महाराष्ट्रात गुटका बंदी कशासाठी ?

संपादकीय

या देशात कायदे कशासाठी

या देशात कायदे कशासाठी केले जातात यावर पून्हा एकदा कायदेतज्ञांनी चर्चा करण्याची गरज आहे. दारू बंदी, गुटका बंदी, प्लास्टिक बंदी, जुगार बंदी, पत्ते खेळण्यावर बंदी कायद्याने लागू केली आहे. परंतू या बंदीचा फायदा नेमका कुणाला होतो ? आणि बंदीचा कायदा खरोखरच अंमलात आणला जातो का ? तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरे ही नकारात्मक पद्धतीनेच येतील. मग ‘बंदी’चा अट्टाहास कशासाठी ?

महात्मा गांधींची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या गुजरात राज्यात आणि वर्धा जिल्ह्यात स्वातंत्र्य काळापासून दारू बंदी करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात गृहराज्य मंत्री आर.आर.पाटील यांचे कार्यकाळापासून ‘गुटका बंदी’ करण्याचा निर्णय तत्कालीन आघाडी सरकारने घेतला आहे. गुटका, सुगंधी पान मसाला, मावा यांची विक्री व उत्पादनावर बंदी घातली गेली आहे. टाटा मेमोरियल ट्रस्ट, नागपूरचे शासकीय दंत महाविद्यालय व सलाम बॉम्बे फॉउंडेशन अशा स्वंयसेवी संस्थांच्या अहवालात तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण व परिणाम समोर आल्याने देशात 26 राज्ये व पांच केंद्र शासीत प्रदेशात गुटका बंदी लागू करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात कर्करोग, क्षयरोग, श्वसनाचे, हृदय विकार रूग्णांची संख्या

दरवर्षी या बंदीला मुदत वाढ दिली जाते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कर्करोग, क्षयरोग, श्वसनाचे, हृदय विकार या आजारांची रूग्णांची संख्या आणि त्यावर होणारा शासनाच्या खर्चाची आकडेवारी पाहिल्यास याचसाठी होता का अट्टाहास असे म्हणावेसे वाटते. महाराष्ट्रात 2012 पासून गुटका बंदी करण्यात आली आहे. परंतू राज्यात गुटका बंदी असतांनाही गुटका विक्री मोठ्या प्रमाणावर केली जाते. लहानशा गावापासून तर मोठ-मोठ्या महानगरातील सर्व पान विक्रेत्या, तंबाखू, बिडी-काडी विक्रेत्यांच्या दुकानातून पाहिजे तो गुटका विक्रीस उपलब्ध आहे.

महाराष्ट्रात येणारा गुटका हा गुजरात, छत्तीसगड, पंजाब या राज्यातून येतो. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस यांच्या ‘रोकडा’ मैत्रीतून आणि मिलीभगत भूमिकेतून संपूर्ण राज्यात गुटका उपलब्ध करून दिला जातो. विशेष म्हणजे गुटका निर्मिती करणारे कारखाने हे महाराष्ट्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरून येणारा गुटका हा चेकपोस्ट, पोलीस ठाणे, महामार्ग पोलीस, यांना पार करून येत असतो. त्यामुळे हा गुटका अनेकांना ‘खुष’ करून महाराष्ट्रात दाखल होतो. महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांना झालेल्या व्याधीमुळे राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि आजचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपारी, गुटका आणि तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घातली आणि कडक कारवाईचे आदेश दिले होते. परंतू राज्यातील गुटकाबंदी ही केवळ नावालाच ‘बंदी’ आहे.

मध्यमवर्गीय गृहस्थांमध्ये गुटका खाण्याचे, मद्य पिण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले

महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तरूण, मध्यमवर्गीय गृहस्थांमध्ये गुटका खाण्याचे, मद्य पिण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. किंबहुना मद्य पिणे एक फॅशन झाली आहे. तर गुटखा खाऊन झोपणार्‍यांची संख्या सुद्धा या राज्यात मोठ्या प्रमाणावर आहे. वाढदिवस, लग्न समारंभ, निवडणूका या मद्यासाठी ‘शुभ’ मानल्या जातात व  मजा करण्याचे समारंभ मानले जातात. एका मित्राच्या लग्नात किमान पन्नास मित्रांची  पिण्याची ‘व्यवस्था’ केली जाते. माझ्या शरीरावर गुटक्याचे, मद्याचे काय परिणाम होतील यावर अलिकडे  तरूणांमध्ये कोणतेही गांभिर्य उरलेले नाही. पंजाब सारख्या राज्यात याच व्यसनाधिनतेमुळे आणि व्यसन करण्याच्या अन्य घातक पदार्थांमुळे पंजाब मधील तरूणाईचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.

म्हणून जनजागृतीसाठी ‘उडता पंजाब’ सारख्या सिनेमाची निर्मिती करण्यात आली. मद्यापेक्षाही घातक पदार्थ नशेबाजांसाठी बाजारात उपलब्ध आहेत. गुजरात मधून येणार्‍या नशेच्या लहान बाटल्या,  भांग, गांजा, स्मॅक, कोकेन, ब्राऊन शुगर यापेक्षाही भयानक नशेेचे पदार्थ विकले जातात. श्रम करणारा वर्ग, बेरोजगार तरूण-तरूणी व्यसनाच्या आहारी गेले आहेत. तर ज्यांचे गडेलठ्ठ पगार आहेत अशी तरूण मंडळी ज्यामध्ये मुलींचे प्रमाण सुद्धा  मोठ्या प्रमाणावर आहे, आता नशेच्या आहारी गेले आहेत. आणि कर्करोग, फफ्फुसाचे आजार, किडनीचे आजार, तोंडाचा कर्करोग यासारखे भयानक आजार यातून निर्माण झाले आहेत. यावर पायबंद बसावा म्हणून सरकारचे सामाजिक संस्थांचे प्रयत्न असतात.

बंदी केल्यावर देखील मुबलक प्रमाणात या सर्व नशेच्या वस्तू सहज उपलब्ध

परंतू बंदी केल्यावर देखील मुबलक प्रमाणात या सर्व नशेच्या वस्तू सहज उपलब्ध होत असतील तर यावर बंदी कशासाठी घालायची ? उलट मद्य प्या, आणि लिव्हर फेल होवून मरा, गुटका खा आणि कर्करोगाने लवकर मरा, अशी टॅग लाईन या वस्तूंवर छापून संविधानिक इशारा द्यायला हवा. व्यवनाधिनतेतून निर्माण होणार्‍या आजारांवर उपचाराासठी सरकारचे अब्जावधी रूपये खर्च होतात. शिवाय सरकारचा महसूल बुडतो. आणि यातून या राज्यात गुंडांच्या टोळ्या पोसल्या जात आहेत. पोलीसांची घरे भरली जात आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी मालामाल होतांना दिसत आहेत. जप्त केलेला गुटका, हा पुढच्या दाराने सीलबंद होतो आणि मागच्या दाराने विक्री होतो.

मद्य हे उंदीर पिऊन जातात. त्यामुळे भ्रष्टाचाराचे मार्ग अजून खुले झाले आहेत. त्यापेक्षा शासनाने महाराष्ट्रातील गुटका बंदी उठवावी. त्यातून शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर महसूल जमा होईल. आणि भ्रष्टाचारातून तयार होणार्‍या तरूणांच्या टोळ्यांना पायबंद बसेल. आणि ज्यांना गुटका खायचा आहे त्यांनी खावा आणि त्यांच्या कर्मा धर्माने त्यांना मरू द्यावे. त्यामुळे महाराष्ट्रातील गुटका बंदी कशासाठी ? यावर सरकारने समिती नेमून योग्य तो निर्णय द्यावा.

तूर्तास एव्हढेच.