेश शिंदें आणि त्यांच्या टीम ने अतिशय सुंदर असे कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम कसा असावा याचे हे उत्तम उदाहरण म्हणता येईल. वधू वर सूचक मंडळांची पुस्तिका तयार करण्यापासून तर थेट वधू वर सूचक मेळावा यशस्वी करण्या इतपत, जबाबदारी चे काम प्रा पी एन पाटील आणि त्यांचे सहकारी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष संदीप पाटील कुसुंबा चे उमेश शिंदे यांनी पायाला भिंगरी लागल्यासारखे काम केले.असे अवघड कामे करणे ऐरे गैरे चे काम नव्हे, त्या बद्दल प्रा पी एन पाटील यांचा सपत्नीक सत्कार आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते झाला. हा सत्कार म्हणजे त्यांच्या कामाची पावती मिळाली असे म्हणता येईल. या पूर्वी सुध्दा पी एन पाटील सरांनी अनेक जबाबदारी चे कामे त्यांनी आपल्या आयुष्यात केलेली आहेत, खासकरून युवक बिरादरीच्या माध्यमातून सतत २२ वर्षांपासून त्यांनी ग्रामीण भागातील गरजूंना रात्री उशिरापर्यंत रक्ताची गरज भागविण्यासाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय काम हे त्यांच्या माणूसकीचे दर्शन जपणारे म्हणता येईल.
पत्रकारीतेत आणि सामाजिक जाणिवेतून आयुष्यातील जवळपास सतत ३०वर्ष न थकता अविरतपणे ग्रामीण भागातील लोंकांचे प्रश्न आणि व्यथा आपल्या लेखणीतून मांडून आणि मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सामाजिक जाणिवेतून करत असलेलं काम त्यांनी चालूच ठेवलं. पी एन पाटील म्हणजे काम करणारं चालतं बोलतं व्यासपीठ आहे, अशी माणूसकीची कामे करण्या बद्दल, पी एन पाटलांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.पी एन पाटलांनी ग्रामीण भागातील लोंकांचे प्रश्न आणि त्यांच्या व्यथांना आपल्या लेखणीतून न्याय देंतांना ते कधीच थकले नाहीत. या साठी त्यांना २०१४सालचा उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार ही मिळाला आहे. जबाबदारीचे भान ठेवून सामाजिक बांधिलकीची जाण असणारे पी एन पाटील यांना समाजभूषण पुरस्कार सुध्दा मिळाला आहे. समाजाने त्यानी केलेल्या कामाचे योग्य असे मूल्यमापन करुन पुरस्कार बहाल केलेले आहेत हे नाकारून चालणार नाही. पी एन पाटलांना त्यांच्या कर्माचे माप त्यांच्या पदरात टाकण्याचे काम समाजाने केलेले आहे.
पी एन पाटलांनी केलेल्या कामाचे योग्य असे मूल्यमापन मराठा सेवा संघाने त्यांची राष्ट्रीय सचीव पदी नियुक्ती करुन केले आहे, ग्रामीण भागाचा शहरी चेहरा असलेला मराठा सेवा संघ नावाची संस्था जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य संस्था मानली जाते. या संस्थेत काम करण्याचे भाग्य प्रा पी एन पाटलांना लाभले. मराठा सेवा संघात प्रा पी एन पाटलांसारखे संदीप पाटील,उमेश शिंदे अशी ग्रामीण भागातील मातीतली रत्ने या संस्थेत काम करतात, खरं तर मराठा सेवा संघाला ” रत्नपारखी सेवा संघ ” असे म्हटले पाहिजे!
अरूण पाटील
मुख्य संपादक
दैनिक तोफ