धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव भाग दुसरा 2

धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव!

धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव भाग-1

तमाशा

खान्देशातीलं दुसरी अत्यंत प्रसिद्ध आणि लोकांप्रिय लोककला आहे तमाशा. हिला स्थानिक भाषेत तमासा किंवा गंम्मत म्हणतात. खान्देशाला तमाशाची खूप मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रातील वायन्देशी तमाशा आणि झाडीपट्टीतील खडी गंम्मत यापेक्षा खान्देशी तमाशा खूप वेगळा आहे.

तमाशाची वाद्य

खान्देशी तमाशाची वाद्य वेगळी आहेत. संगीत बाज आणि नृत्य शैली वेगळी आहेत. गण वेगळा आहे. महाराष्ट्रात ज्याला वग म्हणतात त्याला खांदेशात लावणी म्हणतात. आणि महाराष्ट्रात जिला लावणी म्हणतात तिला मी खांदेशात भुलावणी नावं दिलं आहे. खान्देशी पोवाडा सुद्धा वेगळा आहे. खान्देशी पोवाड्याचीं जपणूक टिंगरीवाले भराडी या जमातीने केली आहे.वायन्देशी तमाशातील गवंळनीत कृष्णा सोबत पेंद्या असतो तर खान्देशी गवळनीत कृष्णा सोबत सुदामा असतो. वायंदेशात वगाची सुरवात ज्या पद्याने होते, त्याला ते कटाव म्हणतात तर खांदेशात त्याला सकी म्हणतात. दोन्हीचीं गायकीं, सूर ताल वेगळा आहे.

खान्देशात तमाशा प्रसिद्ध

तर असा हां तमाशा खूप प्रिय असा कला प्रकार खांदेशात आहे. गावच्या जत्रेत तमाशाचे फड लागतात. महाराष्ट्रात जत्रेची सुरवात देवाच्या पालखीने होते, तर खांदेशात पालखी ऐवजी तगतरावं फिरवीला जातो. तगतराव हे रथ सदृश्य वाहन असतें त्यावर नंतर सविस्तर बोलेन. या तगतरावात तमाशातील काही कनिष्ठ(ज्युनियर)कलाकार बसतात. त्यात ढोलकी, पेटी वगैरे म्हणजे सरस्वतीच रूप समजून त्याची मिरवणूक काढतात.

ज्या देवाची यात्रा असेल त्याला भेटून नंतर तगतरावं गावातील मुख्य चौकात येतो. तिथे तमासगीर खाली उतरून तास दीड तासाचा मनोरंजनाचा कार्यक्रम सादर करतात. त्याला हाजरी म्हणतात. हाजरी म्हणजे हजेरी, झलक, नमुना. इथे झालेल्या हाजरी वरून प्रेक्षकांनां तमाशाचा दर्जा कळतो. यावेळी पपंचक्रोशीतील लोक आणि गावातील गावकरी बायका पोरासह यात्रेत फिरायला आलेले असतात. ते खाण्यापिण्याच्या पदार्था सह इतरही काही खरेदी करतात. मग सायंकाळी घरी जाऊन जेवण वगैरे करून रात्रीच्या वेळी बरीच तरुण मंडळी बैलगाडीने तमाशा बघायला येतात. हां तमाशा पूर्वी रात्रभर चालत असे.

जुन्या काळात मनोरंजनाचे साधन तमाशा

जेंव्हा नाटक, सिनेमा, टीव्ही नव्हता तेंव्हा तमाशा ही एकमेव कला मनोरंजनासाठी उपलब्ध असे. साधारण विसाव्या शताकातील सहाव्या ते सातव्या दशकात खांदेशात तमाशाचा सुवर्ण काळ होता. नामदेव हरदास, रसूलभाई पिंजारी, नथ्या कथ्या, नथूभाऊ भोकरे, पंडित नाच्या, उत्तम नाच्या, हिलाल झुलाल अशी मातब्बर तमासगीर मंडळी त्याकाळत होती. त्यातील काहीना शासकीय पुरस्कार प्राप्त झाले होते.

खान्देशी नाच्या पंडित

यात पंडित नाच्या नावाचे दोन स्त्री पात्र करणारे दोन नट होते. त्यातील कोणी तरी एक पंडित नाच्या, जो स्त्री पात्र करणारा नर्तका होता त्या बद्दल एक आख्यायिका लोक सांगत, तों म्हणे दोन वेण्या करून एका एका वेणीला 20/20 किलोची धडी बांधयाचा आणि मग परातीच्या काठावर किंवा तलवारीच्या धारेवर तों नृत्य करायचा. ही तर मला तपस्या वाटते. योग साधनेच्या बळावर हे शक्य होतं. जसं पाण्यावरून चालत जाण, तसंच हे परातीच्या काठावर किंवा धारदार शस्त्रावर नर्तन करण आहे.

तमाशा कलावंत सध्याची परिस्थिती

अलीकडे भिका भीमा, शंकर कचूर, शालिक शांताराम, सुनंदा कचूरे, शेषराव गोपाळ अशी मंडळी तमाशा सांभाळून आहेत.या सर्वं तमाशा मंडळाचीं पेढी पूर्वी अंमळनेर येथे असायची. ज्यांना तमाशा हवा असायचा ते अंमळनेर जाऊन सुपारी देत असत. आता नारायणगावात तमाशा पेढी हलविल्या आहेत.

खान्देशी जलसा

या सर्वं तमाशात पूर्वी पुरुषचं स्त्री पात्र करायचे. याशिवाय स्त्री नर्तीकांची वेगळी संगीत बारी असायची. याला खांदेशात जलसा म्हणतात. तर वायंददेशात बारी म्हणतात. जळगाव शहरात आनंद महाजन नावाचे एक गृहस्थ होते. ते या बाऱ्या चालवायचे. त्यांचं आनंद संगीत तमाशा मंडळ होते. ते गावोगाव त्यांचा ताफा नेत असत. याशिवाय जळगावात हैदरी नावाच थिएटर होते. तिथे रोज संगीत बाऱ्या असायच्या. ज्याला त्यांच्या गावात जलसां न्यायचा असेल तो हैदरितील बारी बघून मग ज्याला जीं बारी आवडेल तों ती बारी घेऊन आपल्या गावी जायचे. तमाशात प्रेक्षका कडून दौलत ज्यादा म्हणून जो काही प्रकार केला जातो तों यां जलशात असतो.

काही वर्षा पूर्वी जळगावातील काही नागरिकांनी हैदरी थिएटर बंद पाडलं. त्यामुळे हे सर्वं कलाकार, ज्यात नर्तक, गायक, वादक, सोंगाडेही होते, ते सर्वं परांगदा झाले. पोटासाठी देशोधडीला लागले. त्यातील बऱ्याच कलाकारांनी पुणे सोलापूर रस्त्यावरील चौक येथील थिएटर आश्रय घेतला. आणि खान्देशातील एक कलेचं चकाकणार बेट उध्वस्त झालं.

सोंगाड्या

तमाशात सोंगाड्या हे अत्यंत लोकप्रिय पात्र असतं. तो एकटाच अहिराणी बोलतों किंवा त्याची पत्नी, कोणी मित्र ही अहिराणी बोलतात. पण सोंगाड्या एकटाच भरमसाठ अहिराणी बोलत असल्यामुळे अहिर प्रेक्षकांना तों त्यांच्यातील माणूस वाटतो. सोंगाड्या पूर्वापार अहिराणी बोलत आल्यामुळे रंगमंचावर अहिराणी भाषा सर्वात आधी व्यास पिठावर पोहचविणारा अहिराणी दूत म्हणजे सोंगाड्या आहे. खांदेशात खूप नामांकित सोंगाडे होऊन गेले. त्यांच्यात भोज्या सोंगाड्या सर्वात उत्तम सोंगाड्या होऊन गेले.

तमासे फड मालकांच्या नावावर चालतात. पण भोज्या सोंगाड्याच्या काळात भोज्या सोंगाड्याच्या नावावर तमाशा चालत असे. ज्या तमाशात भोज्या असेल त्या तमाशाला मोठी मागणी असायची. मी मेहमूद, दादा कोंडके, निळू फुले, जगदीप, आसरांनी, कादर खान, जॉनी लिव्हार या सर्वांनां पाहिलं आहे आणि भोज्या सोंगाड्या ही पाहिला आहे. भोज्या सोंगाड्या या सर्वं हिंदी, मराठी विनोद विरा पेक्षा सरस होता. त्या काळात तमाशा कलाकारांच मानधन सालावर असायचं. आता पॅकेज देतात तस. तर त्याकाळात सर्वं तमाशा कलाकारात भोज्या सोंगाड्याचं पॅकेज सर्वात मोठ असायचं. भोज्या सोंगाड्याचं पॅकेज जाहीर झाल्यावरच ईतर कलाकारांचं साल ठरत असे.

महाराष्ट्र शासन आणि तमाशा कलावंत

खूप खस्ता खाऊन अर्ध पोटी राहून प्रसंगी केवळ भाजी भाकरी वर या लोकांनी तमाशा केला. आणि तमाशा जिवंत ठेवला. आता ही कला मरत चालली आहे. त्यासाठी सरकारनें प्रत्येक जिल्ह्याला 2 कोटी रुपये देऊन तमाशा जिवंत ठेवायला सांगितले. पण शासकीय अधिकाऱ्यानी अज्ञान असेल किंवा आकसं असेल वा उदाशिनाता असेल म्हणूनं त्यांनी ही कला दोन कोटीच्या बजेट मध्ये कुठेच घेतली नाही.

खान्देशात उघड्या डोळ्याने फिरणाऱ्या माणसाला तमाशा नावाची लोककलाच दिसत नसेल तर ते ढोंग आहे. जसं समुद्रात होडी घेऊन फिरणार माणूस जर म्हणत असेल कीं, मला कुठेचं पाणी दिसत नाही. तर त्याला आंधळा म्हटला पाहिजे.

आता पर्यंत आपण वन्ह आणि तमाशा या खान्देशातील दोन श्रेष्ठ अतिउच्चं कला पाहिल्या. पुढच्या भागात बघू या. ईतर खान्देशी लोककला.


क्रमश:
बापू हटकर

धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव भाग-1

धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन
धुळे जिल्ह्यात पाच दिवशीय महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन

धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव भाग दुसरा 2
धुळ्यातील महासंस्कृती मोहत्सव भाग दुसरा 2