अनाथांचे नाथ शंकरबाबा पापडकर यांना पद्मश्री जाहीर
Shankar Baba Papalkar
अनाथांचे “देवरुप” घर,
श्री शंकरबाबा पापडकर
प्रा.बी.एन.चौधरी
आभाळाएवढी ज्यांची उंची,
त्यांनी थोडेसे खाली यावे.
मातीत ज्यांचे जन्म मळले ,
त्यांना उचलून वरती घ्यावे !
सुप्रसिद्ध कवी दत्ता हलसगीकर यांनी लिहिलेल्या या ओळी, केवळ कवितेच्या ओळी नाहीत. कवी मनात उत्स्फूर्तपणे आलेल्या या ओळी अनेकांसाठी जीवनमंत्र झाल्या आहेत. या ओळींमध्ये असलेला भाव प्रत्यक्ष जगणारी अनेक माणसं आपल्या आसपास वावरत आहेत. जगाच्या दृष्टीने अशी माणसं वेडी असतात. मात्र, ही वेडी माणसंच इतिहास घडवतात. असाच एक ध्येयवेडा “महात्मा” विदर्भात अमरावती जिल्ह्य़ातील परतवाडा येथे आपल्या आगळ्यावेगळ्या कार्याने जगाचे लक्ष वेधून घेत आहे. मनाने ज्यांची उंची आभाळाएव्हढी आहे अश्या शंकरबाबा पापडकर यांनी, ज्यांचे अवघं आयुष्यच मातीमोल झाले आहे अशा अनाथ, अपंग, दिव्यांग, गतीमंद लेकरांना, मातीतून उचलून कवेत घेतले आहे. त्यांना आपले म्हटले. ज्यांना कुणीही जवळ करू शकत नाही, अशांना त्यांनी बाप म्हणून आपले नाव दिले आहे. अनाथांना सनाथ केले आहे. बाबा त्यांच्यासाठी जणू “देवरुप” झाले आहेत. त्यांच्या या कार्याची भारत सरकारने उचित दखल घेवून त्यांना नुकताच “भारतरत्न” पुरस्कार देवून गौरविले आहे. आपल्या खान्देशशी त्यांचे एक अतुट नातं आहे. शिरपूरच्या कर्मयोगिनी श्रीमती आशाताई रंधे यांचे ते बंधू आहेत. आज या महात्म्याचा ८२वा वाढदिवस. त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन.!
१४ फेब्रुवारी हा दिवस खरंतर “हॅलेंटाईन दिन” अर्थात “प्रेम-दिन” म्हणून जगभर साजरा केला. प्रेमाची खरी व्याख्या मात्र फार थोड्या लोकांना समजली. महाराष्ट्रातील सारे संत, बाबा आमटे, मदर टेरेसा, सिंधूताई सपकाळ यांनी जगाला प्रेम दिलं. आज फक्त तरुणांनाच नाही तर अबालवृध्दांना या दिनाने वेड लावलं आहे. प्रेम हे फक्त दोन शरीरांचं शारीरीक आकर्षण नसतं तर ते आत्म्याचंआत्म्याशी, वेदनेचं संवेदनेशी, कारुण्याचं उदारतेशी, मुलांचं – आई-बापाशी, बहिणीचं-भावाशीही असतं हे या महान विभूतींनी जगाला दाखवून दिले आहे. त्याच वाटेवर शंकरबाबा पापडकर चालत आहेत. अनाथ, अपंग, गतीमंदांशी प्रेमाचं नातं जोडून बाबांनी आपला जन्मदिन खऱ्या अर्थाने सार्थकी लावला आहे. “प्रेमदिन” हाच त्यांचा वाढदिवस असावा, यातही काहीतरी दैवयोग दडलेला असावा असं मला वाटतं.
शंकर बाबा यांना बालपणीच संत श्री गाडगेबाबा यांचा सहवास लाभला होता. वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांनी बाबांना पाहिले. ते बाबांशी बोलले. त्यांनी गाडगेबाबांचे कार्य अनुभवले आणि त्या कार्यातून प्रेरणा घेऊन ते त्या वाटेवर चालू लागले. आपला पारंपारिक कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय करत ते पत्रकारिता करू लागले. पुढे त्यांनी आपले स्वतःचे “देवकीनंदन गोपाला” हे साप्ताहिक काढले. या साप्ताहिकातून केवळ जनप्रबोधनाचा ध्यास त्यांनी घेतला. सामाजिक कार्य करताकरता एके दिवशी त्यांना रस्त्यावर पडलेले एक अनाथ मूल सापडले. ज्याला कोणीही आपलं म्हणत नव्हते ! त्याची दशा बघून बाबांचे मन द्रवले. ते अस्वस्थ झाले. शंकर बाबांनी त्याला मातीतून उचलत कवेत घेतले. त्याला आपल्या घरी आणले. त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी घेतली आणि हाच त्यांचा जीवनाचा ध्यास बनला. पुढे बाबांनी रस्त्यावरील अशा २०० अनाथ, अपंग, गतीमंदांना बाप म्हणून आपले नाव दिले. ग्रामपंचायतीतून त्यांचा रहिवास दाखला काढून दिला. त्यांचे जनधन योजनेत नाव नोंदविले. त्यांची आजीवन काळजी घेण्याचा संकल्प केला. आपलं घरदार सोडून आजीवन त्यांच्यासोबत राहण्याची शपथ घेतली. हे साधं-सोपं काम नव्हतं. “शिव-धनुष्य” होतं ते. शंकरबाबांनी ते उचललं आणि लिलया पेललं देखील. या कार्यालाच त्यांनी आपले जीवन कार्य बनवलं. एक मिशन म्हणून ते या कार्यात रमले.
बाबांच्या मनात अनाथ, अपंग, वंचितांना बघून एक वेदना उठली. ते अस्वस्थ झाले. या अस्वस्थतेतून त्यांनी एक आश्रम उभा केला. या आश्रमातील २०० अनाथ मुलं-मुली म्हणजे बाबांची लेकरं झाली. यातील ३० अनाथ मुलींचे बाबांनी लग्नही लावून दिले आहे. १२ मुलांना शासकीय नोकरी मिळेल इतके शिक्षण देऊन बाबांनी स्वावलंबी बनवले आहे. आश्रमात आता एकूण १२३ मुलं-मुली राहत आहेत. अनाथ, अपंग, गतिमंदांना फक्त दया, माया, करुणा, कोरडी सहानुभूती नको. त्यांना आपलं म्हणा, मदतीचा हात द्या, स्विकार करा.! हा बाबांचा संदेश आहे. त्यांचा आदर्श आहे. या कामासाठी कोणतिही मदत अथवा शासकीय अनुदान ते घेत नाहीत. वझ्झर येथील त्यांचा आश्रम हा केवळ अनाथ आश्रम न राहता तेथे एका कर्मयोग्याचे एक कर्मक्षेत्र विकसित झाले आहे.
बाबांनी, फक्त माणसांची वेदना जाणली असं नाही तर त्यांनी वृक्षवेलींवरही जीवापाड प्रेम केले. आश्रमातील मुलांच्या साह्याने बाबांनी सातपुड्याच्या पायथ्याशी २५ एकर शेतीमध्ये १५ हजार झाडांची एक सुंदर ,मनोहारी वनराई उभी केली आहे .या वनराईतील प्रत्येक झाडाला या अनाथ मुलांनीच जगविले, वाढविले आहे. मुलांना स्वावलंबी बनवता बनवता संवेदनशील बनवण्याचा बाबांचा हा उपक्रम म्हणजे देशात जबाबदार नागरिक घडवण्याची एक कार्यशाळाच आहे. बाबांच्या या कार्याची देशातील लोकांनी दखल घेतलीच आहे. त्यांचे कार्य आता विदेशातही पोहोचले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन श्री संत गाडगेबाबा विद्यापीठाने त्यांना डिलीटची मानद पदवी देऊन सन्मानित केले आहे. २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांच्या कार्यावर मोहरम उमटवली आहे. बाबा या मान-सन्मान-गौरवांपासून कोसोदूर आहेत. खरंतर ते कोणताही पुरस्कार स्विकारत नाहीत. मात्र, या दोन सन्मानांनी त्यांचे अलौकीक कार्य सातासमुद्रापार गेले आहे.
अनाथ-दिव्यांगाना वयाच्या १८ वर्षांपर्यंतच आश्रमात राहता येतं. तसा सरकारी कायदा आहे. १८ वर्षानंतर त्यांनी कुठे जावे ? हा प्रश्न बाबांना सतावतो. त्यासाठी ते लढा देत आहेत. या अनाथांना पुढील आधार मिळाला नाही तर अजन्म आश्रमात राहता यायला हवे, अशी त्यांची मागणी आहे. यावरुन त्यांच्या दूरदृष्टीची आणि चिंतनशीलतेची ओळख पटते. बाबांनी हे कार्य कुणाच्या सांगण्याने सुरु केलेले नाही. ती त्यांची अंतःप्रेरणा आहे. आत्म्याचा आवाज त्यांनी ऐकला आणि एक महान कार्य उभे राहिले. हा आश्रम हेच त्यांचे निजधाम झाले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात…..
‘की घेतले न हे व्रत अंधतेने,
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने.
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे,
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे !
हे व्रत सतीचे वाण आहे. ते आम्ही अजाणतेने, अंधपणाने घेतलेले नाही. ते विचारपूर्वक, समजून उमजून घेतले आहे. ते दिव्य, दाहक आहे. त्याचे चटके खावेच लागतील. परंतू, या कार्यातूनच दिव्य कार्य उभे राहिल. त्याचा दिव्य प्रकाश सर्वत्र पसरेल. हाच विचार पापडकरबाबांच्या कार्यात दिसून येतो. त्यांच्या कार्याचा दिव्य प्रकाश अनेक अनाथ, अपंग, दिव्यांग, गतीमंदाच्या जीवनातला अंधार दूर करत आहे. त्यांच्या जीवनात दिव्य प्रकाश आणत आहे. या प्रकाशयात्रीचे आपण सहकारी होवू या. त्यांच्या वाटेवर, त्यांच्या सोबत चार पावलं चालू या. त्यांचे सहप्रवासी होवू या. बाबांच्या या कार्याला आमच्या “देवरुप” परिवाराच्या आभाळभर शुभेच्छा.!
© प्रा.बी.एन.चौधरी.
देवरुप, धरणगाव.
5 thoughts on “अनाथांचे देवरुप घर श्री शंकरबाबा पापडकर”